Homeपब्लिक फिगर२५ जिल्ह्यांतल्या जनतेला...

२५ जिल्ह्यांतल्या जनतेला प्रतीक्षा मुख्यमंत्र्यांच्या सहीची!

कोविडची रूग्णवाढ तसेच रूग्णवाढीच्या दरात कमतरता राखलेल्या मुंबईसह राज्यातल्या २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंधांत शिथिलता आणली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर एक-दोन दिवसांत याबाबतचे आदेश जारी केले जातील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज प्रसिद्धीमाध्यमांना दिली. मात्र, लोकल प्रवासातल्या निर्बंधांमध्ये कितपत शिथिलता द्यायची याचा निर्णय मुख्यमंत्र्यांवर सोपवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्क्षतेखाली आरोग्य विभागाचे मंत्री, अधिकारी तसेच कोविडच्या टास्क फोर्सबरोबर बैठक झाली. या बैठकीत कोविड कमी असलेल्या २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये नेमकी कोणती व कशी सूट द्यायची आदी बारकावे एक-दोन दिवसांत निश्चित केले जातील व मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर आदेश जारी केले जातील, असे ते म्हणाले.

कोकणातले रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग व पालघर, मराठवाड्यातला बीड, उत्तर महाराष्ट्रातला अहमदनगर आणि पश्चिम महाराष्ट्रातले सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांमधले कोविडचे प्रमाण कमी होत नाही. काही ठिकाणी, आठ जिल्ह्यांमध्ये तर तो जास्त वाढत आहे. त्यामुळे या ११ जिल्ह्यांना निर्बंधांच्या तिसऱ्या टप्प्यातच ठेवण्यात येईल. याऊलट तेथे आवश्यकतेनुसार निर्बंध कडक करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी वा आयुक्तांना देण्यात आल्या आहेत, असेही टोपे यांनी सांगितले.

२५ जिल्ह्यां

निर्बंध शिथील करण्यात येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सध्या सुरू असलेला शनिवार व रविवारचा लॉकडाऊन फक्त रविवारपुरताच केला जाईल. शनिवारी संध्याकाळी चार वाजेपर्यंत व्यवहार चालू राहतील. हॉटेल, सिनेमागृह, एसी हॉल, व्यायामशाळा आदी ५० टक्के क्षमतेने चालू करण्यास मुभा देण्यात येईल. मात्र, येथील कर्मचाऱ्यांचे १०० टक्के लसीकरण झालेले असावे. लग्नकार्य, समारंभ, राजकीय कार्यक्रम आदींनाही सशर्त परवानगी देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

लोकलबाबत निर्णय मुख्यमंत्र्यांचा

मुंबईतल्या लोकलच्या प्रवासावरील निर्बंध शिथील करायचे की नाहीत याबद्दल मुख्यमंत्री निर्णय घेतील. काही जणांच्या मते लसीचे दोन डोस घेतलेल्यांना रेल्वेतून प्रवास करायला परवानगी द्यावी. मात्र, काही जणांचा याला विरोध आहे. कोरोना वाढणार नाही याची दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या विषयाचा सर्व बाजूंनी विचार केला जाईल, असे टोपे यांनी सांगितले.

तिसऱ्या लाटेसाठी तयार

कोविडच्या तिसऱ्या लाटेचा विचार करून ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध करण्याबाबत स्वयंपूर्ण राहणे, डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना पुरेसे प्रशिक्षण देणे आदी गोष्टी करण्यात आल्या आहेत. कोरोनावरील उपचारांची कार्यपद्धती आता निश्चित झाली आहे. त्यामुळे तिसऱ्या संभाव्य लाटेला तोंड देताना फारशी अडचण येणार नाही. मात्र, रूग्णांनी अंगावर दुखणे काढू नये. बाधेचे लवकर निदान झाल्यावर परिणामकारक उपचार करण्यात येतात, असेही ते म्हणाले.

Continue reading

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...
Skip to content