मुंबईतल्या भायखळ्याच्या ‘नाइन फिश आर्ट गॅलरी’मध्ये कलात्मकतेने मांडण्यात आलेल्या, सुप्रसिद्ध सोशल डॉक्युमेंटरी फोटोग्राफर सुधारक ओलवे यांच्या ‘लावणी’ या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन ख्यातनाम अभिनेत्री विद्या बालन यांच्या हस्ते नुकतेच एका अतिशय मनोरम्य अशा लावणीसंध्येमध्ये झाले.

सुमारे दोन दशकांच्या काळात वारंवार सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब येथील संगीतबारी थिएटरला व तेथील लावणी कलावंतांच्या निवासांना भेट देऊन लावणी कलावंतांच्या जीवनाचे वास्तव सुधारक ओलवे यांच्या कॅमेऱ्याने अतिशय संवेदनशीलतेने टिपले. महाराष्ट्रभरात व सर्वसाधारणपणे जगाच्या कोपऱ्यात जिथे कुठे मराठी माणूस असेल तिथे-तिथे त्याच्या मनात लावणीविषयीचे प्रेम अजूनही टिकून असले तरी प्रत्यक्षात पारंपरिक लावणी व ती सादर करणाऱ्या कलाकारांची अवस्था मात्र दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. आधुनिक काळात मनोरंजनाच्या बदलत्या संकल्पनांच्या रेट्यात लावणीचा पारंपरिक बाज टिकवून ठेवणे या कलावंतांसाठी दिवसेंदिवस कठीण होत चालले असून सोबतच अन्य सामाजिक बदलही त्यांच्या विवंचनांमध्ये भरच टाकत आहेत. त्यांचे हे विषण्ण करणारे वास्तव ओलवे यांनी आपल्या छायाचित्रांमधून नेमकेपणाने मांडले आहे.

संवेदनशीलतेने टिपलेल्या या छायाचित्रांचे उद्घाटन बॉलिवुडच्या प्रस्थापित ग्लॅमरस व्यवस्थेच्या विरोधात आपले स्वत्व जपत ठामपणाने उभ्या राहणाऱ्या विद्या बालन यांच्यासारख्या अभिनेत्रीच्या हस्ते होणे हा अतिशय समर्पक असा योग होता. विद्या बालन यांनी स्वत:ही एका चित्रपटात ‘मला जाऊ दे ना…’ ही लावणी सादर केलेली असल्यामुळे की काय, कार्यक्रमात लावणीसम्राज्ञी वैशाली काळे-नगरकर आणि त्यांच्या पथकाच्या लावण्यांचा त्यांनी अतिशय मनापासून आस्वाद घेतला.

विद्या बालनच नव्हे तर कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रसिद्ध भजनगायक अनुप जलोटा, पार्श्वगायक रूपकुमार राठोड, उद्योजक परवेज दमानिया, आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांच्यासह कित्येक दूतावासांचे अधिकारी व कलाविश्वातील मान्यवर या पारंपरिक लावणी सादरीकरणात अगदी रंगून गेले होते. अपेक्षेपेक्षा अधिकच गर्दी झालेल्या या कार्यक्रमात उपस्थितांच्या फर्माईशींनुसारही काही लावण्या वैशाली काळे-नगरकर यांनी सादर केल्या.

कृष्णधवल छायाचित्रांचे ‘लावणी’ हे प्रदर्शन येत्या १८ फेब्रुवारीपर्यंत सकाळी साडेदहा ते संध्याकाळी साडेसात या वेळेत खुले असणार आहे. भायखळा पूर्व येथील राणी बागेनजीकच्या न्यू ग्रेट ईस्टर्न मिल कम्पाऊंडमध्ये नाइन फिश आर्ट गॅलरी आहे. तेथे छायाचित्रांची विक्रीही केली जाईल.




