Wednesday, October 23, 2024
Homeमाय व्हॉईसबाबा सिद्दीकींची हत्त्या...

बाबा सिद्दीकींची हत्त्या नेमकी झाली तरी कशासाठी?

गेल्या शनिवारी माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची वांद्र्याच्या खेरनगर परिसरात रात्री हत्त्या करण्यात आली. दुर्दैवी हत्त्येला सात दिवस पूर्ण होत आहेत. पोलिसांनी काही संशयितांना पकडले असले तरी पोलिसी सूत्रांनुसार जे चित्र जनतेपुढे आले आहे ते मात्र पूर्ण निराशाजनक आहे, असे मानावयास बरीच जागा आहे.

बाबा सिद्दीकी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार होते. तसेच ते तब्बल १५ वर्षे वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करत होते. बाबा सिद्दीकी माजी आमदार व त्यातही सत्तारूढ राजकीय पक्षाचे असल्याने पोलिसांनीही त्वरित हालचाल व तपास करून काही संशयितांना पकडण्यात यश मिळवले आहे यात वाद नाही. बाबा प्रसिद्ध अभिनेता सलमान खानचा निकटवर्तीय असल्याने जो सलमानचा शत्रू तोच बाबाचा शत्रू हा न्याय लावून या हत्त्येमागे कुविख्यात लॉरेन्स बिष्णोई असल्याचे दुसऱ्याच दिवशी जाहीर केले गेले. झाले.. दुसऱ्याच दिवसापासून सर्वच माध्यमांनी बिष्णोई राजस्थानमधून कसा आला आणि जागतिक माफिया कसा बनला याच्या अद्भुतरम्य कथा जनतेला सांगण्यास सुरुवात केली. इतक्यानेच भागले नाही म्हणून काहींनी दिल्ली वर्तुळातील कुजबुजीचा आधार घेत बिष्णोई देशाच्या ‘रॉ’ संघटनेसाठी काम करत असल्याचा बेमिसाल शोधही लावला. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीचा शोध घेण्यासाठी सरकार बिष्णोईचे सहकार्य घेतही असेल, त्यात गैर काही नाही. पण याचा अर्थ लगेच गृहमंत्रालय त्याच्याशी नरमाईने वागत असल्याचा निष्कर्ष काढणे आततायीपणाचे ठरेल.

सिद्दीकी

सलमान खान फार्मचा परिसर पोलिसांनी ताब्यात घ्यावा. सलमान खानच्या पाली हिल येथील बंगल्याबाहेरील शूटआऊटपासून त्याचे पनवेल येथील फार्महाऊस जास्तच प्रकाशात येऊ लागले आहे. इतकेच काय बंगल्याबाहेर गोळ्या झाडणारा काही काळ त्या फार्महाऊसमध्ये कामही करत होता. अखेर तो सापडलाही पनवेलमध्येच! कालही जे संशयित पकडण्यात आले त्यातील एक जणही पनवेलमधलाच आहे. इतरही संशयित आजूबाजूच्या परिसरातच किंवा पाच-दहा किलोमीटर्सच्या परिसरात राहणारेच आहेत. नवी मुंबई आणि पनवेलच्या आजूबाजूचा परिसर पोलिसांनी व यंत्रणानी पिंजून काढला तर लपलेले अनेक गुन्हेगार पोलिसांना सहज सापडतील असे वाटते. या विस्तीर्ण प्रदेशात असलेली लहानमोठी गेस्ट हाऊसेस गुन्हेगारांची लपायची ठिकाणे आहेत हे उघड गुपित आहे.

पाच कोटींची माहिती द्यायलाच हवी होती का?

मुंबई पोलिसांनी एका वाहतूक हवालदाराला आलेला मेसेज व्हायरल करून पोलीस खाते हा तपास किती गांभीर्याने घेत आहे तेच सिद्ध करत आहे की काय असे वाटू लागले आहे. वास्तविक ही माहिती, माहिती म्हणून ठीक असेलही. पण सायबर विभागाकडे याची तक्रार करण्याआधी ती माध्यमांकंडे जाते हे गंभीर आहे. या धमकीची कसून चौकशी करून संबंधिताना कडक सजा होणे गरजेचे आहे.

सिद्दीकी

पुन्हा तीच काळी गाडी!

काही महिन्यांपूर्वी ईडीची एक नोटीस बाबा सिद्दीकी यांना आली होती. त्या नोटिसीचे पुढे काय झाले हे आता ईडीलाच माहित नसावे असे वाटते. योगायोगाची गोष्ट म्हणजे अशीच एक काळी गाडी पूर्वीच्या शिवसेनेचे यशवंत जाधव यांच्याकडे गेली होती. त्यानंतर ते मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी झाले. अशाच एका काळ्या गाडीच्या आगमन आणि निर्गमनानंतरच बाबा सिद्दीकी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले. ते जर राष्ट्रवादीत गेले नसते तर काँग्रेसकडून ते वांद्रे (प.) मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता होती. गेल्या चार वर्षांत बाबा अनेकदा लंडनला गेल्याचेही सूत्रांनी सांगितले.

