आज कोल्हापूर बंद आहे. कोल्हापूरमध्ये कायदा व सुव्यवस्था अडचणीत आणण्याच्या काही घटना जाणीवपूर्वक करण्यात आल्या. त्याआधीसुध्दा वेगवेगळ्या भागात दंगली घडवून आणण्यासारखे प्रकार होत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अडचणीत येत आहे. येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था अडचणीत आणून समाजासमाजामध्ये अंतर पाडण्याचे काम किंवा द्वेष निर्माण करण्याचे काम काही शक्ती जाणीवपूर्वक करत आहेत का?, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.
अलीकडच्या काळात ज्या घटना घडत आहेत त्याच्याबद्दल खोलात जायचं म्हटलं तर मोबाईल कुणाचे, कुठे गेले आहेत. व्हॉटस्ॲपवर काय बातम्या आल्या आहेत. कुणी व्हायरल केले आहे. हे तपासायचं म्हटलं तर तपासता येतं. परंतु या गोष्टीचा छडा लागलाच पाहिजे अशा पद्धतीची भूमिका राज्यकर्त्यांची असली पाहिजे आणि पोलीस खात्याचे काम करणार्या अधिकारीवर्गाची असली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
कालच कोल्हापूरमध्ये पोलिसांना आणि मिडियाला तिथल्या लोकांनी आंदोलन करत असताना कोल्हापूर बंद करणार असे सांगितले होते. वास्तविक त्याच्या आधी पोलिसांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन किंवा अशाप्रकारच्या घटना घडतात त्यावेळी शांतता कमिटी असते किंवा स्वयंसेवी संस्था काम करणाऱ्या असतात त्या-त्या शहरात, तालुक्यात, जिल्हा ठिकाणी पोलीस यंत्रणा असते त्यांना कुणाला एकत्र घेतल्यानंतर नीटपणे हाताळता येईल ही इत्यंभूत माहिती त्यांच्याकडे असते. फक्त त्याला राजकीय इच्छाशक्ती असली पाहिजे आणि सरकारचा त्यांना क्लीअर आदेश असला पाहिजे की हे घडू द्यायचे नाही असेही अजित पवार म्हणाले.
वेगवेगळ्या जाती, धर्म, पंत हे सगळेजण यामध्ये गुण्यागोविंदाने नांदत आहेत. मात्र कुठल्या जातीने, पंथाने एखाद्याचा द्वेष करा असे सांगितले नाही परंतु वाढलेली महागाई, वाढलेली बेरोजगारी व सत्तेत आल्यावर ७५ हजार नोकरभरती करू या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात कृतीमध्ये आणता आल्या नाहीत त्यामुळे जाणीवपूर्वक कुणी खतपाणी घालतंय का? याचा मास्टरमाईंड कोण आहे? कोण हे करण्यासाठी प्रोत्साहित करतंय? या सगळ्याचा छडा लावण्याचे काम पोलीस खात्याने केले पाहिजे, असे पवार म्हणाले.
औरंगजेबाचे समर्थन करण्याचे कारण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात त्याला कोण समर्थन देईल? त्यामुळे याला वेगळया प्रकारचे स्वरूप देऊ नका. अफजलखान असेल औरंगजेब असेल कुणीही त्यांचे समर्थन करणार नाही. अशाप्रकारच्या बातम्या पसरवून लोकांच्या मनात गैरसमज पसरवून समासमाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम होता कामा नये. जातीय सलोखा टिकवला गेला पाहिजे. गेले कित्येक वर्षे गुण्यागोविंदाने आपण राहतोय. त्याला कुठेही डाग लागता कामा नये, असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

