Homeकल्चर +.... या ऊबेवर,...

…. या ऊबेवर, ऊर्जेवरच तर चाललं आहे सर्व!!

“तसं नेहमीच

गारठलेलं असतं मन

पण

तुझ्या नुसत्या असण्यानेच जणू

मिळत राहते ऊब” (सौमित्र)

कवीने कुणाला उद्देशून वा तेव्हा त्याच्या मनात काय उलथापालथ झाली असेल ते त्यालाच माहीत… आपण कशाला उगाच खोलात जायचे. समीक्षक आहेत ना त्यासाठी! असो. ते सारे राहू दे, मिळत राहते ऊब… हे महत्त्वाचे आहे. आणि तशीच मायेची ऊब शनिवारी सकाळपासूनच मला आणि माझ्या एकेकाळच्या सहकाऱ्यांना मिळाली. आणि ही मायेची व ऊर्जेची ऊब ‘लोकसत्ता’ या साडेचार अक्षरांनी दिली. आणि तीही आजकालच्या दिवसात, हे लक्षणीय आहे.

लोकसत्तातील एकेकाळच्या सहकाऱ्यांचे स्नेहसंमेलन ठरवावे असे गेले अनेक दिवस नुसते बोलले जायचे. मध्यंतरीची अडीच वर्षं तर आपण नसलो तरी काळ कोरोनाग्रस्त झालेला होता. त्यामुळे सर्व जगाप्रमाणे आम्हीही हातावर हात घेऊन गप्प बसलो होतो. अखेर आमच्या व्हॉट्सअप समुहाने काही झाले तरी तसेच येतील तेव्हड्यांना घेऊन स्नेहसंमेलन घेण्याचे ठरवले व आमचे जुने सहकारी संदीप माळवी (आता ते ठाण्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त आहेत) यांनी ठाणे मुक्कामी हे स्नेहसंमेलन आयोजित करण्याची जबाबदारी घेतली. त्याला मुंबईतून रवींद्र बिवलकर व रवींद्र पांचाळ तर पुणे येथून सुनील देशपांडे यांनी सहकार्य केले व संमेलनाचा योग घडवून आणला.

लोकसत्तेतील ३० माजी सहकाऱ्यांना एकत्र आणणे तसे कठीणच. पण बदललेल्या राजकीय परिस्थितीत आणि तेही पुन्हा ठाण्यातच घडवून आणण्यात आमचा समूह कमालीचा यशस्वी झाला. स्नेहसंमेलनाचे ठिकाणही येऊर टेकडी होते हे सांगितल्यावर अधिक काय सांगायला हवे का?? आधीच गुलाबी थंडीचा मोसम. त्यात येऊर टेकडी म्हणजे सोने पे सुहागाच!! सर्वच नको इतके झालेले ज्येष्ठ पत्रकार होते. तरीही त्यांच्यातील खोडकर बालकं मात्र काही केल्या गेलेली नव्हती. ‘प्रौढत्वी नीज शैशवास जपणे बाणा कवीचा असे’. परंतु आमच्या या संमेलनात मात्र हा बाणा सर्वच ज्येष्ठांनी पुरेपूर बजावला. एखाद्या तिरकस कॉमेंटने हलकेच टोपी उडवणारे दिनेश गुणे होते, तसेच जोरदारपणे पुण्याची बाजू लढवणारे शैलेंद्र परांजपे होते. मोजकेच परंतु हसतहसत खेचणारे शरद कारखानीस होते. खमंग फोडणी देणारे रवींद्र पांचाळ तर हवेतच. त्याचं काय आहे अशी सुरुवात करून डोके हसरे करणारे तानाजी कोलते, प्रकाश कुलकर्णी, नागेश केसरी, दणकट कॉमेंट करणारे पुण्याचे धनंजय, फुटबॉलप्रमाणेच शब्द इकडून तिकडे जोरात ढकलणारे आशिष पेंडसे, मराठवाड्यातलेचे पण मराठवाड्याच्या जोशाला बरेचसे कमी पडतील असे शांत प्रमोद माने (ते जोशिले असतील तर माझी काहीही हरकत नाही. पण संमेलनात मात्र ते शांत नव्हते तरी धमाल मात्र करत नव्हते.) या सर्वांची खातिरदारी करणारे सौजन्यमूर्ती संदीप माळवी, मधूनच गुगली टाकणारे सुकृत खांडेकर आणि अनिकेत जोशी. तसेच बोलण्यावरही रेशन असल्याप्रमाणे कमी बोलणारे प्रदीप वर्मा आणि संमेलनात सर्व काही आयोजित केल्याप्रमाणेच होत आहे की नाही याची जातीने मुकादमगिरी करणारे रवींद्र बिवलकर (सर्वांचे बिलू) आदी तीस ज्येष्ठ पत्रकार घेऊन स्नेहसंमेलन आयोजित करणे हेच आव्हानात्मक काम होते आणि या सर्वांना आजुबाजूला कुठेही न सोडता एकाच ठिकाणी बांधून ठेवणे हे फक्त लोकसत्ता या नावानेच साधले होते.

