राजधानी दिल्लीत आज विधानसभेसाठी मतदान सुरू आहे. दिल्लीतल्या सर्वच्या सर्व जागांवर सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू झाले असून सकाळी नऊ वाजेपर्यंत तेथे सरासरी ८.१० टक्के मतदान झाले. एकीकडे या मतदानाला वेग येत असतानाच भारतीय जनता पार्टीचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात पवित्र स्नानाकरीता रवाना झाले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतरही पंतप्रधान कन्याकुमारीतल्या मंदिरात पूजाअर्चा करण्यासाठी गेले होते.
दिल्लीतल्या या विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत होत असून सत्ताधारी आम आदमी पार्टी, भाजपा तसेच काँग्रेसमध्ये प्रमुख लढत होत आहे. या निवडणुकीसाठी सुरू असलेला प्रचार सोमवारी संध्याकाळी संपला. त्यानंतर जाहीर प्रचार केला जात नाही. मात्र, दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन्ही सभागृहाच्या सदस्यांसमोर केलेल्या अभिभाषणावर सुरू असलेल्या चर्चेच्या निमित्ताने सोमवारीच काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तडाखेबंद भाषण करून अप्रत्यक्ष प्रचाराची संधी सोडली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत काल, मंगळवारी याच चर्चेच्या निमित्ताने लोकसभेत तितकेच जोरकस भाषण करून प्रचाराची संधी साधली. आणि आज दिल्लीत प्रत्यक्ष मतदान सुरू असताना पंतप्रधान मोदी महाकुंभमध्ये पवित्र स्नान करून दिल्लीतल्या उत्तर प्रदेशातल्या मतदारांवर तसेच हिंदुत्वाकडे झुकलेल्या मतदारांमधील सनातनी विचारांना बळकट करण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न करत असल्याचे बोलले जाते.
पंतप्रधान मोदी यांनी महाकुंभाला सुरूवात होण्याआधीच तेथील व्यवस्थेच्या पाहणीसाठी प्रयागराजला भेट दिली होती. तेथे त्यांनी संगम घाटावर गंगास्नानही केले होते. आज ते प्रत्यक्ष महाकुंभमध्ये सहभागी होत आहेत. पंतप्रधान मोदी विशेष विमानाने प्रयागराजला पोहोचतील. तेथून हेलीकॉप्टरने ते अरैल घाटावर जातील. तेथून ते संगम घाटावर जाऊन पवित्र स्नान करतील. त्यानंतर गंगापूजन करण्याचाही त्यांचा कार्यक्रम आहे. साधारण अडीच ते तीन तासांचा हा दौरा करून दुपारी एक वाजण्याच्या सुमाराला ते दिल्लीत परततील, असे कळते.
पंतप्रधानांच्या या दौऱ्यानिमित्त कालच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभमध्ये जाऊन सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला होता. कालच भूटान नरेश जिग्मे खेसर नामग्येल वांगचूक यांनी महाकुंभात पवित्र स्नान केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनी त्यांच्या या दौऱ्यात साथ दिली. पंतप्रधान मोदींच्या आजच्या कार्यक्रमातही योगी त्यांच्यासमवेत असणार आहेत.