जीनके अपने घर शिसेके हो वो दुसरे के घर पत्थर नही मारते किंवा स्वतः विडी ओढणारा इतरांना कसे सांगू शकतो की धूम्रपान वाईट आहे किंवा स्वतः जीन्स घालून साधी भाजी विकत आणायला जाणारी बाई तिच्या सुनेला कशी सांगू शकेल की नऊवारी नेसल्याशिवाय बाहेर पडू नको. एकेकाळी स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांवर पेटून उठणाऱ्या नेत्या विद्या चव्हाण स्वतःच्या सुनेच्या छळवणूक व फसवणूकप्रकरणी अडचणीत आल्या असल्याने त्यांनाच आता सारे काही समोर स्पष्ट दिसत असूनही पूजा चव्हाणप्रकरणी त्यांच्या महाआघाडीला ज्ञान पाजणे अशक्य झाले आहे. पण मला आश्चर्य वाटते ते डॉ. नीलम गोऱ्हे यांचे. म्हणजे एखादी आक्रमक स्त्री नेता प्रसंगी केवळ सत्तेपायी कशी लाचार होऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले. विशेषतः गरीब बिचाऱ्या पूजा प्रकरणात ज्या पद्धतीने अत्यंत नालायक मंत्र्याला वाचवले जात आहे आणि नीलम गोऱ्हे मूग गिळून गप्प बसल्या आहेत. शी.. लाज वाटते आम्हाला की तुम्हीही अशा कशा? त्यामानाने जेवढे कौतुक करावे तेवढे त्या चित्रा वाघ यांचे.. म्हणजे ज्या आक्रमक पद्धतीने त्या पूजा चव्हाण आत्महत्त्या प्रकरण उचलून धरताहेत आणि त्वेषाने बाजू मांडताहेत, सॅल्यूट चित्रा वाघ तुम्हाला. जर यावेळी पूजा प्रकरणदेखील महाआघाडीने नेहमीप्रमाणे दाबून टाकले तर फार फार मोठे राजकीय नुकसान उद्धव ठाकरे यांचे होईल. त्यांच्या आजपर्यंतच्या उत्तुंग नेतृत्त्वाला त्याची झळ पोहोचणार आहे हे माझे वाक्य याठिकाणी लिहून ठेवा. मी तर आजपर्यंत कायम सांगत, लिहीत आलोय की उद्धव यांना कधीही अंडरएस्टीमेट करू नका, कारण ते केव्हाही झेप घेऊन, इतरांना मागे सोडून पहिल्या स्थानावर येऊन बसतील. एवढे ते प्रसंगी मुत्सद्दी व आक्रमक असतात आणि वागतात. पण याच उद्धव यांचा आयुष्यात पहिल्यांदा यासाठी राग येतो की समोर वनमंत्री संजय राठोड यांचे एक नव्हे तर असंख्य पुरावे असताना उद्धव त्यांची विकेट घेण्यात चालढकल करताहेत जे अत्यंत घृणास्पद आहे..

उद्धवजी, एक स्त्रीलंपट नेता आणि भ्रष्ट मंत्री म्हणून त्या संजय राठोड यांचे तुम्हाला एवढे पुरावे देऊनही समाधान होत नसेल तर तसे सांगा. माझ्याकडे आणखी कितीतरी त्यावर पुरावे आहेत. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे गेली दोन ते तीन वर्षे संजय राठोड जे दोन वेगवेगळे भ्रमणध्वनी वापरत होते त्या व पूजा चव्हाण यांच्या भ्रमणध्वनींचे केवळ लोकेशन जरी पोलिसांनी शोधले तरी त्यातून अनेक धक्कादायक पुरावे बाहेर पडतील. हे मी अतिशय खात्रीने सांगू शकतो. विशेष म्हणजे संजय राठोड यांच्या खाजगी सचिवांना त्यांच्या सहा वेगवेगळ्या स्वीय सहाय्य्यकांना पोलिसांनी विश्वासात घेऊन पूजा चव्हाण प्रकारणात माहिती घ्यावी, पोलिसांच्या हे लक्षात येईल की राठोड यांना त्यांचा स्टाफ कितींदा तरी हेच निक्षून सांगत असे की पूजाला शासकीय किंवा खासगी दौऱ्यावर आपल्या कारमध्ये बसवून घेऊ नये. तिची स्वतःसंगे वरात काढू नये. पण पूजाच्या प्रेमात त्यावेळी आकंठ बुडालेल्या संजय राठोड यांना पूजाविषयी छेडल्यास पटकन राग येत असे, अशी माझी