तुझं नि माझं जमेना, परि तुझ्यावाचून करमेना.. या गाण्याची आठवण यावी, अशीच स्थिती महाराष्ट्रात आहे. शिवसेनेने भलेही काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याबरोबर जात महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं असेल. पण मूळ विचारधारा भाजपाच्या जवळची असल्याने एक वेगळ्याच प्रकारचं अंडरस्टँण्डिंग अर्थसंकल्पीय अधिवेशनात बघायला मिळत आहे.
तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, या म्हणीचीही आठवण या अधिवेशनात येतेय. कारण सत्तारूढ आणि विरोधी या दोन्ही बाजूंचं वर्तन तरी तसंच सिद्ध करतंय. त्यामुळेच मग सरकारला अपेक्षित सर्व कामकाज पूर्ण करण्यासाठी नेहमीप्रमाणे सहकार्य करतानाच अँण्ड दे लिव्ह्ड हॅपिली एव्हरआफ्टर, एटलिस्ट फॉर द टाईमबिइंग, या निष्कर्षासह अधिवेशनाचा शेवटचा दिवस सुरळीतपणे कामकाज करू लागलाय.
विधानसभेचं दिवसभराचं कामकाज मंगळवारी गदारोळामुळे स्थगित करावं लागलं ते पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासंदर्भातल्या प्रश्नचिन्हामुळे. वाझे यांच्या निलंबनाची आणि अटकेची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांनी बुधवारी शून्य प्रहरात विधानसभेत हा विषय उपस्थित करताना भाषा बदलली आणि सचिन वाझेंविरुद्ध काय कारवाई करणार असा प्रश्न केला. त्यावर संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी वाझे यांची सध्या कार्यरत असलेल्या पदावरून बदली केली जाईल, असं आश्वासन दिलं. त्याबरोबरच विरोधी पक्षनेत्यांकडे या प्रकरणात असलेले पुरावे त्यांनी पोलिसांकडे द्यावेत, असंही परब यांनी सुचवलं.
मंगळवारी तब्बल नऊ वेळा विधानसभेचे कामकाज या विषयावरून तहकूब झाले होते. पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शून्य प्रहरात हा विषय उपस्थित करताना आम्हाला अर्थसंकल्पावरील चर्चाही करायची आहे, असं सांगून अडवणूक करणार नसल्याचं सूचित केलं. मंगळवारी वाझे प्रकरणात काही तरी मोठा निर्णय होईल, असं वातावरण होतं. पण खोदा पहाट निकली चुहिया.. असंच काहीसं पदरी पडलं आणि पदरी पडलं पवित्रं झालं, असं म्हणत विरोधी पक्षांनीही थोडा वेळ सरकारची कोंडी केल्याचं समाधान मिळवलं. राज्यातल्या आघाडी सरकारमधे शिवसेना आणि राष्ट्रवादीच सरकार चालवताहेत आणि काँग्रेस मूकदर्शक आहे, हे पुन्हा एकदा या अधिवेशनात बघायला मिळालं. त्याबरोबरच राजकारणात काहीही होऊ शकतं आणि सुबह का भूला शाम को घर आ जाता है तो उसे भूला नही कहते, या हिन्दी वचनाचीही आठवण झाली.
सचिन वाझे यांची बदली करणार
सचिन वाझे यांना क्राइम ब्रान्चमधून हलवण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधान परिषदेत केली. विधान सभेमधे काल मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांनी वाझे यांच्या निलंबनाची मागणी केली होती. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटीनने भरलेली मोटार मनसुख हिरेन यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले होते आणि हिरेन मुंब्र्यामध्ये संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत आढळले होते. त्यासंदर्भात विधानसभेत काल आरोप-प्रत्यारोपात गदारोळ होऊन दिवसभरासाठी विधानसभेचे कामकाज स्थगित झाले होते. विधान परिषदेत आज या विषयावरून विरोधी पक्षांनी आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी वाझे यांच्या निलंबनाची मागणी लावून धरली. देशमुख यांनी वाझे यांची क्राइम ब्रान्चमधून बदली केली जाईल, असे आश्वासन सभागृहाला दिले. त्यानंतर गदारोळ झाल्याने विधान परिषदेचे कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.