Homeकल्चर +श्री गणेशाचे उपासनाशास्त्र!

श्री गणेशाचे उपासनाशास्त्र!

सुखकर्ता, विघ्नहर्ता आणि अष्टदिशांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाची पूजा भावपूर्ण होऊन त्याचा कृपाशीर्वाद मिळावा, असाच सर्व गणेशभक्तांचा प्रयत्न असतो. गणेशभक्तांना ही पूजा भावपूर्ण करता यावी, या उद्देशाने श्री गणेश उपासनेविषयी काही कृती आणि त्यामागील अध्यात्मशास्त्रीय माहिती या लेखामध्ये दिली आहे. कार्यारंभी श्री गणेशाचे पूजन करण्याचे महत्त्व, पूजेत शक्यतो डाव्या सोंडेचा गणपति असण्याचे कारण आदीविषयी माहितीही या लेखातून जाणून घेऊया.

प्रथम आपण श्री गणेशाचा कार्यारंभी म्हणायचा श्‍लोक पाहूया.

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा॥

याचा अर्थ आहे, वाकडी सोंड असलेला, मोठ्या देहाचा, कोटीसूर्याप्रमाणे कांती असलेला, अशा हे देवा, तू मला सर्वदा सर्व कार्यांत निर्विघ्न कर.

श्री गणेशाच्या या ध्यानमंत्रामध्ये त्याच्या गुणवैशिष्ट्यांचे वर्णन आहे. गणपति हे श्री गणेशाचे एक नाव आहे. गणपति हा शब्द गण आणि पति या दोन शब्दांनी बनला आहे. गण याचा अर्थ पवित्रक. पति म्हणजे पालन करणारा. गणपति सूक्ष्मातीसूक्ष्म चैतन्यकणांचा म्हणजे पवित्रकांचा स्वामी आहे. श्री गणेश जीवसृष्टीवर विघातक परिणाम करणार्‍या रजतम लहरींवर नियंत्रण ठेवतो, तसेच लवकर प्रसन्न होतो.

कार्यारंभी श्री गणेशाचे पूजन करण्याचे महत्त्व: गणपति हा दहा दिशांचा स्वामी आहे. त्याच्या अनुमतीविना इतर देवता पूजास्थानी येऊ शकत नाहीत. गणपतीने एकदा दिशा मोकळ्या केल्या की, ज्या देवतेची आपण पूजा करत असतो, ती तेथे येऊ शकते; म्हणून कोणतेही मंगल कार्य किंवा कोणत्याही देवतेची पूजा करताना प्रथम गणपतीचे पूजन करतात. गणपतिच्या पूजनामुळे शुभकार्यात येणारी विघ्ने दूर होतात. गणपतीने मानवाच्या नादभाषेचे देवतांच्या प्रकाशभाषेत रूपांतर केल्यामुळे आपल्या प्रार्थना देवतांपर्यंत पोहोचतात. श्री गणेश हे सर्व संतांनी गौरविलेले आराध्यदैवत आहे. निरनिराळ्या साधना मार्गांतील संत वेगवेगळ्या देवतांचे भक्त असले, तरी सर्व संतांनी श्री गणेशाची आळवणी आणि त्याचे स्तवन आवर्जून केले आहे. मराठी संतवाङ्ममयातून तर श्री गणेशाचे लौकिक आणि पारलौकिक स्वरूपाचे वर्णन मोठ्या सुबकरित्या केलेले आढळते.

डाव्या सोंडेचा गणपति अध्यात्माला पूरक असणे!: पूजेत शक्यतो डाव्या सोंडेचा गणपति ठेवावा. उजव्या सोंडेचा गणपति हा अतिशय शक्तीशाली आणि जागृत आहे, असे म्हटले जाते. पूजेत उजव्या सोंडेचा गणपति असल्यास कर्मकांडातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून दैनंदिन पूजाविधी पार पाडावे लागतात. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात कर्मकांडातील नियमांचे काटेकोरपणे पालन करणे शक्य होत नसल्याने पूजाविधीमध्ये चुका होतात आणि त्याचा आपल्याला त्रास होण्याची शक्यता असते. यासाठी पूजेत शक्यतो उजव्या सोंडेचा गणपति ठेवू नये. याउलट डाव्या सोंडेचा गणपति तारक स्वरूपाचा आणि अध्यात्माला पूरक असतो. याची पूजा नेहमीच्या पद्धतीने केली जाते.

श्री गणेशाला गंध, हळद-कुंकू वाहण्याची पद्धत!: पूजा करताना श्री गणेशाला उजव्या हाताच्या करंगळीजवळच्या बोटाने, म्हणजेच अनामिकेने गंध लावावे. श्री गणेशाला हळद-कुंकू वाहताना आधी हळद अन् नंतर कुंकू उजव्या हाताचा अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वाहवे. अंगठा आणि अनामिका जोडून निर्माण होणार्‍या मुद्रेमुळे पूजकाच्या देहातील अनाहतचक्र जागृत होते. त्यामुळे भक्‍तीभाव निर्माण होण्यास साहाय्य होते.

