बीआयएस म्हणजेच भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई शाखेने भिवंडीतल्या बेबी कार्ट कंपनीच्या गोदामावर छापा घालून आयएसआय मार्क नसलेली 367 इलेक्ट्रिकल आणि नॉन-इलेक्ट्रिकल खेळणी जप्त केली.
ही खेळणी वैध आयएसआय प्रमाणन चिन्हांशिवाय साठवण्यात आली होती आणि ती विकलीही जात होती. प्रमाणित नसलेल्या खेळण्यांची विक्री करणे म्हणजे, खेळणी गुणवत्ता नियंत्रण आदेश, 2020 आणि बीआयएस कायदा, 2016च्या कलम 17चे उल्लंघन आहे. बीआयएस कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल कंपनीविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल केली जाईल.

याव्यतिरिक्त, अशा बनावट उत्पादनांच्या विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या ई-कॉमर्स वेबसाइटवर कारवाई केली जाईल. बीआयएस कायद्यानुसार, उल्लंघन करणाऱ्यांना पहिल्या गुन्ह्यासाठी दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि/किंवा किमान दोन लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. त्यानंतरच्या उल्लंघनासाठी दंड पाच लाख रुपये किंवा त्याहून अधिक वाढू शकतो. तसेच संबंधित वस्तूंच्या किंमतीच्या दहापट दंडदेखील न्यायालयाकडून आकारला जाऊ शकतो.
ग्राहकांनी कोणतीही खरेदी करण्यापूर्वी उत्पादनांच्या बीआयएस प्रमाणन दर्जाविषयी पडताळणी करावी. बीआयएस केअर ऍप वापरकर्त्यांना कोणत्याही उत्पादनाच्या परवानाची स्थिती तपासण्याची परवानगी असते. जर परवाना निलंबित, स्थगित किंवा कालबाह्य आढळला तर ग्राहक ऍपद्वारे तक्रारी दाखल करू शकतात. जर बीआयएस मानक चिन्हांचा (आयएसआय मार्क, हॉलमार्क आणि बीआयएस नोंदणी चिन्हांसह) गैरवापर केल्याचे लक्षात आल्यास, लोकांनी ईमेल, पत्र किंवा बीआयएस केअर ऍपद्वारे तक्रार करण्याचे आवाहनही बीएसआयने केले आहे. बीएसआयचे ऍप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर आणि ऍपल स्टोअरवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. तक्रारदाराने दिलेली सर्व माहिती गोपनीय ठेवली जाते.