Homeमाय व्हॉईसट्रम्प पिसाटले! इराणनंतरचे...

ट्रम्प पिसाटले! इराणनंतरचे टार्गेट क्युबा!! भारतावरही नियंत्रणाचा प्रयत्न!!!

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पिसाटले आहेत. व्हिएतनाम, अफगाणिस्तान, इराक, अशा देशांवर लष्करी कारवाई करत आपल्या ओंजळीने पाणी पिणारे सरकार तिथे बसवल्यानंतर त्यांनी व्हेनेझुएलावर लष्करी कारवाई करत तिथले राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांचे अपहरण केले. अंमली पदार्थांच्या धंद्याचा आरोप करून त्यांना अमेरिकेत बंदिवासात ठेवले. तेथे अमेरिकी कायद्यानुसार त्यांच्याविरोधात खटला चालवला जाणार आहे. व्हेनेझुएलानंतर ट्रम्प यांनी युरोपियन युनियनचे सदस्य असलेल्या डेन्मार्कमधल्या ग्रीनलँडकडे नजर वळवली. आम्हाला हा भूभाग हवा आहे. त्याचे नियंत्रण आम्ही करू. त्याची योग्य ती किंमत मोजली जाईल, असे ट्रम्प म्हणाले. लष्करी कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. पुढे युरोपियन युनियन आणि नाटोच्या देशांच्या तीव्र विरोधानंतर ट्रम्प यांनी लष्करी कारवाईचा नाद सोडला. मात्र, यावरून त्यांनी युरोपियन युनियनच्या देशांबरोबरच्या व्यापारावर टॅरिफ लावला. नंतर त्यांनी इस्त्रायलच्या मदतीने इराणमध्ये सत्तांतरासाठी आक्रमण चालवले आहे. आज सातव्या दिवशीही ही लष्करी कारवाई सुरू आहे. हे कमी झाले की काय, यानंतर आपण क्युबाकडे बघणार आहोत, असे ते म्हणाले. इराणवरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर भारताला तेलसंकटावर मात करणे शक्य व्हावे म्हणून ट्रम्प यांनी पुढचे ३० दिवस रशियाकडून तेल खरेदी करण्यास अनुमती दिली आहे. हा फार कमी काळ आहे, त्यामुळे रशियाला विशेष आर्थिक लाभ होणार नाही, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. ट्रम्प यांची एकंदर ही वृत्ती पाहता अलेक्झांडर द ग्रेट (इ.स.पू. ३५६-३२३), चंगेज खान, चार्ल्स पाचवा, नेपोलियन बोनापार्ट आणि अ‍ॅडॉल्फ हिटलर यांच्यानंतर जग जिंकायला निघालेला एक वर्तमान नेता म्हणून त्यांना संबोधावे लागेल.

अलेक्झांडर द ग्रेट, हे असे ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहे जे ज्ञात जग जिंकण्याच्या महत्त्वाकांक्षेसाठी ओळखले जाते. वयाच्या ३०व्या वर्षी ग्रीसपासून भारतापर्यंत साम्राज्य उभारण्यासाठी ते ओळखले जातात. पश्चिम आशिया आणि ईशान्य आफ्रिकेत पसरलेल्या इतिहासातील सर्वात मोठ्या साम्राज्यांपैकी एकाची निर्मिती त्यांनी केली, असे बोलले जाते. चंगेज खान यांनी मंगोल साम्राज्याची स्थापना केली, जी इतिहासातील सर्वात मोठी संलग्न भू-साम्राज्य बनली. चार्ल्स पाचवा (पवित्र रोमन सम्राट) यांनी १६व्या शतकात डोमिनियम मुंडी (सार्वत्रिक राजेशाही) करण्याची आकांक्षा व्यक्त केली होती. नेपोलियन बोनापार्ट यांनी फ्रेंच वर्चस्वाखाली युरोपला एकत्र करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर अ‍ॅडॉल्फ हिटलर यांनी नाझींच्या नेतृत्त्वाखालील युरोपियन सुपरस्टेट स्थापन करण्याचा प्रयत्न केला. हा जागतिक वर्चस्वाचा शेवटचा वास्तववादी प्रयत्न मानला जातो, अशी इतिहासात नोंद आहे. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता जग जिंकायला निघाले आहेत.

