Homeमुंबई स्पेशलवांद्रे (पश्चिम) भागात...

वांद्रे (पश्चिम) भागात आज व उद्या कमी दाबाने पाणीपुरवठा!

मुंबई महापालिकेतर्फे माहीम खाडी येथील पश्चिम रेल्वे पुलाखालून जाणाऱ्या तानसा पूर्व मुख्य जलवाहिनीवर कॅपिंगचे काम होत असल्यामुळे आज बुधवार, दिनांक १५ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजल्यापासून गुरुवार, दिनांक १६ डिसेंबर २०२१ रोजी रात्री १० वाजेपर्यंत संपूर्ण वांद्रे (पश्चिम) म्हणजेच एच / पश्चिम विभागाला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

मुंबई महापालिकेने ही माहिती दिली. संबंधित नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरुन पालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

जीटीबी नगर येथे रेल्वे रुळाखालील पाण्याची मोठी गळती रोखली

दरम्यान, मुंबई उपनगरीय हार्बर रेल्वे मार्गावरील गुरू तेग बहादूर सिंग (जी.टी.बी.) नगर रेल्वे स्थानकाजवळ, रेल्वे रुळाखालून जाणाऱ्या ६०० मिलीमिटर जलवाहिनीवरील मोठी गळती वेळीच रोखण्याचे अत्यंत आव्हानात्मक असे काम महापालिकेच्या जल गळतीच्या तातडीच्या दुरुस्ती विभागाने पार पाडले आहे.

विशेष म्हणजे रेल्वे मार्ग सुरू असतानाच, रेल्वे वाहतुकीला कोणताही अडसर होऊ न देता जमिनीखाली सुमारे १२ फूट खोलीवर हे काम पूर्ण करण्यात आले. यामुळे लाखो लीटर पाणी वाया जाण्यापासून वाचले. त्यासोबत रेल्वे रुळाखाली भूस्खलन होण्यासारखा संभाव्य धोकादेखील पूर्णपणे टळला आहे.

पाणी

मुंबई उपनगरीय रेल्वे अंतर्गत हार्बर मार्गावरील गुरू तेग बहादूर सिंग (जी.टी.बी.) नगर रेल्वे स्थानकाजवळून शीव सर्कल येथे जाणाऱ्या पादचारी पुलाजवळ, रेल्वे रुळाखालून जाणाऱ्या जलवाहिनीवर गळती होत असल्याचा संदेश जल अभियंता विभागांतर्गत वरळीच्या सहाय्यक अभियंता, जलकामे, तातडीचा दुरुस्ती विभाग, यांना मिळाला. हे काम अत्यंत जोखमीचे तसेच तातडीने करणे आवश्यक होते. कारण, या गळतीचे स्थान नाला व रेल्वे रुळ यामध्ये होते.

या गळतीच्या ठिकाणी पाहणी केल्यानंतर निदर्शनास आले की, जेसीबी अथवा कोणत्याही संयंत्राच्या सहाय्याने तेथे खोदकाम केल्यास रुळाखाली भूस्खलन होऊन रुळाला धोका निर्माण होण्याचीदेखील शक्यता होती. रेल्वेची वाहतूक सुरू असताना जमिनीस हादरे बसतात. त्यामुळे ६०० मिलीमीटर आकाराच्या जल वाहिनीत उतरुन दुरुस्ती करणे अवघड होते. त्यामुळे पालिका तसेच रेल्वे प्रशासनाची आवश्यक परवानगी घेऊन मंगळवार, दिनांक ७ डिसेंबर २०२१ ते सोमवार, दिनांक १३ डिसेंबर २०२१ या कालावधीत, रेल्वे रुळास व रेल्वे वाहतुकीस बाधा येणार नाही, अशारितीने प्रत्यक्ष दुरुस्ती सुरू करण्यात आली.

पाणी

एफ/उत्तर विभागाच्या सहाय्यक अभियंता (जलकामे) गळती अन्वेषण विभागाने याठिकाणी खोदकाम करुन गळती शोधण्यास सुरुवात केली. त्यावेळी जलवाहिनी सापडत नसल्याने खोल खड्डा खणावा लागला. जमिनीखाली सुमारे १२ फूट खोल जलवाहिनी आढळली, तेव्हा जलवाहिनीवर सिमेंट कोबा असल्याचे निदर्शनास आले. हा कोबा फोडून जलवाहिनीवरील चौकोनी गाबडा (मोठा तुकडा) गॅस कटरने कापण्यात आला. मात्र, जलवाहिनीत पाणी असल्याने व आजूबाजूची माती व दगड खड्डयात जात असल्याने शोरिंग प्लेट्स चारही बाजूंनी लावून खड्डा सुरक्षित करुन जलवाहिनीवर मॅनहोल बसवण्यात आला. त्याद्वारे सीसीटीव्ही कॅमेरा आत टाकून निरीक्षण केले असता सुमारे ३ मीटर अंतरावर म्हणजेच जवळजवळ रुळाखालीच गळती आढळली.

त्यानंतर, तातडीची दुरुस्ती विभागाचे कुशल कामगार मोतीराम पांचाळ व रामचंद्र वराडकर हे दोघे २४ इंची व्यासाच्या या अरुंद जलवाहिनीत उलट्या दिशेने सरपटत जात गळतीच्या ठिकाणी पोहोचले. तेथे जलवाहिनीच्या झेड बेंडची वेल्डिंग फाटलेली आढळली व त्यातून गळती होत होती. या गळतीच्या ठिकाणी लाकडी खुंट्या व पाचर अरुंद जागेत बसवून कौशल्यपूर्णरित्या गळती पूर्णपणे बंद करण्यात आली. गळती दुरुस्तीची ही संपूर्ण कार्यवाही अत्यंत आव्हानात्मक होती. आणि जलगळती दुरुस्ती विभागाने हे आव्हान यशस्वीपणे पेलले.

पाणी

ही गळती तातडीने रोखली गेली नसती तर, गळतीमुळे रेल्वे रुळाखालील जमीन खचण्याचा संभाव्य धोका होता. पाण्याच्या दाबामुळे मोठी गळती होऊन लाखो लीटर्स पाणी वाया गेले असते. तसेच पाणी दूषित होण्याचाही धोका होता. अशावेळी, अत्यंत जोखमीच्या कामासाठी अतिरिक्त पालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) अजय राठोर, जल अभियंता संजय आर्ते यांनी जलगळती दुरुस्ती विभागाला हे काम कसे पूर्ण करावे, यासाठी महत्त्वाचे मार्गदर्शन केले.

उप जल अभियंता नंदलाल सभागनी, कार्यकारी अभियंता (परिरक्षण) सुशील चव्हाण, एफ/उत्तर विभागाचे सहाय्यक अभियंता (जलकामे) सोमवंशी यांच्या उपस्थितीत आणि सहाय्यक अभियंता (जलकामे/ तातडीची दुरुस्ती विभाग) जीवन पाटील, दुय्यम अभियंता अमित हटवार, कनिष्ठ अभियंता वैभव गावडे यांच्या पथकाने प्रत्यक्ष दुरुस्तीची कार्यवाही तडीस नेली.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content