अल्ट्रा झकास मराठी ओटीटीच्या ‘ढ लेकाचा’, ‘अदृश्य’, ‘बोल हरी बोल’ अशा सुपरहिट चित्रपटांनंतर आता “हिरा फेरी” हा नवा कोरा भन्नाट विनोदी चित्रपट १४ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यानिमित्त “हिरा फेरी” या चित्रपटाच्या ट्रेलर आणि संगीत प्रदर्शनाचा शानदार सोहळा पार पडला. यावेळी चित्रपटाचे निर्माते आणि अल्ट्रा मिडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशीलकुमार अग्रवाल, मार्केटिंग हेड ब्रिंदा अग्रवाल, बिजनेस हेड वेंकट गारापाटी, चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल बिडकर, कलाकार अभिनय सावंत, प्रवीण प्रभाकर तसेच चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक काशी रिचार्ड आणि गायक अरुण देव यादव, मनाली चतुर्वेदी, लव पोद्दार उपस्थित होते.

“हिरा फेरी” चित्रपटाचा ट्रेलर एकदम दिमाखदार असून चित्रपटात रातोरात श्रीमंत होऊ इच्छिणाऱ्या आळशी घरजावई विक्कीने, म्हणजेच निर्मिती सावंत यांचे सुपुत्र अभिनय सावंतने, आपली बायको अनुसोबत एका चोराला आपल्या जाळ्यात अडकवून, त्याचा बहुमोल हिरा हडपण्याच्या प्रयत्नांत असताना, तिथे बायकोचा बाप, चोराचा बॉस, मांत्रिक, पत्रकार आणि पोलिसांचा मिलाप होऊन त्या हिऱ्यासाठी घोडदौड सुरू होते आणि हिरा फेरीत हिरा कोणाकडे फिरेल हा प्रश्नचिन्ह उभा राहतो. नेमका हिरा कोणाकडे जाईल याची धम्माल विनोदी मजा प्रेक्षकांना पाहयला मिळणार आहे.

यावेळी चित्रपटाचे निर्माते अग्रवाल म्हणाले की, प्रेक्षकांच्या वाढत्या दर्जेदार मनोरंजनाच्या मागणीचा मागोवा घेत आम्ही प्रेक्षकांच्या अपेक्षांची पूर्तता करत बक्कळ मनोरंजन देण्याचा प्रयत्न करत आहोत. यावेळी आम्ही “हिरा फेरी” हा लोटपोट हसवणारा विनोदी चित्रपट प्रेक्षकांसाठी सादर करीत आहोत. तो सर्व रसिक प्रेक्षकांना नक्कीच भावेल याची खात्री आहे.