श्री गणेशाच्या पूजेत तांबड्या रंगांच्या वस्तू असण्याचे कारण: श्री गणेशाच्या पूजेत तांबड्या रंगांच्या वस्तूंचा उपयोग करावा. तांबड्या रंगात गणेशतत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता अधिक असते. त्यामुळे मूर्ती अल्पावधीत जागृत होण्यास साहाय्य होते. यासाठीच श्री गणेशाच्या पूजेत रक्तचंदन वापरतात.

श्री गणेशाला लाल फुले वाहण्याचे महत्त्व आणि प्रमाण: श्री गणेशाला तांबड्या जास्वंदाची फुले वाहवीत. श्री गणेशाला फुले वाहताना ती 8 किंवा 8च्या पटीत आणि शंकरपाळ्याच्या आकारात वाहवीत. शंकरपाळ्याच्या आकारात फुले वाहताना दोन लहान कोन एका सरळ रेषेत देवतेच्या समोर येतील आणि मोठे दोन कोन दोन बाजूंना दोन राहतील, अशा पद्धतीने फुले वाहवीत. जास्वंद वा अन्य लाल फूल वाहताना देठ श्री गणेशाच्या चरणांकडे आणि तुरा आपल्याकडे येईल, असे वाहावे.

श्री गणेशाला दुर्वा वाहण्याचे कारण आणि पद्धत: दुर्वांमध्ये श्री गणेशाचे तत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता अत्याधिक प्रमाणात असते; म्हणून श्री गणेशाला दूर्वा वाहाव्यात. त्यामुळे श्री गणेशाचे तत्त्व मूर्तीत येते आणि देवतेच्या तत्त्वाचा आपल्याला अधिक लाभ होतो. श्री गणेशाला दूर्वा नेहमी विषम संख्येने (न्यूनतम 3 किंवा 5, 7, 21 इत्यादी) वाहाव्यात. श्री गणेशाला वाहायच्या दूर्वा नेहमी कोवळ्या असाव्यात. दुर्वांना 3, 5, 7 अशा विषम संख्येच्या पात्या असाव्यात. दूर्वा वाहताना पात्यांचा भाग आपल्याकडे आणि देठाचा भाग श्री गणेशाच्या मूर्तीकडे असावा. त्यामुळे श्री गणेशाचे तत्त्व आपल्याकडे प्रक्षेपित व्हायला साहाय्य होते.

शमीची आणि मंदारची पत्री वाहणे: शमीमध्ये अग्नीचा वास आहे. आपली शस्त्रे तेजस्वी राहावीत म्हणून पांडवांनी ती शमीवृक्षाच्या ढोलीत ठेवली होती. मंथन करून ज्यावेळी अग्नी काढतात, तो मंथा शमीवृक्षाचा असतो. मंदार हे वानस्पत्य रसायन आहे.

श्री गणेशाच्या तारक आणि मारक तत्त्वाप्रमाणे वापरायच्या उदबत्ती: श्री गणेशाची पूजा करताना त्याचे तारक तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट करण्याकरता चंदन, केवडा, चमेली आणि वाळा यापैकी कोणत्याही गंधाच्या उदबत्त्या वापराव्यात. श्री गणेशाचे मारक तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट करण्याकरता हीना अथवा दरबार या गंधांच्या उदबत्त्या वापराव्यात. सनातन संस्थेने सात्त्विक उदबत्त्यांची निर्मिती केली आहे.

श्री गणेशाला प्रदक्षिणा घालणे!: श्री गणेशाचे दर्शन घेतल्यावर त्याला न्यूनतम 8 प्रदक्षिणा घालाव्यात. प्रत्येक प्रदक्षिणेनंतर देवाला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावी. प्रदक्षिणा जास्त घालायच्या असल्यास त्या शक्यतो 8च्या पटीत घालाव्यात. प्रदक्षिणा घातल्याने देवतेकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य अल्प कालावधीत संपूर्ण देहात संक्रमित होते.

श्री गणेशाच्या उपासनेच्या अंतर्गत करावयाच्या कृती

श्री गणेशाला गंध कोणत्या बोटाने लावावे?: अनामिकेने (करंगळीच्या जवळचे बोट)
फुले कोणती वाहावीत?: लाल जास्वंद/ लाल रंगाची अन्य फुले
कोणत्या गंधाच्या उदबत्तीने ओवाळावे?: चंदन / केवडा / चमेली
उदबत्त्यांची संख्या किती असावी: दोन
अत्तर कोणत्या गंधाचे अर्पण करावे?: हीना  
श्री गणेशाला प्रदक्षिणा किती घालाव्यात?: आठ किंवा आठच्या पटीत

श्री गणेशपूजेला आरंभ करताना करायच्या प्रार्थना: हे श्री गजानना, या पूजाविधीद्वारे माझ्या अंतःकरणात तुझ्याप्रती भक्तीभाव निर्माण होऊ दे. या पूजाविधीतून प्रक्षेपित होणारे चैतन्य तुझ्या कृपेने मला अधिकाधिक ग्रहण करता येऊ दे.

गणेशोत्सवाच्या काळात करायची प्रार्थना: हे श्री गणेशा, गणेशोत्सवाच्या काळात नेहमीपेक्षा सहस्रपट कार्यरत असलेल्या तुझ्या तत्त्वाचा मला अधिकाधिक लाभ होऊ दे.

संदर्भ: सनातन संस्थेचा ग्रंथ ‘गणपति’

संपर्क क्रमांक: 9920015949

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content