Homeडेली पल्सआजपासून तुलसी विवाह.....

आजपासून तुलसी विवाह.. असा साजरा करा सण!

तुलसी विवाह कालावधी या वर्षी कार्तिक शुद्ध द्वादशी (१५ नोव्हेंबर)पासून ते कार्तिक पौर्णिमा (१९ नोव्हेंबर)पर्यंत आहे. म्हणजेच आजपासून तुलसी विवाहाला प्रारंभ होत असून तो १९ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. यानिमित्ताने तुलसी विवाह हा सण साजरा करण्याची पद्धत, या सणाची वैशिष्ट्ये, तुलसी दर्शनाचे महत्त्व, तुलसीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये, तुलसीचा विवाह प्रतिवर्षी श्रीकृष्णासमवेतच लावण्यासंबंधीची कथा, देवाला नैवेद्य दाखवताना तुलसीच्या पानाचा वापर का करावायासंबंधीची शास्त्रीय माहिती तसेच आपत्कालीन स्थितीत तुलसी विवाह साजरा करण्याविषयी उपयुक्त सूत्र आणि दृष्टीकोन सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या लेखात येथे देत आहोत.

1. तिथी                                    

हा विधी कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी करतात.

2. पूजन

श्रीविष्णूचा (बाळकृष्णाच्या मूर्तीचा) तुलसीशी विवाह लावून देणे, हा तुलसी विवाहाचा विधी आहे. पूर्वीच्या काळी बालविवाहाची पद्धत होती. विवाहाच्या पूर्व दिवशी तुलसी वृंदावन रंगवून सुशोभित करतात. वृंदावनात ऊस, झेंडूची फुले घालतात आणि मुळाशी चिंचा अन् आवळे ठेवतात. हा विवाहसोहळा सायंकाळी करतात.

3. वैशिष्ट्ये

तुलसी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रते घेतलेली असतील, त्या सर्वांची सांगता करतात. चातुर्मासात जे पदार्थ वर्ज्य केले असतील, ते पदार्थ ब्राह्मणाला दान देऊन मग स्वतः सेवन करतात.

तुलसीच्या रूपात लक्ष्मीची आणि श्रीकृष्णाच्या रूपात श्रीविष्णूची पूजा केली जाते. विष्णू आणि लक्ष्मी या दोन्ही तत्त्वांचा अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी सायंकाळी तुलसी विवाह साजरा केला जातो. तुलसी विवाहाच्या मुहूर्त कालातच श्रीविष्णु-लक्ष्मी या दोन तत्त्वांच्या लहरींचे आगमन आणि संयोग घडून येत असतो. वातावरणातील या सात्त्विकतेचा फायदा मिळावा, यासाठी तुलसी विवाह हा मुहूर्त कालातच करावा.

4. तुलसी दर्शनाचे महत्त्व

प्रत्येक हिंदूच्या घरी तुळस असायलाच हवी, असा संकेत आहे. सकाळी आणि सायंकाळी सर्वांनीच तुलसीदर्शन करावे, असे सांगितले आहे. या तुलसीदर्शनाचा मंत्र पुढीलप्रमाणे आहे.

तुलसि श्रीसखि शुभे पापहारिणि पुण्यदे।

नमस्ते नारदनुते नारायणमनःप्रिये॥ – तुलसीस्तोत्र, श्‍लोक १५

अर्थ: हे तुलसी, तू लक्ष्मीची मैत्रीण, शुभदा, पापहारिणी आणि पुण्यदा आहेस. नारदाने स्तवलेल्या आणि नारायणाला प्रिय अशा तुला मी वंदन करतो.

तुलसी

5. तुलसीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये

पापनाशक: तुलशीचे दर्शन, स्पर्श, ध्यान, नमन, पूजन, रोपण आणि सेवन या गोष्टी युगायुगांची पातके नष्ट करतात.

पवित्रता: तुलसीचे बन असलेल्या परिसरातील कोसभर भूमी गंगेसारखी पवित्र बनते. या संदर्भात स्कन्दपुराणात (वैष्णवखण्ड, अध्याय ८, श्‍लोक १३मध्ये) म्हटले आहे,

तुलसीकाननं चैव गृहे यस्यावतिष्ठते।

तद् गृहं तीर्थभूतं हि नायान्ति यमकिङ्कराः॥

अर्थ : ज्या घरी तुलसीचे वन आहे, ते घर तीर्थासारखे पवित्र होय. त्या घरात यमदूत येत नाहीत.

सर्व देवतांचा वास असणे: तुलसीच्या वनस्पतीत मुळापासून अग्रापर्यंत सर्व देवता वास्तव्य करतात, असे सांगितले आहे.

