महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेला ग्रामोद्योग भरारी पुरस्कार सिंधुदूर्ग येथील कौसर खान यांना जाहीर करण्यात आला असून याच पुरस्काराचे इतर मानकरीही जाहीर करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून मंडळामार्फत ग्रामोद्योग भरारी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांमध्ये प्रथम पुरस्कार सिंधुदूर्गच्या कौसर खान यांना, द्वितीय पुरस्कार पुण्याच्या येथील प्रमोद रोमन यांना तर तृतीय पुरस्कार गोंदियाच्या श्रीकांत येरणे यांना जाहीर झाले आहेत. पुरस्कारांचे स्वरूप अनुक्रमे सन्मानचिन्ह आणि रक्कम रूपये 15 हजार, 10 हजार आणि पाच हजार असे आहे. याबरोबरच ठाण्याच्या सुजाता पवार, अमरावतीच्या उज्ज्वला चंदन आणि नांदेडच्या बालाजी काजलवाड यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येणार आहेत.
मंडळाच्या 64व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ग्रामीण भागात यशस्वी उद्योग करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘ग्रामोद्योग भरारी’ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्काराचे वितरण 13 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे करण्यात येणार असल्याची माहिती, मंडळाचे सभापती रवींद्र साठे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी दिली.
या पुरस्कारांचे वितरण महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते आणि उद्योग मंत्री उदय सामंत, मंडळाचे सभापती रवींद्र साठे, खासदार अरविंद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.