Homeटॉप स्टोरीदिशा सॅलियन प्रकरणाची...

दिशा सॅलियन प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार!

विरोधकांनी फोन टॅपिंग आणि रश्मी शुक्ला प्रकरणावरून सभात्याग केल्यानंतर गुरूवारी  प्रश्नोत्तराच्या तासानंतर सत्ताधारी पक्षही आक्रमक झाला आणि दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणावरून नागपूरमध्ये विधानसभेचे कामकाज आधी दहा मिनिटांसाठी, नंतर लागोपाठ दुसऱ्यांदा वीस मिनिटांसाठी आणि नंतर पाठोपाठ तिसऱ्यांदा १५ मिनिटांकरीता तहकूब करावे लागले. त्यानंतर पुन्हा दोन वेळा, अनुक्रमे १५ आणि १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर उपमुख्यमंत्री तथा गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणाची एसआयटी नेमून चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली.  

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार भरत गोगावले यांनी उभे राहून दिशा सॅलियन मृत्यूप्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. दिशा सॅलियन अभिनेते सुशांतसिंह राजपूत यांचे काम बघत होत्या आणि त्यांचा मृत्यू वरून खाली पडून झाला की वरून खाली फेकल्यामुळे झाला, असा प्रश्न गोगावले यांनी विचारला. या प्रश्नावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी सवाल उपस्थित केला की त्या रात्री झालेल्या पार्टीला कोण कोण उपस्थित होते, याचीही चौकशी व्हायला हवी. राणे यांनी त्या रात्री दिशा सॅलियन यांचा मृत्यू झाला तेव्हा राज्याच्या मंत्रिमंडळातील कोण मंत्री उपस्थित होता, अशी विचारणा करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. तसेच, हे प्रकरण सीबीआयकडे नसून राज्याच्या पोलिसांकडे आहे, असा दावाही त्यांनी केला. या प्रश्नावरून सत्ताधारी पक्षाचे आमदार सभागृहाच्या वेलमध्ये जमा होऊन घोषणा देऊ लागले आणि कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

कामकाज पुन्हा सुरू होताच पुन्हा नितेश राणे यांनी दिशा सॅलियनच्या मृत्यूप्रकरणाचा विषय पुढे नेला. दिशा सॅलियनने मृत्यूपूर्वी सुशांतसिंह राजपूतला एक फोटो पाठवला होता. त्या फोटोत कोण होते, हे सर्वांना कळायला हवे. ८ आणि ९ जूनच्या रात्री दिशा सॅलियन राहत असलेल्या इमारतीचे सीसीटिव्ही फुटेज कसे गायब झाले, व्हिजीटर बूकमधली त्यादिवसाची पाने कोणी फाडली, असे सवालही त्यांनी केले. हे सर्व चालू असतानाच सत्ताधारी तसेच विरोधक आक्रमक झाले होते. त्यामुळे झालेल्या गदारोळानंतर तालिकाध्यक्षांनी कामकाज दुसऱ्यांदा तहकूब केले.

कामकाज पुन्हा तहकूब

नितेश राणे यांनी सभागृहाचे कामकाज सुरू होताच पुन्हा एकदा दिशा सॅलियन मृत्यूप्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्रात एका महिलेचा संशयास्पद मृत्यू होतो आणि मुंबई पोलीस पोस्ट मॉर्टेम अहवाल देत नाहीत. ज्या इमारतीमध्ये हा प्रकार घडला तेथील सीसीटीव्ही फूटेज गायब होते, पोलिसांवर नेमका कोणाचा दबाव होता, असे प्रश्न राणे यांनी उपस्थित केले. सत्ताधारी पक्षाचे आमदार पुन्हा एकदा घोषणा देत सभागृहाच्या वेलमध्ये जमा झाल्याने तालिका अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब केले.