अमेरिका आणि इराण यांच्यातल्या युद्धाचा आज सातवा दिवस असून आजही इराणकडून अमेरिका तसेच इस्त्रायलला चोख प्रत्त्युत्तर दिले जात आहे. इराण जेरीस येईपर्यंत हल्ले चालू राहतील, असे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. २८ फेब्रुवारीपासून अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर लष्करी कारवाई सुरू केली आहे. अमेरिकेने या कारवाईला युद्ध असे न संबोधता त्याला एपिक फ्युरी असे नाव दिले आहे तर इस्त्रायलने या कारवाईला रोअर ऑफ लायन, असे संबोधले आहे. इराणवर झालेल्या हल्ल्यात अमेरिकेने इराणचे प्रमुख आयातुल्ला अली खामेनेई तसेच त्यांच्या सर्व प्रमुख अशा ४८ नेत्यांना ठार केल्याचे अमेरिकेने जाहीर केले आहे. इराणला आपण जवळजवळ संपवल्याचा दावा अमेरिकेने केला असला तरी इराणकडून दिले जात असलेले प्रत्त्युत्तर पाहता आखातातले युद्ध वलकर संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे अमेरिकेवर तोंडावर पडण्याची वेळ आली आहे.

अली खामेनेई यांच्या जागी, इराणचे सर्वोच्च नेते म्हणून खामेनेई यांचे द्वितीय पुत्र मोजतबा खामेनेई यांनी सूत्रे स्वीकारली आहेत. ट्रम्प यांना खामेनेई-२ यांचे सरकार मंजूर नाही. हे सरकार आम्हाला मान्य नाही. ते सरकार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत इराणवरचे हल्ले चालूच राहतील, असे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. आम्हाला इराणचे हे नेतृत्त्व मान्य नाही. आमच्याकडे अनेक योग्य नेते आहेत जे इराण सांभाळू शकतील. इराणचा सर्वोच्च नेता कोण असेल हे आम्ही ठरवू, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांची मदार इराण तसेच आसपासच्या काही राष्ट्रांमध्ये असलेल्या कूर्द जमातीवर अवलंबून होती. कूर्द समाज हा आक्रमक समाज मानला जातो आणि जमिनीवरची लढाई लढण्यात, गनिमी काव्याने हल्ले करण्यात ते वाकबगार असल्याचे बोलले जाते. ट्रम्पचा अंदाजाप्रमाणे त्यांच्या हल्ल्यानंतर खामेनेई सरकार गुडघे टेकेल आणि त्याचवेळी कूर्द सैनिक सत्तेचा ताबा घेतील, असा होता. त्यादृष्टीने ट्रम्प यांनी कूर्द नेत्यांशी अनेकदा चर्चाही केली होती. मात्र प्रत्यक्षात तसे काहीच घडले नसल्याने ट्रम्प वैतागले आहेत.

इराणचे दिवंगत प्रमुख खामेनेई यांच्या पार्थिवावर आज मश्शगत येथे अंत्यसंस्कार होणार होते. यापूर्वी दोन दिवस म्हणजे परवापासून त्यांचे पार्थिव इराणी जनतेसाठी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार होते. मात्र इराणच्या सरकारने अंत्यदर्शनाचा कार्यक्रम एनवेळी रद्द केला. त्याचबरोबर खामेनेईंवर आज अंत्यसंस्कार होतील की नाही याबद्दलही शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे खामेनेई जर अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्यू झाला असेल तर त्यांचे पार्थिव आहे तरी कुठे? ते दिसत का नाही? आणि त्यावर अंत्यसंस्कार केले का जात नाहीत, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे खामेनेई खरेच मारले गेले का, की त्यांच्या मृत्यूची आवई उठवून त्यांना गुप्त ठिकाणी हलवण्यात आले आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे.

