Homeटॉप स्टोरीभाजपसोबत जायचं नव्हतं...

भाजपसोबत जायचं नव्हतं तर आम्हाला पाठवलं कशाला?

अनेकदा मी माघार घेतली. टीका सहन केली. अपमान सहन केले. अनेकदा मला व्हिलन बनवण्यात आले. पण आता मी सहन करणार नाही. भाजपसोबत जायचे नव्हते तर आम्हाला पाठवले का? मी खोटे बोलत नाही आणि खोटे बोललो तर पवारांची औलाद सांगणार नाही, असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
वांद्रे येथील एमईटी शैक्षणिक संकुलाच्या सभागारात झालेल्या राष्ट्रवादीच्या अजितदादांच्या गटाच्या मेळाव्यात ते बोलत होते. राष्ट्रवादीचे ३१ आमदार यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादीवर ही वेळ का आली? मी राजकीय जीवनामध्ये काम करत असताना साहेबांच्या छत्रछायेखाली आणि मार्गदर्शनाखाली तयार झालो. साहेब आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आहे. शेवटी एखादा पक्ष आपण कशाकरीता स्थापन करतो. लोकांची विकासाची कामी होण्याकरीता. सर्व जाती-धर्माला न्याय देण्यासाठी. आपल्या वरिष्ठ नेत्यांनी सुरुवात १९६२ला केली. १९७२ला राज्यमंत्री झाले, १९७५ला मंत्री झाले. १९७८ला अशाच पद्धतीने एक प्रसंग उद्भवला आणि त्यावेळेस आपल्या वरिष्ठ नेत्यांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार बाजूला करून पुलोद स्थापन केला. त्यावेळेस साहेब ३८ वर्षांचे होते. त्या दिवसापासून महाराष्ट्राने साथ दिलेली आहे. प्रत्येकाचा काळ असतो. इथे बसणाऱ्या प्रत्येकाच्या वडीलधाऱ्यांचा काळ असेल. आपण साधारण वयाच्या पंचविशीपासून साधारण ७५पर्यंत उत्तम पद्धतीने काम करू शकतो. शरद पवार आजही माझे आदर्श आहेत. माणूस वयाच्या साठीनंतर रिटायर होतो. पण, आज ८० झाली, ८२ झाली, ८३ झाली. कधीतरी थांबणार की नाही? अलीकडे राजीनामा दिला. नंतर मागे घेतला. मागेच घ्यायचा होता तर मग दिला कशाला, असा सवाल त्यांनी केला.

आम्ही कुणी कामात कमी आहोत का? कोणाचा आदर करायला कमी आहोत का? प्रशासनावर माझी पकड आहे की नाही हे महाराष्ट्र जाणतो. पहाटे कामाला सुरुवात करतो, हे कशाकरीता? महाराष्ट्र पुढे जावा. मला मानापासून वाटत होतं की आपला पक्ष वाढला पाहिजे. भाजपने २०१४ साली सांगितलं होतं की राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपने 16-16-16 जागा  लढवाव्यात.  नितीन गडकरींची इच्छा होती. मात्र तसं होऊ शकलं नाही, असेही ते म्हणाले.

२०१४ साली वानखेडे स्टेडिअमवर देवेंद्र फडणविसांच्या शपथविधीला आम्हाला जायला सांगितलं. जर त्यांच्यासोबतच जायचं नव्हतं तर का तिथे आम्हाला पाठवलं? २०१७लादेखील असाच प्रयत्न झाला होता. वर्षा बंगल्यावर बैठक झाली होती. राष्ट्रवादीकडून मी, जयंत पाटील, सुनिल तटकरे आणि छगन भुजबळ उपस्थित होतो. भाजपकडून सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. तेव्हा भाजप म्हणाले आम्ही २५ वर्षं शिवसेनेसोबत होतो आणि आम्ही त्यांची साथ सोडणार नाही. त्यांनंतरही देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात पाच बैठका झाल्या. मात्र आम्हाला सांगण्यात आलं की, बाहेर काहीच बोलायचं नाही. मी उपमुख्यमंत्री असताना माझ्याच केबीनमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी एक पत्र ड्राफ्ट केलं. विधानसभेचे ५३ आमदार आणि परिषदेच्या इतर आमदारांनी त्यावर सह्या केल्या होत्या. तेव्हा आपापली कामं व्हायची असतील तर सत्तेत सहभागी व्हावे, अशीच यांची भूमिका होती, असेही अजित पवार यांनी सांगितले.

आम्हीही पक्ष बांधला. आम्हालाही लोक ऐकतात. आम्हीही नेते आहोत. जर आंबेगावात पवार साहेब सभा घेणार आहेत. तसे झाले तर मलाही प्रत्युत्तर म्हणून सात दिवसांनी सभा घ्यावी लागेल. एका आमदाराला त्यांनी म्हटलं पाहतोच तू जिंकून कसा येतो.. असं आपल्या कार्यकर्त्याला बोलतात का? परिवार आहे तो आपला. आज माझ्यावर जी वेळ आली आहे ती कुठल्याही परिवारावर येऊ नये. माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याला जीवात जीव असेपर्यंत अंतर देणार नाही. पवारांनी स्वतः आम्हाला सांगितलं की 2024 साली नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही. विधानसभेच्या 90 जागा आपण लढवणार. लोकसभेच्याही जास्त जागा लढवणार आहोत, असेही ते म्हणाले.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content