Tuesday, February 4, 2025
Homeपब्लिक फिगरकेंद्राकडून हस्तक्षेप झाल्यास...

केंद्राकडून हस्तक्षेप झाल्यास ‘फटाक्यांची माळ’ लागेल..

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ (एँटिलिया) स्फोटके भरलेली गाडी ठेवण्याच्या प्रकरणाची केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून कसून चौकशी करावी. अशी चौकशी झाल्यास येथे ‘फटाक्यांची माळ’ लागेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी एका पत्रकार परिषदेत केले.

मुकेश अंबानी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मधुर संबंध आहेत. ठाकरे यांच्या शपथविधीच्या वेळीही अंबानी सहकुटूंब उपस्थित होते. मग वाझे, अंबानी यांच्या घराखाली बॉम्ब ठेवण्याची हिम्मत दाखवेल का? अंबानी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत इस्त्रायली लोक आहेत. इस्त्रायली यंत्रणा काय असते हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. त्या पलीकडे मध्य प्रदेशचे पोलीस आहेत. ते कसे येथे आले ते माहित नाहीत, पण आहेत. येथे इतकी सुरक्षा असते की, या रस्त्यावरून एखादा माणूस दोन वेळा जरी गेला तर त्याची चौकशी होते. मग, येथे तर २४ तास गाडी उभी होती आणि कोणाच्या लक्षात आले नाही? , असा सवाल त्यांनी केला.

या गाडीत एक पत्र मिळते. त्यात नीता भाभी, मुकेश भैय्या, असा आदरार्थी उल्लेख होतो. कोणीतरी गुजराती हिंदी बोलतो, तसा सारा प्रकार होता. गुडनाईटचे स्पेलिंगही चुकीचे होते. पैसे काढण्यासाठी पोलिसांनी असे केले तर हा चुकीचा समज आहे. मुकेश अंबानींकडून असे पैसे काढणे सोपे आहे का? आणि कुणी पोलीस असा प्रयत्न करून राहू शकतो का? पोलीस  आयुक्त परमबीर सिंह यांची बदली का केली, याचे कारण अद्याप देण्यात आलेले नाही. जर त्यांचा या प्रकरणाशी संबंध होता तर मग त्यांची चौकशी का केली नाही, असा सवालही त्यांनी केला.

पूर्वी बॉम्ब ठेवण्याचे काम अतिरेकी करायचे. आता पोलीस असा प्रकार करू लागले. ही भारताच्या इतिहासातली पहिली घटना असावी. जो विचार अतिरेकी करतात तो विचार करायला आता पोलिसांना भाग पाडले जात आहे. वाझे किंवा परमबीर सिंह, कोणी सांगितल्याशिवाय असा बॉम्ब ठेवण्याचा प्रकार करू शकत नाही. महाराष्ट्र सरकारकडून याचा तपास होऊच शकत नाही. त्यामुळेच केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून कसून तपास करावा. तसे झाले नाही तर येथे अराजक माजायला वेळ लागणार नाही. राष्ट्रपती शासन वैगेरे गोष्टी राजकीय झाल्या. मला राजकीय गोष्टींपेक्षा या घटनेची कसून चौकशी महत्त्वाची वाटते, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात सध्या इतर प्रश्नही उचल खात आहेत. कोरोनाचे तर विचारूच नका. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष फुकट गेले आहे. बेरोजगारीचा आकडा फुगत आहे. नोकऱ्या गेल्यामुळे २० हजार अडमिशन्स होऊ शकल्या नाहीत. अशा साऱ्या स्थितीत एक माजी पोलीस आयुक्त गृहमंत्र्यांवरच १०० कोटी मागितल्याचा आरोप करतात, याने आपल्याला लाज वाटली, असेही राज ठाकरे म्हणाले.

मुंबईतून १०० कोटी मग बाकीचे..

परमबीर सिंह यांनी काल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप केला. देशाच्या इतिहासातली ही पहिली घटना असावी. परमबीर सिंह यांना येऊन एक वर्ष झाले असेल. महिन्याला १०० कोटी म्हणजे वर्षाचे १२०० कोटी. लॉकडाऊन, हॉटेल्स बंद, यामुळे कदाचित इतके गोळा झाले नसतील. पण एका शहरातून १०० कोटी, मग महाराष्ट्रात शहरे आहेत किती? तिथल्या कमिशनरांना काय सांगितले, हेही पाहवे लागेल. त्यामुळे देशमुख यांचा नुसता राजीनामा घेऊन चालणार नाही तर त्यांचीही कसून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

सचिन वाझेला शिवसेनेत आणले कुणी?

ख्वाजा युनूस प्रकरणात सचिन वाझे १७ वर्षे निलंबित होता. त्यानंतर त्याला पोलिसांत पुन्हा घ्यावा म्हणून उद्धव ठाकरेंनी आपल्याला वारंवार सांगितल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या काळात हा शिवसेनेत होता. त्याला शिवसेनेत नेला कोणी, याचीही चौकशी झाली पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.

Continue reading

श्री मावळी मंडळाच्या खो-खो स्पर्धेत ज्ञानविकास,विहंग विजयी

ठाण्यातील श्री मावळी मंडळ संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित प्रथम विभागीय खो-खो स्पर्धेच्या महिला गटात ज्ञानविकास फाउंडेशन संघ (ठाणे) व पुरुष गटात विहंग क्रीडा केंद्र (ठाणे) या संघांनी विजेतेपद पटकावले. महिला गटातील अंतिम सामन्यात ठाण्याच्या ज्ञानविकास फाउंडेशन संघाने ठाण्याच्या रा....

महाराष्ट्रात सुरू होणार देशातले पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ

महाराष्ट्रात देशातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे, असे राज्याचे तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. नवे विद्यापीठ AI आणि संबंधित क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला...

शेअर बाजारात पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी पाण्यात!

बजेटनंतरच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराच्या व्यवहारात पहिल्या अवघ्या पाच मिनिटांत सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला. त्यामुळे या पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे तब्बल 5 लाख कोटींचे नुकसान झाले. कार्पोरेट क्षेत्राची बजेटने निराशा केल्याचे मानले जात आहे. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात अपेक्षित गुंतवणूक न...
Skip to content