पत्रकारितेत आल्यापासून रोजची वर्तमानपत्रे तर वाचतच होतो. पण त्याबरोबरच जमेल तसे मराठी व इंग्रजी साप्ताहिके आवर्जून वाचत होतो. मराठीत जशी माणूस, सोबत, मार्मिक यांची गोडी लागली, तशीच इंग्रजीत संडे, इंडिया टुडे, विकली आदींचे वेड होते. जेव्हा मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलात एमएच्या अभ्यासासाठी प्रवेश घेतला त्यानंतर काही दिवसांतच तेथील तळमजल्यावर असलेल्या मासिके आणि पुस्तिका विभागाशी सख्य जडले. तेथेच पहिल्यांदा टाईम साप्ताहिक पाहिले.
सत्तरचा काळ असावा. आता त्याचा तपशील आठवत नाही. परंतु तो टाइमचा अंक तब्बल एक महिना जुना होता, हे मात्र पक्के आठवते. जुना अंक आणि दिनांक – महिना पाहताच मी तडक ग्रंथपाल मॅडमकडे धाव घेतली. त्यांनीही लगेचच हा जुना अंक असल्याचे मान्य केले. त्या मॅडमनी आत जाऊन चौकशी केली आणि मला येऊन सांगितले की, टाईमचा नवा अंक एका विभागप्रमुखाकडे आहे. तो त्यांच्याकडून आला की आम्ही तुम्हाला कळवू. तो विषय तेथेच संपला. परंतु मला मात्र काहीसे नव्हे बरेचसे टाईमचे वेड लागले.
लोकसत्तेत आल्यावर त्याचे अधिकच वेड लागले. एक्सप्रेसच्या छोट्या लायब्ररीत ही साप्ताहिके जरुर मिळत. पण तेथेही उशिराच उपलब्ध होत असत. कारण मात्र सारखेच होते. ‘साहेबांकडे आहेत, आले की सांगतो’.. त्यामुळे इंग्रजीतील ही साप्ताहिके बाहेरचं वाचण्याची सवय लागली. संडे वगेरे कधीकधी मी घेतही असे. आनंद बाझार पत्रिकेच्या संडेचे तेव्हा बरेच प्रस्थ होते. शेखर गुप्ता यांनी तेव्हा भागलपूर तुरुंगातील आंधळ्या कैद्यांचा पर्दाफाश केला होता. (त्यानंतर अनेक वर्षांनी त्यावर हिंदी चित्रपट निघाला) अशा या साप्ताहिकात टाईम आणि न्यूजवीक आघाडीवर होती. आता न्यूजवीक बंद पडले आहे.

टाईम साप्ताहिकाचे वर्णन करणे तसे कठीण आहे. डावी मंडळी त्याला भांडवलशाहीचे साप्ताहिक समजतात. (पण पहिल्यांदा वाचून काढतात) जगभरातल्या प्रमुख गोष्टींचा शब्दांचा फाफटपसारा न मांडता नेमकी माहिती आणि थोडक्यात विश्लेषण, ही टाईमची खासियत. कुणाची बाजू घेतात हे शेवटपर्यंत कळत नाही. खरेतर यातच त्यांनी घेतलेली बाजू लपलेली असते. तर अशा या टाईमचा पहिला अंक १९२३च्या मार्च महिन्यात प्रकाशित करण्यात आला होता.
गेल्या शंभर वर्षात टाईमने प्रमूख जागतिक घडामोडींचा आढावा तर घेतला आहेच. “journalism will kill you, but it will keep you alive while you are at it” त्याचबरोबर या विधानाचा प्रत्यय देण्याचाही प्रयत्न केलेला आहे. “i do not think a though question is disrespectful” या विधानाची प्रचितीही अनेकवेळा आणून दिलेली आहे. कुणाचाही मुलाहिजा न ठेवता सत्यकथन करणे किती कठीण असते हे आपण सर्व जाणतच आहात.
आगामी संपूर्ण वर्षभर टाईमतर्फे विविध विषयांवरील लेख तर प्रसिद्ध होणारच आहेत. शिवाय करमणूकजगत, खेळजगत तसेच पर्यावरणविषयक अनेक बाबींना हात घालण्याचा त्यांचा मानस आहे. जागतिक व्यापारात काय घडत आहे, कसे घडत आहे त्यापेक्षाही काय घडावे अशी अपेक्षा आहे याचा आढावा म्हणजे टाईम साप्ताहिक. मला तर कधीकधी टाईम हा एकनाथांच्या भारुडातील वासुदेवासारखा भासतो.
“मी आलो रायाचा जोशी, होरा ऐका दादांनो|
येथुनी पुढे बरे होईल….”
भविष्यवाणी तर करत नाही ना.. असं वाटत राहतं. बघूया काय होतं ते…

