Homeन्यूज ॲट अ ग्लांसचंद्राची न शिवली...

चंद्राची न शिवली गेलेली चड्डी आणि नोकरभरती…

आभाळात चड्डी न घालता दिमाखात वावरणारा आणि अखिल विश्वाचे लक्ष वेधून घेणारा चंद्र आणि महाराष्ट्रातील नोकरभरती याचा काय संबंध आहे? असं विचारलं तर तुम्ही गोंधळात पडाल. पण सध्या रोजच्या रोज विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावणारे राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा संबंध एका लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान स्पष्ट केला.

नोकरभरतीच्या वेळी मागासवर्गीय प्रवर्गातील अर्जदारांना आकारले जाणारे शुल्क या विषयावरील ही लक्षवेधी आमदार श्वेता महाले यांनी मांडली होती. त्यावर मंत्री आशिष शेलार यांनी उत्तर दिले. आमदार नितीन राऊत, राजकुमार बडोले, मुनगंटीवार, प्रताप अडसड यांनी लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत उपप्रश्न विचारून भाग घेतला. मुनगंटीवार यांनी उपप्रश्न विचारताना

चंद्र

आभाळातील चंद्राची गोष्ट सांगितली. चंद्राच्या आईने चंद्राला चड्डी शिवायला सुरुवात केली. पण दुसऱ्या दिवशी तो थोडा मोठा झालेला होता. त्याच्या आईने पुन्हा चड्डी शिवली तर तो पुन्हा मोठा झाला आणि पौर्णिमेनंतर तर तो पुन्हा लहान लहान होऊ लागला. त्यामुळे त्याला चड्डी काही मिळाली नाही आणि आपण त्याला आभाळात तो आहे तसाच बघत आहोत. तीच गोष्ट सरकारी भरतीची आहे, असंही मुनगंटीवार म्हणाले.

भरती करायची म्हणजे आधी विभागाकडून पदं भरण्याविषयी सांगितलं जातं. ते झालं की मग आकृतीबंध, मग बिंदूनामावली आणि मग भरतीप्रक्रिया… या गोष्टी करताना सरकारनं दहा पदांची भरती करण्याची प्रक्रिया राबवली की तोपर्यंत वीस पदं रिक्त होतात. हे सारं बदलण्याची ताकद आशिष शेलार यांच्यासारख्या दमदार नेत्यामध्ये आहे, अशी पुस्तीही मुनगंटीवार यांनी जोडली. राज्यामध्ये सीएसआर म्हणजे एसआर म्हणजे एक्झामिनेशन रिस्पॉन्सिबिलिटी फंड म्हणून वेगळा काढला तर नोकरीच्या कोणत्याही परीक्षेसाठी उमेदवारांना शुल्क द्यावे लागणार नाही. त्यातून परीक्षेसाठी तीनशे किलोमीटरवरून येणाऱ्या उमेदवारांना खर्चाची तोशिस पडणार नाही. या ईएसआरमधून उमेदवारांना प्रवासात सवलत, शुल्कात सवलत किंवा माफी हे सर्व देता येईल, असेही मुनगंटीवार यांनी सुचवले. हे सर्व सुचवताना मुनगंटीवार शेलार यांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही हे सर्व करा म्हणजे तुम्ही चिरंजीव मंत्री राहाल.

(लेखक शैलेंद्र परांजपे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

Continue reading

मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोहित पवारांना सुनावले!

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातामध्ये घातपात असला तर त्यात दोषी असलेल्या व्यक्तीला कोणत्याही थराला जाऊन दंडित करू, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत घोषणा केली आणि रोहित पवार यांच्या सर्व आरोपांना सविस्तर उत्तर दिले. अजित पवार...

आदित्य ठाकरेंना नितेश राणे देणार कोल्ड कॉफी!

नारायण राणे आणि त्यांचे मंत्री असलेले चिरंजीव नितेश राणे, हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर कडवट शब्दात टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण, विधानसभेत मंगळवारी कोकणाच्या प्रश्नांवरील चर्चेला उत्तर देताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेत आदरयुक्त उल्लेख...

औचित्त्याची ऐशीतैशी…

मराठी भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचे औचित्त्य काय आहे, असे विचारताना औचित्त्य, या शब्दाचा अर्थ माहीत असणे अभिप्रेत असते. राज्याच्या विधानसभेत कामकाज केले जाताना औचित्त्याचे मुद्दे म्हणून काही बाबी आमदारांना उपस्थित करता येतात आणि सरकारने त्यावर उचित कार्यवाही करणेही अपेक्षित असते....
Skip to content