Homeकल्चर +प्रबोधन आंतरशालेय क्रीडा...

प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवात उत्कर्ष, नंदादीप अजिंक्य!

मुंबई उपनगरातील शालेय क्रीडागुणांना वाव मिळावा म्हणून गेले 43 वर्षे सातत्याने आयोजित केल्या जाणाऱ्या प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवात कबड्डी खेळात मुलांमध्ये मालाडच्या उत्कर्ष मंदिराने तर मुलींमध्ये गोरेगावच्या नंदादीप विद्यालयाने बाजी मारली.

प्रबोधन गोरेगावच्या क्रीडाभवनात सुरू असलेल्या क्रीडा महोत्सवात शालेय क्रीडापटूंची अक्षरश: जत्रा भरली आहे. कबड्डी प्रकारात आपापल्या संघांना पाठिंबा देण्यासाठी शेकडो विद्यार्थ्यांनी क्रीडाभवन गाठले होते. उत्कर्ष आणि एकविरा यांच्यात झालेला सामना रंगलाच नाही. चढाईपटू श्रवण बडदे आणि शुभम कळके यांच्या वेगवान खेळाने उत्कर्षला मध्यंतरालाच 32- 14 अशी निर्णायक आघाडी मिळवून दिली. मध्यंतरानंतर त्या आघाडीत आणखीनच भर पडली आणि उत्कर्षने एकविरा संघाचा 46-26 असा सहज पराभव करीत प्रबोधन आंतरशालेय स्पर्धेचे मुलांच्या गटाचे जेतेपद संपादले.

मुलींच्या गटात नंदादीप विद्यालयाला प्रचिती खेडेकर आणि अभिलाषा पाष्टे यांच्या भन्नाट खेळाने मध्यंतरालाच विजय निश्चित केला होता. जोगेश्वरीचे श्रमिक विद्यालय अत्यंत दुबळे भासले. ते नंदादीपला लढतच देऊ शकले नाही आणि नंदादीपने 42-9 अशा एकतर्फी विजयासह बाजी मारली. अंतिम फेरीच्या दोन्ही सामन्यांनी प्रेक्षकांची घोर निरशा केली. त्यामुळे अंतिम फेरीचा आनंद साखळी सामन्यांपेक्षा दुय्यम दर्जाचा होता.

त्याअगोदर उत्कर्षने बांद्रयाच्या महात्मा गांधी विद्यामंदिराचा 36-24 असा सहज पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती तर कांदिवलीच्या एकविरा विद्यालयाने एसटीएस मिशन इंग्लिश शाळेचा 51-43 असा पराभव करीत जेतेपदाच्या लढतीत स्थान मिळविले होते. या स्पर्धेत मुलांच्या गटात 16 शाळांचा सहभाग होता तर मुलींच्या 8 संघांनी सहभाग नोंदविला.

खासदार चषक कबड्डीरत्नदिप, माऊली, शंभूराजे, संभाजी संघांची विजयी सलामी

बोरिवली पश्चिम येथील स्व. प्रमोद महाजन मैदानात भाजपा उत्तर मुंबईतर्फे पोईसर जिमखान्याच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या मुंबई उपनगर जिल्हास्तरीय क्रीडा प्रोत्साहन खासदार चषक कबड्डी स्पर्धेत पुरुष ब गटात रत्नदिप, माऊली, श्री शंभूराजे क्रीडा मंडळ, संभाजी क्रीडा मंडळ या संघांनी विजयी सलामी दिली.

पहिल्या फेरीच्या लढतीत बोरीवलीच्या श्री शंभूराजे क्रीडा मंडळाने दहिसरच्या भैरवनाथ क्रीडा मंडळाला २५-१५ गुणांनी सहज नमविले. विजयी संघाच्या श्रीकृष्ण देसाईने तुफानी चढाया केल्या तर जयेश शेट्टीने सफाईदार पकडी केल्या. पराभूत संघातर्फे अरुण मोहिते चमकला. दुसऱ्या सामन्यात रत्नदिपने शूर संभाजी संघाचे आव्हान ३०-१७ गुणांनी परतवून लावले. सुशांत जांमळी, चिंतामणी सुशांत विजयी संघाचे शिल्पकार ठरले. पराभूत संघातर्फे राहुलची झुंज एकाकी ठरली.

गौरेश गयाडे आणि अभी बालगुडे यांच्या दमदार खेळाच्या जोरावर माऊलीने गरुडझेप संघाचा २१-११ गुणांनी पराभव केला. गरुडझेपच्या अभी सावंतने विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. संभाजी क्रीडा मंडळाने कोकण रत्न क्रीडा मंडळाला एकतर्फी लढतीत ४७-२९ गुणांनी सहज नमविले. विजयी संघाच्या साहिल दळवीने पल्लेदार चढाया करून कोकणरत्नचा बचाव मोडीत काढला. साहिलला सर्वेश भिमरावने आकर्षक पकडी करून छान साथ दिली. पराभूत संघाचा भावेश जंगले चमकला. गोरेगावच्या दत्तसेवा क्रीडा मंडळाला पहिल्या दिवशी संमिश्र यश लाभले. पहिल्या सामन्यात दत्त सेवाने शिवसाईला संघावर सहज विजय मिळवला. परंतु दुसऱ्या सामन्यात मात्र त्यांना नेताजी सुभाषकडून हार खावी लागली. प्रतिक म्हात्रे आणि प्रतिक मते या दोघांनी आकर्षक खेळ करून नेताजी सुभाषच्या विजयात मोठा वाटा उचलला.

खासदार गोपाळ शेट्टी, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जया शेट्टी, छाया शेट्टी यांच्या हस्ते स्पर्धेचा शानदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी पोईसर जिमखान्याचे अध्यक्ष मुकेश भंडारी, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, संतोष सिंग, निषाद कोरा, गणेश बारे हेदेखील उपस्थित होते. राष्ट्रीय खेळाडू करिष्मा म्हात्रेने खेळाडूंच्यावतीने शपथ घेतली.

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content