Homeपब्लिक फिगरगणेशोत्सवामुळे कोरोना, हे...

गणेशोत्सवामुळे कोरोना, हे कोणत्या कंपांऊंडरने सांगितले?

पश्चिम बंगालमध्ये जसे तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दूर्गापूजेवर निर्बंध आणून हिंदू सणांचे महत्त्व कमी करत आहेत, त्याचप्रमाणे राज्यातले ठाकरे सरकार येथे गणेशोत्सवावर बंधने लादून हिंदू सणांचे महत्त्व कमी करत आहेत, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी आज प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केला. गणेशोत्सव तोंडावर आला आहे, कोकणात उत्सवासाठी कसे जायचे हे अजून मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेले नाही. गणेशोत्सवामुळे कोरोना पसरतो हे त्यांना कोणत्या कंपांऊंडरने सांगितले, देव जाणे, असा टोलाही त्यांनी लगावला.

राज्यातल्या विविध गणपती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आमदार राणे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. त्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी ते बोलत होते. हितेश जाधव, अभिषेक परब, प्रणिल पांचाळ, जितेंद्र भोईर, आदेश मोघे, अनिल कांबळी आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता.

गेल्या वर्षी ठाकरे सरकारने गणेशोत्सवावर असेच निर्बंध लादले होते. तीच नियमावली आता तारीख बदलून पुन्हा लादण्यात आली आहे. हिंदू आपले सण, उत्सव कसे साजरे करू शकणार नाहीत हे सरकार पाहात आहे. ही नियमावली पाळायची म्हणजे गणेशोत्सव अजिबातच साजरा करता येणार नाही. मोठ्या मूर्ती आणता येणार नाहीत. मिरवणुका काढता येणार नाहीत. गणेशोत्सवातला उत्साह कसा निकालात निघेल, याची पूर्ण काळजी या निर्बधांमध्ये घेण्यात आली आहे, असे राणे म्हणाले.

आता तर घरातल्या मूर्तीही सहा इंचांच्या असाव्यात असा फतवा काढण्यात आला आहे. त्या विसर्जित करण्यासाठीही महापालिकेची पथके घरी जाणार आहेत. म्हणजे, ज्या काही लहानलहान मिरवणुका निघत होत्या त्याही बंद करण्याचा नियोजनबद्ध डाव सरकारने आखला आहे. गणेशोत्सव साजरा करताना कोरोना होतो, असे सरकारचे म्हणणे आहे. काल बेस्टच्या कार्यक्रमाला स्वतः मुख्यमंत्री उपस्थित होते. तेथे झालेल्या गर्दीत कोरोना होत नाही. मेट्रोमधल्या गर्दीने कोरोना होत नाही. पार्ट्यांच्या गर्दीने कोरोना होत नाही. अजितदादांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन होते, तेव्हा होणाऱ्या गर्दीने कोरोना होत नाही. मात्र, गणेशोत्सवाने कोरोना होतो, असा ठाकरे सरकारचा दावा आहे, असे त्यांनी सांगितले.

ठाकरे सरकार हिंदू धर्मियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करू पाहात आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये इतर धर्मियांचे सण झाले. परंतु त्यांच्याकडून कोणतीही तक्रार आली नाही. कारण, त्यांच्यावर कोणतेच निर्बंध नव्हते. फक्त हिंदूधर्मियांच्या सणांवरच बंदी का, निर्बंध का, असा सवालही नितेश राणे यांनी केला.

गेल्या दीड-दोन वर्षांपासून मुख्यमंत्री घरी बसून आहेत. त्यामुळे त्यांना वाटते सर्व जनतेने आपल्यासारखेच घरी बसावे. सण, उत्सव साजरे करावे. या काळात आपण मुख्यमंत्र्यांना २५ ते ३० पत्रे लिहिली. एकाही पत्राचे उत्तर त्यांनी दिले नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आपण काँग्रेसमध्ये होतो. तेव्हा आपण त्यांना पत्रे लिहिली होती. परंतु सर्व पत्रांची उत्तरे आपल्याला मिळाली होती. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या या निष्क्रीयतेमुळेच आपण आज राज्यपाल महोदयांना भेटून निवेदन दिले, असेही ते म्हणाले.

आरती केली की म्हणे ध्वनीप्रदूषण होते. दिवसातून चार वेळा लाऊडस्पीकरवर भोंगे वाजतात तेव्हा ध्वनीप्रदूषण होत नाही, असा सवाल करत त्यांनी सरकारवर टीकाही नितेश राणे यांनी यांनी केली.

तेजसने बाळासाहेबांचा बाणा दाखवावा

तेजस ठाकरे जर राजकारणात येत असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छाच आहेत. मात्र, त्यांनी बाळासाहेबांचा करारी बाणा दाखवावा, असे आवाहन आमदार राणे यांनी केले. जाहिरात देणाऱ्यांनी तेजस यांची विव्हियन रिचर्डशी तुलना करून त्यांचे राजकीय प्रमोशन केले की दोन भावांमध्ये वाद लावणाऱ्या शुभेच्छा दिल्या, असा सवालही त्यांनी केला.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content