Homeन्यूज अँड व्ह्यूजकोस्टल रोड कोणासाठी,...

कोस्टल रोड कोणासाठी, हे ठरवणारे मुंबईतले मतदान सुरू!

मुंबई महानगर क्षेत्रातील मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, नवी मुंबई, पनवेल यासह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे मतदान आज होत आहे. उद्या संध्याकाळपर्यंत या निवडणुकांचा निकाल हाती येईल. मुंबई ताब्यात घेण्यासाठी निकराची लढाई सुरू असून उद्धवसेना विरुद्ध महायुती हा सामना चांगलाच रंगला आहे. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ एकत्र आल्याने मुंबईच्या निवडणुकीत रंगत वाढली आहे. गटर-मीटर-वॉटरभोवती फिरणारी ही निवडणूक आता थेट कोस्टल रोडवर पोहोचली आहे. किंबहुना कोस्टल रोडचा मुद्दा मुंबईतरी गाजत आहे. मुंबई महानगरपालिकेत एकसंघ शिवसेना सत्तेत असताना कोस्टल रोडला सुरुवात झाली होती. मात्र कोस्टल रोडचे पूर्ण काम महायुती आल्यानंतर झाले. मुळात या कोस्टल रोडशी सामान्य मुंबईकरांना काहीही देणेघेणे नाही. कोस्टल रोड पुढे सी लिंकला जोडला जातो. फक्त श्रीमंत मुंबईकर या कोस्टल रोडवरून वांद्र्याला वीस मिनिटात पोहोचतो. खरं म्हणजे या कोस्टल रोडचा फायदा उद्धव ठाकरे, आशिष शेलार यांना वीस मिनिटात घरी पोहोचण्यासाठी होतो. त्याचबरोबर दक्षिण मुंबईत राहणाऱ्या मंत्र्यांना-आमदारांना आणि श्रीमंतांना मुंबई विमानतळ विमानतळावर पोहोचण्यासाठी या कोस्टल रोडचा आणि सी लिंकचा उपयोग होतो असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी एका चॅनेलने गेल्या आठवड्यात कोस्टल रोडवर ओपन वाहनातून चर्चेचा कार्यक्रम पार पाडला. परंतु उपनगरात राहणाऱ्या मतदारांना या कोस्टल रोडचा काय उपयोग झाला याची चर्चा मात्र यात झाली नाही.

1999 साली वांद्रे वरळी सीलिंकचे भूमिपूजन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. हा समारंभ रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, भाजप नेते प्रमोद महाजन आणि कायदेतज्ञ राम जेठमलानी उपस्थित होते. यावेळी बोलताना राम जेठमलानी म्हणाले की, सी लिंकमुळे आम्ही एअरपोर्टवर लवकर पोहोचू. जेठमलानी यांच्या या वक्तव्यावरून टीका होईल या भीतीने प्रमोद महाजन यांनी खुलासा केला की त्या सेलिंकचा उपयोग फक्त एअरपोर्टवर जाणाऱ्यांसाठी होणार नसून सामान्य जनतेचा प्रवास सुखकर होईल. परंतु जेठमलानी बोलून गेलेले वास्तव आता खरे ठरत आहे. आज मुंबईकरांची काय अवस्था आहे? सर्व परिवहनयंत्रणा कोसळल्या आहेत. ट्रेनमधून सामान्य मुंबईकर अक्षरशः भीषण परिस्थितीत प्रवास करत आहे. सकाळी कामावर गेलेला आपला मुलगा, नवरा किंवा मुलगी, पत्नी पुन्हा घरी येईल याची शाश्वती नाही. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या कितीही फेऱ्या वाढवल्या तरी गर्दीवर कुणाचेच नियंत्रण नाही. मध्यंतरी कार्यालयीन वेळा बदलण्याची चर्चा झाली. परंतु यावर तोडगा मात्र निघाला नाही. वसई-विरार, बदलापूर-अंबरनाथ येथून प्रवास करणारा सामान्य मुंबईकर अक्षरशः मरणासन्न अवस्थेत प्रवास करत असतो. मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना असो किंवा महायुतीतील एकनाथ शिंदे यांची शिवसेना असो, त्याचबरोबर डबल इंजिन सरकार असलेला भाजप असो, सर्वजण सी लिंकवर आणि कोस्टल रोडवर चर्चा करतात. महानगरपालिका क्षेत्रातील जकात बंद केल्यानंतर मुंबई सोडून सर्व महानगरपालिका आर्थिक मरणासन्न अवस्थेत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या एफडीही आता नावाला शिल्लक राहिल्या आहेत. पुढे मुंबई महानगरपालिकेची अवस्थाही इतर महानगरपालिकांप्रमाणे होणार आहे.

