संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते विजय काशिनाथ शास्त्री (८२) यांचे गोवा येथे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, स्नुषा, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
विजय शास्त्री यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत दिनू रणदिवे व अशोक पडबिद्री यांच्यासमवेत कार्य केले होते. संयुक्त महाराष्ट्र पत्रिका हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे मुखपत्र छपाई करून लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी निष्ठेने केले. मुंबईच्या नागरी सुविधांसाठीही त्यांनी काम केले.
शिवसेनेचे माजी महापौर डॉ. हेमचंद्र गुप्ते यांच्यासमवेत मुंबईत दादर व चेंबूर येथे सामाजिक कार्य त्यांनी केले. चेंबूर लायन्स क्लबचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्यासोबतही युवा वर्गासाठी त्यांनी भरीव कार्य केले. माजी शिक्षणमंत्री सुधीर जोशी यांच्यासमवेत १२ वर्षे सीकेपी बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी उत्तमरीत्या जबाबदारी सांभाळली. कोविडच्या काळात रूग्णसेवेला वाहून घेणाऱ्या डॉ. स्नेहा पुरंदरे त्यांच्या कन्या होत. ज्येष्ठ पत्रकार राजेश पुरंदरे, शास्त्री यांचे जावई आहेत.