कुठल्याही जोडप्याला लग्नानंतर वर्ष-दीड वर्षात मूल झाले नाही तर लगेच कुटुंबियांकडून, मित्रमंडळींकडून विचारणा होते, अजून पाळणा नाही हलला? काय प्लॅनिंग का? वगैरे.. वगैरे.. अपत्य होणे हे नेहमी त्या जोडप्याच्याच हातात नसते. काहीवेळा काही शारीरिक समस्यांमुळे मूल होत नाही. पण मूल न होण्याचे सगळे खापर त्या मुलीवर फोडले जाते आणि मग सुरू होतो तिचा वनवास. बरं.. मूल झाले आणि ती मुलगी असली तरीही कुटुंबियांचा रोष पत्करावा लागतो. खरेतर आजच्या काळात मुलगा असो किंवा मुलगी, दोघेही तितकेच कर्तबगार असतात. उलट आई-वडिलांच्या म्हातारपणी अनेकदा मुलीच त्यांच्याकडे लक्ष देतात, त्यांचा सांभाळ करतात.
गेल्या काही वर्षांपासून मूल न होण्यावर, वंधत्व्यावर, शारीरिक समस्येवर अनेक उपचार सुरू झाले आहेत. पूर्वी केवळ परदेशात किंवा मुंबईसारख्या शहरात हे उपाय व्हायचे. पण आता अनेक शहरांत, अगदी ग्रामीण भागात हे उपचार होतात. भारतात 1986 साली डॉ. इंदिरा हिंदुजा, ह्या मुंबईतल्या केइएम हॉस्पिटलमधील स्त्रीरोग तज्ज्ञांनी पहिल्या टेस्टट्यूब बेबीला जन्माला घातले. त्यानंतर ह्या विषयात अनेक संशोधनं झाली. आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा जन्म झाला आणि गेल्या 40 वर्षांत ह्या तंत्राने अनेक अपत्यहीन जोडप्यांचे आयुष्य बदलले. अपत्य झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबात आनंद पसरला. खरेतर हे तंत्रज्ञान आता सर्वदूर पसरले आहे. पण हे उपचार खूप खर्चिक आहेत. काही लाखांच्या घरात ह्या उपचारांचा खर्च येतो. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी ते जोडपे प्रसंगी कर्ज काढून हे उपचार करतात आणि अपत्यप्राप्तीचा आनंद मिळवतात.

चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी, आमीर खान, शाहरुख खानपासून, तुषार कपूर आणि करण जोहरपर्यन्त ह्या तंत्रज्ञाचा वापर करून सरोगेट मदरद्वारे अपत्यप्राप्ती करून घेतली आहे. आयव्हीएफ तंत्रज्ञानात दुसर्याच स्त्रीचे बिजाण्ड काढून त्याचा प्रयोगशाळेत नवर्याच्या स्पर्मशी संयोग करून ते बिजाण्ड त्याच्या पत्नीच्या गर्भाशयात सोडले जाते. मात्र त्या इच्छूक स्त्रीच्या गर्भाशयात काही समस्या असेल, ती तो गर्भ वाढवू शकत नसेल तर ज्या स्त्रीचे हे बिजाण्ड घेतात, तिच्याच गर्भाशयात तो गर्भ वाढवला जातो. ह्या प्रक्रियेला सरोगेट मदर असे म्हटले जाते. ह्या विषयावर अनेक मालिका, चित्रपट आणि पुत्र कामेष्टी किंवा कुसुम मनोहर लेले ह्यासारखी नाटकेही येऊन गेली आहेत. ह्या सगळ्या प्रक्रियेत महत्त्वाची व्यक्ती असते ती म्हणजे डोनर. ज्या स्त्रीच्या गर्भाशयातून बिजाण्ड काढले जाते ती व्यक्ती. अर्थात त्या स्त्रीला ह्याबद्दल भरपूर मोबदलाही दिला जातो. ही झाली ह्या प्रक्रियेची सर्वमान्य आणि कायदेशीर पद्धत.
गेल्या आठवड्यात बदलापूर येथे हे बिजांडाचे रॅकेट उघडकीस आले आहे, ते भयावह आहे. पैशाचे आमिष दाखवून अनेक तरुण मुलींना आणि स्त्रियांना बदलापूर येथील क्लिनिकमध्ये बोलवून त्यांचे बिजाण्ड काढले जाते आणि ते परस्पर विकले जाते. ह्या मुलींना फक्त 20-25 हजार दिले जातात आणि त्या बिजांडाची विक्री मात्र काही लाखांत केली जाते. पैशाची गरज असलेल्या गरीब घरातल्या मुली किंवा स्त्रिया ह्यासाठी घेतल्या जातात. खरेतर शारीरिकदृष्ट्या एका स्त्रीचे आयुष्यात केवळ एकदाच बिजाण्ड काढता येऊ शकते. मात्र ह्या क्लिनिकमध्ये ह्या मुलींचे बिजाण्ड अनेकदा काढली जातात. हे काम करणार्या ह्या क्लिनिकमधल्या नर्सेस प्रशिक्षितही नाहीत. तरीही हे काम तिथे बेकायदेशीररित्या चालू आहे. ह्या प्रकरणाचे धागेदोरे आता ठाण्यात आणि नाशिकमध्येही सापडले आहेत. ठाणे पोलिसांनी बदलापूर येथे धाड टाकून हा सगळा प्रकार उघडकीस आणला. आता महिला आयोगानेही ह्या प्रकरणाची दखल घेतली असून ह्या प्रकरणात चार महिलांना अटकही झाली आहे.
खरेतर गर्भलिंग निदान परीक्षेवर बंदी घालून एक दशक उलटून गेले. तरीही छुप्या मार्गाने ही परीक्षा चालूच आहे. तसेच ह्या आयव्हीएफ तंत्रज्ञानाचे झाले आहे. खरेतर, ह्या सर्व प्रक्रिया कायद्याने करणे आवश्यक आहेत. ज्या स्त्रीचे बिजाण्ड घेतले जाते तिच्याशी ह्याबाबत करार केला जातो. करार फक्त एकच बिजाण्ड काढण्याचा असतो. मात्र एकाचवेळी अनेक बिजाण्ड काढली जातात. अनेक मुलींची आणि स्त्रियांची ह्या प्रकरणात फसगत होते. मात्र, पैसे कमावण्याच्या नादात, कित्येकदा कुटुंबियांच्या नकळत, ह्या महिला बिजाण्ड काढून देण्यास तयार होतात. ह्या सगळ्या प्रकरणाची दखल पोलिसांनी आणि महिला आयोगाने घेतलीच आहे. पण खरी गरज आहे ती अशा महिलांना सावध करण्याची!
(लेखक वैजयंती कुलकर्णी आपटे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