ऊब

मोजकेच परंतु अर्थपूर्ण बोलणारे प्रशांत दीक्षित यांनी एक चांगली बातमी दिली. ती म्हणजे येत्या काही दिवसातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीवर लिहिलेले विश्लेषणात्मक पुस्तक प्रकाशित होत आहे. हे पुस्तक राजहंस प्रकाशन प्रकाशित करत असल्याची माहितीही त्यांनी दिली. शरद कारखानीस चीनला जाऊन आले आणि लवकरच ते व्हिएतनामला जाणार असल्याचे त्यांनीच जाहीर केले. मित्रहो, सर्वांची नावे देता आली नाही याबद्दल शल्य आहेच. पण स्नेह मात्र तीळभरही कमी नाही.

सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या या स्नेहसंमेलनाचा संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास समारोप झाला. संमेलनाच्या सुरुवातीला प्रत्येकाने स्वतःचा परिचय करून दिला. तेव्हाही परिचय पूर्ण झाल्यावर सहकाऱ्यांनी एकमेकांच्या टोप्या उडवल्याच! माझी लोकसत्तेत एकूण २८ वर्षांची नोकरी झाली. त्यात मला पुणे येथे जाऊन पुणे आवृत्तीचे कामही पाहावयास मिळाले तसेच एक्सप्रेस समुहाने सांज लोकसत्ता सुरू केल्यानंतर तेथेही काम करण्याची संधी मिळाली. अनौपचारिक गप्पांमध्ये अनेक जुने किस्से, काही जुने वरिष्ठ आठवले. मजेदार किश्श्यात वरिष्ठांच्याही मजेदार गोष्टी आल्या. परंतु त्यात केवळ मजाच होती. कडवट भावना मनात असतीलही. परंतु त्यांचे प्रदर्शन कटाक्षाने टाळले गेले. खरे तर माझ्या २८ वर्षांच्या सलग सेवेत मी र. ना. लाटे यांच्यापासून कुमार केतकर यांच्यापर्यंतच्या संपादकांच्या हाताखाली काम केले. परंतु एकानेही मला वाईट वागणूक दिली नाही तसेच दिलेल्या बातम्या किंवा लेख अडवले नाहीत. उलट मी विशिष्ट बीटवर असतानाही इतर अनेक बीटच्या बातम्या दिलेल्या आहेत. (हल्ली सर्वच माध्यमांत बीटचे नको इतके प्रस्थ केलेले दिसते.)

“Good colleagues are those who understand their team’s goal are most important than egos” हे तत्त्व अंमलात आणल्यास कुठेही कटुता निर्माण होत नाही. हां.. आता वर्तमानपत्र म्हटले की मतभेद, वादविवाद होणारच. परंतु ते मनभेद वा भांडणात संक्रमित होता कामा नयेत, याचे भान सर्वांनीच ठेवायला हवे. तसेच….

“याच वस्तीतून आपला सूर्य येईल

तोवर मला गातच राहिले पाहिजे

नगरवेशीत अडखळतील ऋतू

तोवर प्रिये जागत राहिले पाहिजे” (नारायण सुर्वे)

अगदी याच नाही. पण याच पायवाटेने पत्रकारिता गेली पाहिजे असे मनोमन वाटते. परंतु मला किंवा अजून शंभर जणांना असे वाटून काहीच उपयोग नाही. बहुसंख्य मालकवर्गाला असे वाटेल तेव्हा तो सुदिन ठरेल!!

Continue reading

वर्णमुद्राचे ‘मोहोळ’- कौशल्य सारे रचनेत आहे!

ज्येष्ठ पत्रकार व संपादक प्रवीण बर्दापूरकर यांच्या कसदार लेखणीतून कागदावर उतरलेले 'मोहोळ' हे पुस्तक दोन दिवसांपूर्वीच पोस्टाने मिळाले. प्रवीणजींना आपल्या वृत्तपत्रीय कारकिर्दीत ज्या व्यक्ती भेटल्या आणि 'भिडल्या' त्यांचे व्यक्तीचित्रण या पुस्तकात रेखाटलेले आहे. 'मोहोळ' वाचताना काही माणसांच्या आयुष्यात आपण...

अंबरीश मित्रा, दुर्गाबाईंच्या नावाने ‘हुंदका’ काढलास म्हणून….

अंबरीश मिश्रा, ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, अभ्यासू माणूस!आतापर्यंत कधीच कोणत्या वादात पडला नाही, पडण्याची गरजही नाही. माझ्या माहितीप्रमाणे तो काही काळ करंजिया यांच्या 'डेली' या इंग्रजी दैनिकात पत्रकारिता करत होता त्यावेळेपासून ओळख व मैत्री आहे. तो मुंबई महापालिकेत यायचा...

बांगलादेशींना हाकलायचंय? मग, वंदे भारतने दिल्ली गाठा…

सध्या मुंबई विभागीय विकास प्राधिकरणात म्हणेच MMRA मध्ये हो, बिचकून जाऊ नका; बांगलादेशी बेकायदा नागरिकांच्या विषयाला नको इतके महत्त्व दिले जात असल्याचे वाटत आहे. नको इतके इतक्यासाठीच म्हटले की, जी मंडळी बांगलादेशींविरुद्ध आवाज उठवत आहेत त्यांचेच सरकार केंद्रात व...
Skip to content