पुन्हा एकदा तहकूब

कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर सत्ताधारी भाजपाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी याप्रकरणी एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी केली. त्यापाठोपाठ मनीषा चौधरी यांनीही एका महिलेला न्याय मिळाला पाहिजे, असे सांगितले. भारती लव्हेकर यांनी यानिमित्त श्रद्धा वालकर हत्त्या प्रकरणाचा विषय उपस्थित केला. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातच पोलिसांनी तिची तक्रार दाखल करून घेतली नव्हती, असे त्यांनी सांगितले. या सर्व काळात सत्ताधारी पुन्हा आक्रमक झाले. तेव्हा तालिकाध्यक्ष संजय शिरसाट यांनी सभागृहाचे कामकाज चौथ्यांदा १५ मिनिटांसाठी तहकूब केले.

त्यानंतर कामकाज पुन्हा चालू झाले आणि पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षांचे सदस्य आक्रमक होऊन दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणाची चौकशीची मागणी करू लागले. त्यामुळे झालेल्या गदारोळानंतर कामकाज पुन्हा एकदा म्हणजे पाचव्यांदा तहकूब करण्यात आले.

कामकाज पुन्हा सुरू होताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची विशेष पथक (एसआयटी) नेमून चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली. त्याला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आक्षेप घेतला. या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली असून दिशा सॅलियनचा मृत्यू अपघाती असल्याचे नमूद केले आहे, असे ते म्हणाले. त्यावर फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी सीबीआयने केली नसल्याचे स्पष्ट केले. सीबीआयने सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी केल्याचेही त्यांनी सांगितले.

पुन्हा पायऱ्यांवर आंदोलन…

त्याआधी अधिवेशनाचे नियमित कामकाज सुरू होण्यापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी निदर्शने केली. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी यावेळी श्रीखंड आंदोलन केले. भूखंडाचे श्रीखंड खाणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा घोषणा ते देत होते. त्याला उत्तर देताना सत्ताधाऱ्यांनी महाविकास आघाडीकडून होत असलेल्या संतांच्या तसेच वारकऱ्यांच्या अपमानाचा मुद्दा लावून धरला. पण त्यात लक्षवेधी ठरणारा विषय होता तो खासदार राहुल शेवाळे यांनी काल लोकसभेमध्ये उपस्थित केलेल्या दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणाचा आणि त्यातील आदित्य ठाकरे यांचा उल्लेखाचा…. सत्ताधारी आमदारांच्या हातात तसे फलकही होते. या फलकांवर यह ए यु, ए यु, कौन है? असे प्रश्न विचारण्यात आले होते.

Continue reading

औचित्त्याची ऐशीतैशी…

मराठी भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचे औचित्त्य काय आहे, असे विचारताना औचित्त्य, या शब्दाचा अर्थ माहीत असणे अभिप्रेत असते. राज्याच्या विधानसभेत कामकाज केले जाताना औचित्त्याचे मुद्दे म्हणून काही बाबी आमदारांना उपस्थित करता येतात आणि सरकारने त्यावर उचित कार्यवाही करणेही अपेक्षित असते....

वाटाणा वाटाणा पे लिखा है `खाने’वाले का…

वाटाण्यावाटाण्यात काय फरक असणार, असे कोणी विचारले तर हा प्रश्न निरर्थक मानू नका. हिरव्या आणि पांढऱ्या वाटाण्यात फरक असतो आणि या फरकातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही सरकारवर होऊ शकतो, हे मंगळवारी राज्याच्या विधानसभेत दिसून आले. आमदार कैलास घाडगे-पाटील...

मुनगंटीवार वन्स अगेन!

सरकारी काम म्हणजे सहा महिने थांब... असं कायम म्हटलं जातं आणि नेमका त्याचाच अनुभव राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आल्याचे गुरुवारी राज्याच्या विधानसभेत स्पष्ट झाले. सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांनी आपल्या वृद्ध पालकांची तसेच कुटुंबातील दिव्यांग व्यक्तींची जबाबदारी घ्यावी, याची...
Skip to content