बाबा सिद्दीकी हे काही शेकडो कोटींचे मालक असले तरी जागतिक स्तरावर गुन्हेगारी करणारा अट्टल गुन्हेगार गल्लीत चिंधीचोरी करणार नाही, असे गुन्हेगारी जगताचा कानोसा घेतला असता समजले. गुन्हेगारांचा शेवटी पैशाशीच संबंध असतो. मग तो कुठूनही मिळेना का! “Society prepares the crime; the criminal commits it”, या वचनानुसार बाबा सिद्दीकी यांनीही समाजात असलेल्या गुन्हेगारीचा आपल्या वैयक्तिक व राजकीय फायद्यासाठी खुबीने उपयोग करून ते कोट्यवधीच्या संपत्तीवर आरुढ झाले होते, अशी चर्चा आहे. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलताना बाबा यांचे सुपुत्र झिशान सिद्दीकी यांनीही झोपडट्टी पुनर्वसन प्रकल्पांचा उल्लेख केला आहे, ते उल्लेखनीय आहे. कारण आम्ही तर पहिल्या दिवसापासून ही हत्त्या एसआरए प्रकल्पाच्या वादातूनच झाल्याचे सांगत आहोत. याच पुनर्वसनाच्या वादात खुद्द झिशान यांच्यावरही आरोप करण्यात आलेले आहेत. निर्मल नगरच्या वाढत्या झोपड्या यामागचे खरे कारण असल्याचे बोलले जाते.

सिद्दीकी

सरकारी वसाहतीच्या जवळ असलेल्या बांद्रा (पु) येथील खेरवाडी व निर्मल नगर हे कित्येक वर्षांपासून बरेचसे झोपडपट्टी व अनधिकृत चाळींचे माहेरघर आहे. पूर्वी या परिसरात एडवीन व अंजुम या दोन भाईंची दादागिरी चालत असे. याच भागात कुख्यात काळ्या अँथनी व काल्या बाबू यांनी आपली दहशत वाढवली होती. (यातील काल्या बाबू, एका माजी खासदाराचा बॉडीगार्ड होता असे समजले.) काळ्या अँथनीला यमसदनी पाठवल्यानंतर अंजुमच्या मदतीने बाबा यांनी शेकडो झोपड्या व चाळी अधिकृत करून घेतल्या आणि यातून रग्गड पैसा केला, अशी आरोपवजा चर्चा या परिसरात फिरल्यावर ऐकायला मिळाली.

बाबा सिद्दीकी यांनी त्यांचा मतदारसंघ असलेल्या वांद्रे परिसरातले रियल इस्टेट क्षेत्रातील आपले साम्राज्य साम, दाम, दंड, भेद या नीतीनेच उभारले असल्याचे अनेकांनी सांगितले. अनेक छोटीमोठी घरे बळाकवून वा त्यांना धमकावून ताब्यात घेतली. तेथे गगनचुंबी इमारती बांधल्या, असा आरोप सर्रास केला जात आहे. एक मटण निर्यातदार मात्र त्याला पुरून उरला होता, असे त्या मतदारसंघात सांगतात. यातले अनेक भूखंड सरकारी लिजवर आहेत. त्यामुळे त्याबद्दल तक्रारी गेलेल्या नाहीत, असेही बोलले जाते. त्यामुळे आता पुन्हा प्रश्न निर्माण होतो तो बाबांची हत्त्या नेमकी झाली कशासाठी?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

बाबा सिद्दीकी यांना उंचावरून टिपले?

 अजित पवार गटाचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्त्येची जागा व आजूबाजूचा परिसर पाहता हल्लेखोरांना बाबा जणू 'आहेरा'सारखेच आणून दिले, असा दाट संशय येण्यासारखी परिस्थिती नक्कीच आहे असे खेरवाडी परिसरात फिरले असताना वाटले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबा आपले पुत्र आमदार...

बाबा सिद्दीकींची हत्त्या दीड एकराच्या भूखंडासाठी?   

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्त्या राजकीय वा टोळीयुद्धाचा प्रकार नसून सर्व काही मुंबईतल्या दीड एकराच्या भूखंडासाठीच झाल्याचा संशय बळावतोय. सांताक्रूझ-अंधेरीच्या (पू.)च्या एका टोकाला असलेल्या साकीनाका विभागातील झोपड्या व छोट्या कारखाने तसेच गॅरेजनी किचाट झालेला सुमारे...

बाबा सिद्दीकींच्या हत्त्येमागे बिष्णोई गँग की एसआरए? 

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अगदी तोंडावर असताना अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या वांद्रे विधानसभा मतदारसंघात गर्दीच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचा भररस्त्यात गोळ्या घालून खून करण्यात येतो ही खरोखरच लाजिरवाणी घटना आहे. त्याहीपेक्षा संतापजनक गोष्ट म्हणजे तपास होण्याआधीच खून...
Skip to content