विधानसभेमध्ये अनेकदा आमदार वेळेचं भान राखत नाहीत आणि आम्हाला पुरेसा वेळ मिळत नाही, अशी तक्रारही करतात. पण, गुरुवारी विधानसभेत हरकतीचा मुद्दा उपस्थित करत भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी एका रंजक विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. सभागृहात सर्व सदस्यांचे अधिकार एकसमान आहेत. पण, संपूर्ण सभागृहात केवळ तीनच सदस्यांना दोन माईक देण्यात आले आहेत आणि या गोष्टीला माझी हरकत आहे, असा मुद्दा शेलार यांनी मांडला.
हा मुद्दा मांडताना हे तीन लोक म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार, असं शेलार यांनी सांगितलं. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शेलार म्हणाले की, अध्यक्षमहाराज तुम्हालाही एकच माईक आहे. त्यावर नार्वेकर यांनी आपल्यासमोरचा दुसरा माईकही वर करून दाखवला. त्यावर शेलार यांनी हसत हसत प्रश्न विचारला की या तीन जणांचं बोलणं सभागृहात ऐकू येण्याबरोबरच दुसऱ्या माईकमधून त्याचे बाहेर कुठे रेकॉर्डिंग तर केले जात नाही ना… त्यामुळे माझी या तिघांना दोन माईक असायला हरकत आहे.
उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आमचा दुसरा माईक नवी दिल्लीला जोडलाय, असे हसत हसत सांगितले तर माझाही दुसरा माईक दिल्लीला जोडलाय, असे अजित पवार यांनीही सांगितले. त्यावर सत्ताधारी बाकांपैकी एका सदस्याने तुमचाही, असं विचारल्यावर अजित पवार उत्तरले, आमच्या पक्षाचंही दिल्लीत कार्यालय आहे, असं सांगितलं आणि सभागृहात एकच हंशा उसळला.
दहीहंडी यापुढे क्रीडाप्रकार
दहीहंडीच्या वेळी बघायला मिळणाऱ्या गोविंदा पथकांना आणि त्यांच्या हंडीचा क्रीडाप्रकारात समावेश होणार असून कबड्डीसारखीच प्रो-गोविंदा अशी स्पर्धाही घेऊन राज्य सरकार या स्पर्धेतल्या विजेत्यांना रोख बक्षिसेही देईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी गुरुवारी विधानसभेत केली.
औचित्याच्या मुद्द्याद्वारे प्रताप सरनाईक यांनी याबाबत सभागृहात विषय मांडला होता. त्याआधी सुनील प्रभू यांनी या विषयावर सभागृहाचे लक्ष वेधले होते. गोविंदा पथकांना आणि या खेळाला साहसी खेळ म्हणून देण्याबद्दल यापूर्वीही मागणी करण्यात आली होती. गोविंदा पथकातील सहभागींचा विमा काढला जावा, या प्रभू यांच्या मागणीवर उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी गोविंदा पथकांचा सामूहिक विमा काढला जातो, असे स्पष्ट केले. तसेच गोविंदा पथकातील सहभागींपैकी कोणाही गोविंदाचा दहीहंडीच्या वेळी मृत्यू ओढवल्यास दहा लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येईल आणि जखमींना पाच लाख रुपये भरपाई देण्यात येईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली.
जखमी गोविंदांवर सर्व सरकारी रुग्णालयांमधे मोफत उपचार केले जातील, असेही मुख्यमंत्री शिन्दे यांनी जाहीर केले. शिन्दे यांनीही नुकसानभरपाईबद्दलची माहिती प्रताप सरनाईक यांच्या औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना दिली.
दहीहंडी पथकातील गोविंदांना सरकारी नोकरीत सामावून घेण्यात येईल आणि त्यांच्यासाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये पाच टक्के जागा आरक्षित ठेवल्या जातील, अशी घोषणाही मुख्यमंत्री शिन्दे यांनी केली. साहसी खेळ म्हणून मान्यता दिलेली नाही. तसेच गोविंदांसाठी एकूण खेळाडूंना असलेल्या पाच टक्के सरकारी नोकरीतील आरक्षणात जागा दिली जाईल म्हणजे गोविंदानांही क्रीडापटू म्हणून पाच टक्के आरक्षणातून नोकऱ्या मिळू शकतील. फक्त गोविंदांना पाच टक्के आरक्षण नाही.

