शिवसेनेचे तब्बल ४० आमदार फोडले असले तरी मराठी माणसाच्या बालेकिल्ल्यात तसेच मनात स्थान मिळवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईतल्या दादर परिसरातच शिवसेना भवनास तोडीस तोड उत्तर देणारे ‘एकनाथ’ भवन निर्माण करण्याची घाई झाली असल्याचे समजते.
एकनाथरावांच्या काही विश्वासू सहकाऱ्यांनी यासाठी प्रभादेवी दादर परिसरात काही गगनचुंबी टॉवर्सची जातीने पाहणी केली आहे. परंतु एकनाथजींना शिवसेना भवनाच्या जवळपासच जागा हवी असल्याने गाडी थोडी अडली आहे. यातूनही त्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांनी मार्ग काढला असून सेनापती बापट मार्गावरील रुबी टॉवर्सची जागा पक्की केली असल्याचे शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी सूचित केले.
रुबी टॉवर्स, या ४० मजली आलिशान इमारतीत सर्व सुविधा उपलब्ध असून सुमारे १५/२० हजार चौ. फूट क्षेत्राचा एक संपूर्ण मजला घेण्याचे घाटत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा मजला एकदा नजरेखालून घातला की पक्ष कार्यालय बांधण्याच्या कामाला वेग येईल असे सांगण्यात आले. हा टॉवर जरी सेनापती बापट मार्गावर असला तरी त्याचे दुसरे टोक शिवाजी मंदिरच्या समोरच्या गल्लीतून बाहेर पडते. तसेच या रुबी टॉवरला लागूनच कोहिनूर स्क्वेअर ही आणखी एक उत्तुंग इमारत आहे.
विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यालयही दादर भागातच असल्याने एका वेगळ्या अर्थाने शिवसेनेचा हा आगळावेगळा त्रिवेणी संगमच ठरेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. शिवाय शिवसेनेचे हे तीन प्रवाह आपापला मार्ग शोधत मार्गक्रमण करतील तर ते जनतेच्या सोयीचेच ठरेल, असेही काही भाबड्या सैनिकांना अजूनही वाटते. दरम्यान शिंदे यांच्या सहकाऱ्यांच्या डोळ्यात जो मजला भरला आहे त्याची मालकी एका बलाढ्य उद्योगपतींकडे असून मुख्यमंत्र्यांचा शब्द पडताच हा उद्योगपती तेथे लाल गालीचाच अंथरून देईल, असा विश्वास या सहकाऱ्यांनी व्यक्त केला.