ट्रम्प

एकीकडे इराणवर लष्करी कारवाई सुरू असतानाच काल ट्रम्प यांनी दोन महत्त्वाची विधाने केली आहेत. एक म्हणजे इराणनंतर क्युबावर नियंत्रण मिळवण्याचा मनोदय आणि दुसरे म्हणजे भारताला रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यास तात्पुरती मुभा. इंटर मियामी सीएफसोबत व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या कार्यक्रमात बोलताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, क्युबाकडे लक्ष वेधण्यापूर्वी अमेरिका इराणसोबत सुरू असलेला संघर्ष संपवण्यास प्राधान्य देईल. क्युबाकडे लक्ष देणे केवळ वेळेचा प्रश्न असेल. व्हेनेझुएलातील परिस्थिती आता “स्थिर” झाली आहे. अमेरिकेतला महसूल पूर्ववत होईपर्यंत अमेरिका व्हेनेझुएलाचे तेल शुद्धीकरणासाठी आयात करत आहे, असेही ते म्हणाले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारताला ३० दिवसांपर्यंत रशियाकडून कच्च्या तेलाची आयात करण्याची परवानगी दिल्याचेही म्हटले आहे. ट्रम्प यांच्या या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे. कोणाकडून किती तेल घ्यावे, कधी घ्यावे, कोणत्या दराने घ्यावे हे ठरवणारी अमेरिका कोण? डोनाल्ड ट्रम्प कोण? काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनीही हा सवाल केला आहे. शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी ट्रम्प यांनी भारताला ट्रम्प यांनी गुलामाची उपमा दिल्याचे सांगितले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्र सरकारच्या कोणत्याही प्रतिनिधीने ट्रम्प यांच्या या विधानावर भाष्य केलेले नाही. केंद्र सरकारच्या या मौनामुळे भारतावरही आता अमेरिका हुकूमत गाजवणार का, असा सवाल निर्माण होतो. भारताने पाकिस्तानविरोधात अलीकडेच केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेला युद्धविराम आपल्या आदेशानुसार झाला, असा दावा ट्रम्प यांनी केला होता. त्यामुळे भारताची झालेली नाचक्की अजूनही धुतली गेलेली नाही. अशावेळी ट्रम्प यांचे हे नवे विधान भारताच्या सार्वभौमतेला असलेले एक आव्हान मानले जात आहे. अमेरिकेबरोबर भारताने केलेल्या करारामध्ये रशियाकडून तेल घेणार नसल्याचे मान्य केले का? अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतरही रशियाकडील तेलखरेदी चालू असेल तर तसे भारताने जाहीररीत्या स्पष्ट करायला हवे. भारतीयांना कायम संभ्रमात ठेवणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला शोभणारे नाही.

(लेखक किरण हेगडे ज्येष्ठ पत्रकार आणि ‘किरण हेगडे लाईव्ह’चे संपादक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

इराणवरच्या कारवाईत ट्रम्प तोंडघशी!

जगातल्या तेलसाठ्यांवर आपले वर्चस्व निर्माण करत जगभरात मी सांगेन ती पूर्व दिशा.. अशा थाटात वावरण्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वप्न धुळीस मिळाले आहे. इराणवर आपल्या लष्करी सामर्थ्याचा प्रहार करत तिथली खलिफा राजवट उलथवून तिथे आपल्या इशाऱ्यावर नाचणारे कठपुतली सरकार...

बाळासाहेबांच्या लवचिक राजकारणाच्या गुणाचा वापर 2019 सालीच!

मुंबई महानगरपालिकेसह महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांमध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या. या महापालिकांमध्ये सभागृह अस्तित्त्वात येण्यापासून महापौर निवडीपर्यंतच्या अनेक प्रक्रिया सध्या सुरू आहेत. यातलाच एक भाग म्हणून 22 जानेवारीला कोणत्या महापालिकेत कोणत्या प्रवर्गातील महापौर असावा यासाठी आरक्षणाची घोषित करण्यात आले. त्यानुसार आता...

रडारड पक्षकार्यकर्त्यांची! अगदी संजय राऊतांसह!!

महाराष्ट्रात मुंबईसह 29 महानगरपालिकांसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे. यासाठी उमेदवारीअर्ज दाखल करण्याची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली. आता माघारीचे पर्व सुरू झाले आहे. यामध्ये कोणाची, कुठे आणि कोणाबरोबर, कोणत्या पातळीवर, युती किंवा आघाडी झाली हे हळूहळू स्पष्ट होईलच,...
Skip to content