मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातला शिक्षा भोगत असलेला आरोपी सरदार शाह वली खान १९९३ सालापासून आतापर्यंत तुरूंगात असताना त्यांच्याबरोबर जमिनीचे व्यवहार करणारे राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी २००५ साली हा व्यवहार कसा केला, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार आशिष शेलार यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला.
आज सकाळी नवाब मलिक यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर विविध स्वरूपाचे आरोप केले. यात मुन्ना यादव, हाजी अरफात शेख तसेच हाजी हैदर यांच्याशी त्यांचे संबंध असल्याचा आरोप होता. २००८ साली झालेल्या नोटबंदीनंतर बनावट चलनांच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला इम्रान आलम शेख हाजी अरफात यांचा भाऊ असल्याचे त्यांनी म्हटले होते. रियाझ भाटी याचा फडणवीस यांच्याबरोबरचा फोटो दाखवून त्याचा फडणवीस यांचा संबंध असल्याचा आरोपही मलिक यांनी केला होता. हे सारे आरोप फेटाळून लावल्यानंतर शेलार यांनी हा सवाल केला.
सरदार शाह वली खान यांच्या सह्या घेण्यासाठी मलिक तुरूंगात गेले होते की, तो तुरूंगाबाहेर आला होता? आपण हा व्यवहार कसा केला? त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार होते. कायद्यानुसार सरदार शाह वली खान याची मालमत्ता शासनाकडून जप्त केली जाते. त्यामुळे हा व्यवहार करून मलिक यांनी ही मालमत्ता आपल्याकडे वळवली का? या व्यवहारामागचा मास्टरमाईंड ते स्वतः होते की आणखी कोणी, अशा सवालांची सरबत्ती त्यांनी केली.
राजकीय सोयीसाठी दुर्लक्ष नको
भाडेकरू म्हणून हस्तांतरण करताना व्यवहाराच्या २५ टक्के रक्कम सरकारजमा करावी लागते. येथे रेडीरेकनर दराच्या १० टक्के दरात व्यवहार करण्यात आला. हा व्यवहार कसा झाला? सलीम पटेल, हा दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्याबरोबर कार्यरत होता. त्याच्याविरोधात २००५ सालाच्या पूर्वीही गुन्हे दाखल होते. त्याच्याबरोबर आपण व्यवहार कसा केला, असा सवालही त्यांनी केला. दाऊदची गँग या सरकारच्या काळात पुन्हा डोके वर काढू लागली आहे. आमच्याशी गद्दारी करून, हिंदुत्व सोडून सत्तेसाठी घरोबा केला असला तरी राजकीय सोयीसाठी दुर्लक्ष न करता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर कारवाई करावी, अशी मागणीही शेलार यांनी केली.
हाजी अरफात, हाजी हैदरवर गुन्हेच नाहीत
मुन्ना यादव, हाजी अरफात, हाजी हैदर भाजपाचे कार्यकर्ते आहेत. हाजी अरफात तसेच हाजी हैदर यांच्याविरोधात गुन्हेगारी कारवायांचे कोणतेही गुन्हे नाहीत. राष्ट्रवादी सत्तेत आहे. गृहमंत्री त्यांचे आहेत. तरीही गेल्या दोन वर्षांत एक साधा अदखलपात्र गुन्हाही ते या दोघांविरूद्ध नोंदवू शकलेले नाहीत. बनावट नोटांच्या प्रकरणातील आरोपी इम्रान हाजी अरफात यांचा भाऊ आहे आणि त्यावेळी तो काँग्रेसचा कार्यकर्ता होता. सध्या तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, असे त्यांनी सांगितले.

फोटो तर मुख्यमंत्र्यांबरोबरचेही आहेत
रियाझ भाटीबरोबरचा फोटो दाखवून मलिक यांनी कोणाचाही संबंध जोडू नये. फोटो आम्हीही दाखवू शकतो, असे सांगत शेलार यांनी रियाझ भाटीचे उद्धव ठाकरे, शरद पवार, आदित्य ठाकरे यांच्याबरोबरचे फोटो माध्यमांपुढे मांडले. या फोटोतली नावे घेऊन आपल्याला सनसनाटी निर्माण करायची नाही, असे ते म्हणाले. रियाझ भाटी सध्या गायब आहे. सचिन वाझेच्या वसुली गँगमध्येही त्याचे नाव पुढे आले होते. त्यामुळे राष्ट्रवादीने तर रियाझ भाटीला गायब केले नाही ना, असा सवालही शेलार यांनी केला. मुन्ना यादव स्वतः त्यांच्यावरील आरोपांचा खुलासा करतील, कारण त्यातही राष्ट्रवादीचा संबंध आहे, असे ते म्हणाले.
नवाबी पातळीवर येऊ नका
नवाब मलिक यांचे मानसिक संतुलन दिवसागणिक बिघडत चालले आहे. कदाचित हर्बल तंबाखूचा पुरवठा बंद झाला असावा. जावयाच्या प्रेमापोटी, आपले म्हणणे पटवून देण्यासाठी मलिक यांनी असे बोगस आरोप करण्यापर्यंतच्या नीच पातळीवर म्हणजेच नवाबी पातळीवर जाऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले.
अल्पसंख्याक नेतृत्त्व संपवण्याचा डाव
नवाब मलिक यांनी सुरूवातीला आर्यन खानला अडचणीत आणले. नंतर शाहरूख खानला अडचणीत आणले. आता तर ते अल्पसंख्याक समाजाचे नेतृत्त्वच बदनाम करायला निघाले आहेत. काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांना त्यांनी खेचले. आता हाजी अरफात, हाजी हैदर यांच्या बदनामीचे प्रयत्न होत आहेत. आपल्या नेतृत्त्वाला खूष करण्यासाठी त्यांनी हा कट रचला आहे. विविध राजकीय पक्षांबरोबरच अल्पसंख्याक समाजानेही याची दखल घ्यावी, असे आवाहनही शेलार यांनी केले.
भ्रष्ट माणसानेच केली भ्रष्टाचाराची व्याख्या
ज्या न्या. पी. बी. सामंत यांच्या आयोगाने भ्रष्टाचाराची व्याख्या केली. नवाब मलिक यांना भ्रष्ट ठरवले. ज्या आयोगाचा अहवाल राज्य सरकारने स्वीकारला. त्यांनी केलेली व्याख्या बदलण्याचे काम मलिक करत आहेत. लाच घेणारा तसेच देणारा गुन्हेगार असतो हे कायद्याने मान्य केले असताना मलिक लाच देणे हा गुन्हा नसल्याचे सांगत आहेत, असेही ते म्हणाले.