पक्की माहिती आहे. विशेष म्हणजे संजय राठोड यांची प्रेमप्रकरणे, त्यावर अनेकदा त्यांचे आपल्या पत्नीशी खटके उडायचे. अर्थात शोध घेणाऱ्या पोलिसांनाच सत्य शोधायचे नसल्याने सारे काही दडपण्याचा थेट पोलिसांकडूनदेखील सतत प्रयत्न सुरू आहे. देव करो आणि राठोड यांना सहकार्य करणाऱ्या पोलिसांच्या मुलींच्या बाबतीत कधी असे न घडो. आज पूजा चव्हाण हिने आत्महत्त्या केल्या दिवसापासून ज्या अरुण राठोड व विलास चव्हाण या दोघांना दस्तुरखुद्द संजय राठोड यांनी पूजासोबत ठेवले होते ते दोघेही एकाचवेळी गायब आहेत आणि त्या दोघांचीही प्रेते जर पुढल्या काही दिवसांत तुम्हाला कुठे आढळली तर त्यात अजिबात अस्वस्थ होण्याचे कारण नाही. कारण त्या दोघांबाबत म्हणे वाटचाल त्याचदृष्टीने सुरू आहे. केव्हाही त्या दोघांनी पण पूजा पद्धतीने आत्महत्त्या केली अशी बातमी आपल्या सर्वांच्या कानावर पडू शकते. वनमंत्र्याने या राज्यात खऱ्या अर्थाने जंगल राज सुरू केले आहे असे उद्धव यांच्या यावेळीदेखील घेतलेल्या मवाळ भूमिकेवरून दिसते आहे..

वाचकांनो, आधी तुम्ही एक अत्यंत महत्त्वाचे काम करा. म्हणजे हा लेख वाचत असताना आताच्या आता जागेवर उभे राहा आणि शरद पवार यांना कौतुकाने, अभिमानाने नजरेसमोर आणून त्यांना मानवंदना द्या. गच्चीत उभे राहून सतत पाच मिनिटे टाळ्या वाजवा, कारण शरद पवार यांनी संजय राठोड यांच्यामुळे पूजाने केलेल्या आत्महत्त्याप्रकरणी ज्यापद्धतीने उद्धव ठाकरे यांना खडसावले आहे त्यासाठी त्यांच्यासाठी आपल्याला ह्या टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि हो, शरद पवार हे असेच प्रसंगी वागायला आणि बोलायला कठोर व कर्तव्यदक्ष आहेत. आधी त्यांनी तशी करणी केलेली आहे, करून दाखवलेली आहे. म्हणजे पवार यांनी छगन भुजबळ, आर आर पाटील आणि अजित पवारांचे, या तिघांकडून काही गंभीर चुका घडल्यानंतर असेच तडकाफडकी मंत्रीपदाचे राजीनामे घेतले आहेत आणि निर्दोषत्व सिद्ध केल्यानंतर याच शरद पवार यांनी त्या तिघांनाही पुन्हा मंत्रीपद बहाल केल्याचा इतिहास ताजा आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांनी आर आर आबांना तर पुन्हा गृह खाते देऊन मी कसा तुमच्या पाठीशी उभा आहे हे सिद्ध करून दाखवले आहे. पवार त्या दरम्यान कौतुकास पात्र ठरले आहेत. त्यांनी स्वतः आधी तसे केले म्हणून कालपरवा पवारांनी अधिकारवाणीने उद्धव यांना खडसावले. तरीही उद्धव ठाकरे जर संजय राठोड यांची विकेट काढायला तयार होत नसतील तर पूजा प्रकरण कदाचित कायदयाच्या कचाट्यातून अलगद बाहेर पडेल, पण लोकांच्या मनावर ज्या फार मोठ्या जखमा उद्धवजी या क्षणी झालेल्या आहेत त्या तुम्हाला भरून काढणे पुढे कधीही शक्य होणार नाही. तुमची यावेळची ही चूक तुम्हाला नक्की भोवणार आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. त्या नालायक मंत्र्याचा राजीनामा मागा आणि पूजा चव्हाण किंवा इतर गंभीर प्रकरणी संजय राठोड यांना वठणीवर आणा. तुम्ही हे करा. उद्या एखादा उमदा धाडसी नेता त्या बंजारा समाजात तुमच्यासाठी तयार होईल आणि आमच्या विदर्भाचे नेतृत्त्व करेल. उद्धवजी तुम्ही ही विकेट घ्यायलाच हवी..

