पूर्वी खासदार भेटले तर त्यांच्या मतदारसंघातल्या रेल्वेस्थानकातून जाणाऱ्या रेल्वेला थांबा द्यावा, अशी विनंती करत होते तर आता भेटणारे खासदार त्यांच्या मतदारसंघातून वंदे भारत रेल्वे जावी, अशी विनंती करत आहेत. हाच वंदे भारत रेल्वेच्या मोहिमेला मिळणारा जनतेचा प्रतिसाद आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून दोन वंदे भारत रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. मुंबई-सोलापूर वंदे भारत आणि मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत अशा या दोन गाड्या आहेत. तसेच, मुंबईतील सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड आणि कुरार बोगदा अशा दोन प्रकल्पांचेही त्यांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते.
भारतीय रेल्वेसाठी, विशेषत: महाराष्ट्रातील प्रगत दळणवळण व्यवस्थेसाठी हा एक मोठा दिवस आहे, कारण एकाच दिवशी दोन वंदे भारत रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखविण्याची ही पहिलीच वेळ आहे. या वंदे भारत रेल्वेगाड्या, मुंबई आणि पुण्यासारख्या देशाच्या आर्थिक केंद्रांना आपल्या श्रद्धास्थानांशी जोडणार आहे. यामुळे, कॉलेजला येणारे, नोकरी आणि व्यवसायासाठी येणारे लोक, शेतकरी आणि भाविक सर्वांना सुविधा मिळणार आहेत. शिर्डी, नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि पंचवटीसारख्या तीर्थक्षेत्रांना जाणे यामुळे सोयीचे होणार आहे. मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनमुळे पंढरपूर, सोलापूर, अक्कलकोट आणि तुळजापूरसारख्या तीर्थक्षेत्री जाणे आता खूप सुलभ होणार आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
आतापर्यंत अशा 10 गाड्या देशभरात सुरू झाल्या आहेत. देशातल्या 17 राज्यांत 108 जिल्ह्यांमधून ह्या वंदे भारत रेल्वेगाड्या सुरू आहेत. आज लोकार्पण झालेल्या उन्नत मार्गामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरे एकमेकांशी जोडली जातील. कुरार बोगदाही वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
यंदाच्या अर्थसंकल्पात पहिल्यांदाच पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 10 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये रेल्वेचा वाटा 2.5 लाख कोटी आहे. या अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला बळकटी मिळाली आहे. पगारदार आणि व्यावसायिक, दोघांच्याही गरजा या वर्षीच्या अर्थसंकल्पात मांडल्या आहेत. 2014पूर्वी 2 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लोकांवर कर आकारला जात होता. परंतु सध्याच्या सरकारनेच अर्थसंकल्पात करआकारणीसाठी सुरुवातीला 5 लाख रुपये आणि आता 7 लाख रुपये अशी उत्पन्नमर्यादा केली आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारमध्ये ज्यांनी 20% कर भरला ते आज शून्य कर भरतात, अशी टिप्पणी पंतप्रधान मोदी यांनी केली.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि कपिल पाटील आणि राज्य सरकारचे मंत्री यावेळी उपस्थित होते.
मुंबईमधील रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि वाहनांची वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी बांधण्यात आलेल्या सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड (SCLR) आणि कुरार भुयारी मार्ग या प्रकल्पांचे पंतप्रधानांनी लोकार्पण केले. कुर्ला ते वाकोला आणि बीकेसीमधील एमटीएनएल जंक्शन ते कुर्ला येथील एलबीएस फ्लायओव्हरपर्यंत नव्याने बांधण्यात आलेल्या उन्नत मार्गीकांमुळे शहरातील पूर्व-पश्चिम संपर्क आणखी सुधारेल. हे दोन मार्ग पश्चिम द्रूतगती मार्गाला पूर्व द्रूतगती मार्गाशी जोडतात. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरे अधिक सक्षमपणे जोडली जात आहेत. कुरार भुयारी मार्ग हा पश्चिम द्रूतगती मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, हा मार्ग पश्चिम द्रूतगती मार्गाच्या मालाड आणि कुरार या दोन टोकांना जोडतो. यामुळे नागरिकांना रस्ता सहज ओलांडता येतो आणि वाहनांनादेखील पश्चिम द्रूतगती मार्गावरील गर्दी टाळून सहज प्रवास करता येईल.
परंपरांचे डिजीटायझेशन व्हावे
यानंतर पंतप्रधानांनी दाऊदी बोहरा मुस्लीम समाजाच्या मरोळ येथील अल जामिया – तूस – सैफिया येथील विद्यापीठाचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना त्यांनी भारताच्या परंपरा आणि वारसा जतन करण्यासाठी त्यांचे डिजीटायझेशन करण्यावर भर दिला. पुढच्या पिढीला या गोष्टी ज्ञात झाल्या पाहिजेत. त्याकरीता बोहरा समाजाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. आपल्या सरकारच्या राजवटीत दर आठवड्याला देशात एक विद्यापीठ आणि दोन महाविद्यालये स्थापन केली जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.