श्रीविष्णूला परमप्रिय असणे: तुलसी वृंदावनात राहते. ती श्रीविष्णूला परमप्रिय आहे. तुलसीदलाविना श्रीविष्णूची पूजा केल्यास ती व्यर्थ ठरते. पद्मपुराणात म्हटले आहे की, सुवर्ण, रत्ने आणि मोती यांची फुले श्रीविष्णूला वाहिली, तरी त्यांना तुलसीदलाच्या १६व्या कलेचीही सर येणार नाही. तुलसीपत्र ठेवल्यावाचून किंवा तुलसीदलाने प्रोक्षण केल्यावाचून श्रीविष्णू नैवेद्य ग्रहण करत नाहीत. कार्तिक मासात (महिन्यात) तुलसीदलाने केलेल्या विष्णुपूजेचे माहात्म्य विशेष आहे. श्रीविष्णू, श्रीकृष्ण किंवा पांडुरंग यांच्या गळ्यात तुलसीचा घवघवीत हार घालतात. – संदर्भ: भारतीय संस्कृतीकोश, खंड ४, पान क्र. १५५

6. तुलसी विवाह प्रतिवर्षी श्रीकृष्णासमवेतच लावण्यासंबंधीची कथा!

देवांचे जलंधर दैत्याशी युद्ध चालू होते. त्या जलंधराची वृंदा नावाची पत्नी पतिव्रता होती. तिच्या पातिव्रत्याच्या प्रभावामुळे देवांकडून जलंधर दैत्याचा वध होत नव्हता. श्रीविष्णूने जलंधराचे रूप घेऊन वृंदेचे पातिव्रत्य भ्रष्ट केले. त्याचवेळी श्रीविष्णूने वृंदेच्या पातिव्रत्यावर प्रसन्न होऊन तिला वर दिला, ‘वृंदा, तू तुळस होऊन सर्वांना वंदनीय होशील. तुझ्या तुलसीपत्राने भक्त माझी पूजा करतील. तसेच प्रतिवर्षी कार्तिक मासात तुझा विवाह माझ्याशी लावण्यात येईल.’

भगवान श्रीकृष्ण हा श्रीविष्णूचा पूर्णावतार आहे. त्यामुळे प्रतिवर्षी कार्तिक शुक्ल पक्ष द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी तुलसीचा विवाह श्रीकृष्णाशी लावतात.

7. देवाला नैवेद्य दाखवताना तुलसीच्या पानाचा वापर का करावा?

तुळस ही वनस्पती वायूमंडलातील सात्त्विकता खेचण्यात आणि ती प्रभावीपणे जिवाकडे प्रक्षेपित करण्यात अग्रेसर आहे. ब्रह्मांडातील श्रीकृष्णतत्त्व खेचून घेण्याची क्षमताही तुलसीत अधिक असते.  देवाला नैवेद्य दाखवताना तुलसीच्या पानांचा वापर केल्याने नैवेद्य देवतेपर्यंत लवकर पोहोचणे, सात्त्विक होणे, हे साध्य होते.

8. प्रश्‍न: तुलसी विवाहासाठी पुरोहित उपलब्ध झाले नाहीत, तर काय करावे?

उत्तर: तुलसी विवाहासाठी पुरोहित उपलब्ध झाले नाहीत, तर आपल्याला जशी जमेल, तशी भावपूर्ण पूजा करावी. तेही जमत नसेल, तर ‘श्री तुलसीदेव्यै नमः’ असा नामजप करत तुलसीची पूजा करावी. पूजा झाल्यावर रामरक्षेतील पुढील ओळी म्हणाव्यात.

‘रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे।

रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः॥

रामान्नास्ति परायणम् परतरम् रामस्य दासोऽस्म्यहम्।

रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर॥’

त्यानंतर बृहद्स्तोत्ररत्नाकर या ग्रंथामधील सरस्वतीस्तोत्राच्या आरंभीच्या पुढील ओळी म्हणाव्यात.

‘या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता।

या वीणावरदण्डमण्डितकरा या श्‍वेतपद्मासना॥

या ब्रह्माच्युत शंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता।

सा माम् पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा॥’

हे श्‍लोक म्हटल्यावर ‘सुमुहूर्त सावधान’ असे म्हणून तुलसीवर अक्षता वाहव्यात.

संदर्भ:  सनातन संस्थेचे  ग्रंथ ‘पंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र’ आणि ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

संपर्क क्रमांक: 9920015949 

Continue reading

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...
Skip to content