कोस्टल

अंधेरी-घाटकोपर मेट्रोही काँग्रेसच्या काळात सुरू झाली. महाायुतीच्या काळात कफपरेड ते आरे ही मेट्रो रडतखडत सुरू झाली. गुंदवली ते अंधेरी मेट्रोला मुहूर्तही याच काळात सापडला. मात्र बाकी मेट्रो कधी सुरू होणार? आणि या मेट्रोच्या किती चाचण्या होणार? हेसुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर करायला हवे होते. ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत शिंदेंची शिवसेना आणि भाजपची युती झाली आहे. मात्र येथे दोन्ही पक्ष एकमेकांचे उमेदवार पाडण्यातच गर्क आहेत. ठाणे हे मुख्यमंत्र्यांचे शहर. परंतु ठाण्यातून घोडबंदर परिसरात परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना किती वेळ लागतो हे तेच सांगू शकतात. कल्याणमध्येही वेगळी परिस्थिती नाही. डोंबिवलीकर तर रिक्षावाल्यांना आणि फेरीवाल्यांना कंटाळले आहेत.

भिवंडीमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पार्टी हे दोन्ही पक्ष बाजी मारणार. शिंदेंची शिवसेना एकहाती या दोन्ही पक्षांशी लढत आहे. मात्र त्यांची डाळ शिजणार नाही. उल्हासनगरमध्ये शिवसेनेने पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी आणि साई पक्षाशी युती केली आहे. तेथे या युतीची लढत भाजपसोबत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपची युती नाही. नवी मुंबईचे सर्वेसर्वा आणि वनमंत्री गणेश नाईक कधी नव्हे ते शिंदेंवर तुटून पडले आहेत. शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी शिवसेनाप्रमुख किंवा शिवसेना यावर कधीही खाजगीतही भाष्य केले नव्हते. आपले काम करणे हेच त्यांचे ध्येय असते. एवढ्या वर्षांत कधी कुणावर गणेश नाईक यांनी टीका केल्याचे मी तरी ऐकले नाही. परंतु यावेळी ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. त्यांचा बोलाविता धनी कोण आहे हे आता लपून राहिलेले नाही. मात्र नवी मुंबईत गणेश नाईक बाजी मारणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मीरा-भाईंदरमध्ये भाजपचे आमदार नरेंद्र मेहता आणि शिवसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यात लढत आहे. या लढतीत नरेंद्र मेहता बाजी मारणार हे निश्चित आहे. येथे उद्धव ठाकरे यांची शिवसेना फक्त औषधाला शिल्लक आहे. वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी आणि भाजपमध्ये निकराची लढाई आहे. पनवेलमध्ये कंत्राटदार रामशेठ ठाकूर आणि त्यांचे पुत्र प्रशांत ठाकूर एकहाती सत्ता आणू शकतात. हे पिता-पुत्र नेहमी सत्तेसोबत असतात. उद्या निकालानंतरच खरे चित्र स्पष्ट होईल.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक आहेत.)

संपर्कः 9892514124

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

ठाकरेंना मोकळे रान दिल्यानेच पुढचे रामायण…

रविवारी राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आटोपताच सोमवारी राज्यातील महानगरपालिका निवडणुकांची घोषणा झाली. राज्यात 27 महानगरपालिकांची मुदत संपली असून जालना आणि इचलकरंजी या दोन महानगरपालिका नव्याने अस्तित्त्वात आल्या आहेत. त्यांच्याही निवडणुका प्रथमच होणार आहेत. मात्र सर्वाधिक लक्ष मुंबई महानगरपालिकेकडे आहे....

उद्धव ठाकरेंचा सरकारविरोध लुटुपुटीचाच!

राज्य सरकारला सत्तेवर येऊन नुकतेच एक वर्ष झाले. या वर्षपूर्तीनिमित्त सरकारचीच बाजू जनतेसमोर आली. मात्र वर्षपूर्ती होताना सरकारवर तुटून पडणारे विरोधी पक्ष सुस्त दिसले. माध्यमांमध्ये तर सरकार वर्षभरात राज्याचा सर्व स्तरावर कसा विकास करत आहे हे जाहिरात नव्हे तर...

बाळासाहेबांच्या स्मारकाच्या चाव्या फडणवीसांच्याच हाती!

17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. बाळासाहेब ठाकरे सार्वजनिक न्यासाच्या अध्यक्षपदी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नियुक्ती राज्य सरकारने पुन्हा एकदा केली आहे. त्याचबरोबर या न्यासाच्या सचिवपदी शिवसेना (उबाठा) नेते सुभाष देसाई...
Skip to content