तब्बल सात वर्षानंतर उद्या मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे. आता मतदानाला सुरुवात झाली आहे. निवडणुकीत काय होईल, काय नाही यांचे काही अंदाज माध्यमे आणि वर्तमानपत्रांनी वर्तवलेले आहेत. हे अंदाज खरे की खोटे हेही अवघ्या काही तासांत स्पष्ट होणार आहे. महायुतीतील भाजप, शिंदेंची शिवसेना व अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे, कारण राज्याची सत्ता त्यांच्याकडे आहे. उलट शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे महापालिका बरखास्त होण्याआधी तब्बल ३० वर्षे महापालिकेची सत्ता हॊती. मजेशीर बाब म्हणजे त्या ३० वर्षांच्या सत्तेत अगदी पहिल्या दिवसापासून भारतीय जनता पक्ष त्या सत्तेत भागीदार होता. अगदी मांडीला माडी लावून पालिकेचा कारभार करत होते, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. असे असतानाही भ्रष्टाचाराची घोरपड महापालिकेच्या बुरुजावर फेकून आधुनिक शेलारमामा महापालिका काबीज करण्याचे स्वप्न रंगवीत आहेत. सत्तेची स्वप्ने रंगवणे व त्यात मशगुल होणे बिलकुल चुकीचे नाही. प्रत्येक राजकीय पक्षाला व जो निवडणुकीत सहभागी होतो. त्याला स्वप्ने रंगवण्याचा अधिकार आहेच. पण सबुरीने शेलारमामा… बाकीचे जाऊ दे, जुना काळही मागे सारू. पण आपण पालिकेच्या स्थायी समितीत सदस्य म्हणून बसत असतानाही या भ्रष्ट व्यवस्थेतील ‘भ्र’ ही कधी दिसलेला नव्हता, असे स्थायी समितीच्या चिटणीस टिपणावरून दिसले. वास्तविक काही काळ आपण भाजप मुंबई शाखेचे अध्यक्षही होतात. तेव्हाही कारभारासंबंधात आपण काही सुधारणा सुचवल्याचे वाचनात नाही.
शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती तुटल्यावर शिवसेनेवर टीका करण्याचा अधिकार भाजपाला निश्चित आहे. तो त्यांनी करावाही, त्याला ना नाही. परंतु बरोबर सत्तेत असताना घेतलेल्या निर्णयाविरुद्ध एकदाही तोंड न उघडलेल्यांना मात्र टिकेचा अधिकार नसतो, हे माझ्यासारख्या सामान्य माणसाने सांगावे, हे बरे दिसत नाही. बरं तुमच्याच पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने आम्ही हिंदुत्वासाठी त्यांच्याबरोबर होतो असा केविलवाणा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. तो जनतेला कितपत रुचेल याबाबत शंकाच आहे. एकूणच गैरकारभाराचा मुद्दा आपल्या अंगलट येईल असे लक्षात येताच कोरोना काळातील भ्रष्टाचार बाहेर काढण्यास सुरुवात केली. कोरोना काळापासून केंद्रात भाजपचेच सरकार आहे. ते अजूनही आहे. मग केंद्रीय यंत्रणानी या गैरकारभाराचा पडदा साफ का नाही केला? केंद्राचे सोडा आता राज्यात सुमारे चार वर्षे महायुतीचेच सरकार आहे. मग त्यांनीतरी शिवसेनेला उघडे पाडण्याचा प्रयत्न का केला नाही? एक-दोन प्रकारणांबाबत क्षुल्लक अटका करून व खटला भरून गैरकारभार सिद्ध करता येत नाही, हे आतापर्यंत सरकारच्या लक्षात यायला हवे होते. त्या खटल्यातील काही संशयितांना पक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी त्यांना जणू पावनच करून घेतलेले दिसते.

मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता येण्याआधी सुमारे १०/१५ वर्षे पुरोगामी लोकशाही आघाडीच्या ताब्यात पालिका होती. या पुलोदमध्ये भाजपही सहभागी होती. सहभागीच नव्हती तर भाजप सदस्यांनी काही काळ स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषवलेलीआहेत. म्हणजे आपण सत्तेत असलो की सर्व आलबेल आणि ठाकरेंची शिवसेना असली की गैरकारभाराचा डोंगरच, असा तोलबोल योग्य दिसतो का? याचा विचार सामान्य जनतेनेच करायला हवा. उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात एकसंघ शिवसेनेत खिंडार पडल्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुका वगळता विधानसभा व नगरपरिषद निवडणुकांच्या निकालावरून मातोश्री व त्यांच्या सहकारी पक्षांना मोठा हादरा बसला हे मान्यच केले पाहिजे. मग काही नेते मातोश्रीच्या जवळ असलेल्या नेत्यांना टार्गेट करू लागले तेव्हाही मातोश्रीने सबुरीचे धोरण अवलंबले ते अनेकांना पसंत पडलेले नव्हते. (पक्षप्रमुख आजारी होते हेही कारण असू शकते.) पण एकंदरीत पक्षफुटीचा शॉक जबरदस्त होता यात शंकाच नाही. यातूनच मग चढाओढ सुरु झाली. एक लक्षात घेतले पाहिजे की कोरोना काळातील गैरप्रकारांना उपमुख्यमंत्री अजित पवार हेही मर्यादित अर्थाने जबाबदार ठरतात, कारण हेही त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात सहभागी होते.
दोन्ही बाजूच्या गैरप्रकार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामान्य मुंबईकर कंटाळला आहे. त्याला शहरातील जीवन सुसह्य हवे आहे. आर्दशातील चांगले वा उत्तम त्याच्या ध्यानीमनीही नाही. गल्लीतील कचरा उचलला गेला पाहिजे, नळाला नियमित पाणी आले पाहिजे (चोवीस तास पाण्याचे त्याचे स्वप्नच नाही), रस्ते खड्डेमुक्त हवेत, बेस्ट बसेस वेळेवर याव्यात, उपनगरातील कचराडेपो दुर्गंधीमुक्त असावेत, आदी माफक अपेक्षा मुंबईकरांच्या आहेत. मराठी, गुजराथी, हिंदी या वादात पडायला त्याच्याकडे वेळच नसतो. अर्धा वेळ कामाच्या ठिकाणी पोहोचायला जातो. तितकाच परत घरी येताना जातो. घरी पोहोचेपर्यंतच रात्रीचे नऊ वाजतात, या गोष्टींकडे पाहायलाही त्याच्याकडे वेळ नसतो! कुणीही निवडून येवो. शहरात अजून सुधारणा झाल्या पाहिजेत. दक्षिण मुंबई, दादर, परळ, बांद्रा (दोन्ही) अंधेरी, पार्ले, घाटकोपर, मुलुंड आदी भाग म्हणजेच काही मुंबई नाही. ती कालिना परिसरात आहे, कुर्ल्यातील दोन्ही बाजूंनी खोडलेल्या रस्त्यात आहे. भांडुपमधील गर्दीच्या गल्लीत आहे., मुलुंड पूर्व स्थानकाच्या चिंचोळ्या गल्लीत आहे. जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्त्यावरील बकवास बसथांब्यात आहे. गोवंडी-मानखुर्दमधील कचऱ्याच्या अवतीभोवती आहे. आग्रीपाड्याच्या छोट्या गल्लीतही आहे, हे विसरून चालणार नाही. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या जेव्हा हे लक्षात येईल तेव्हाच मुंबई आणि उपनगरातील समस्या कमी होतील. अन्यथा ‘अंध अंधारी बैसले, डोळसा गांधारीचा वसा’ अशी परिस्थिती निर्माण होईल..
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

