केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय येत्या 19 ते 22 सप्टेंबर 2024 या कालावधीत जागतिक आणि भारतीय अन्न क्षेत्रातील हितधारकांमध्ये सहयोग वाढवण्यासाठी विश्व भारतीय खाद्य महोत्सव, हा देशातील भव्य खाद्य महोत्सव आयोजित करत असल्याची घोषणा केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांनी काल केली.
याव्यतिरिक्त, वाढत्या स्टार्टअप परिसंस्थेला चालना देण्यासाठी आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्याकरिता मंत्रालय स्टार्टअप इंडियाच्या सहकार्याने दुसऱ्या स्टार्टअप ग्रँड चॅलेंजचे आयोजन करत आहे. विश्व भारतीय खाद्य महोत्सव 2023ला अभूतपूर्व यश मिळाले. त्या पार्श्वभूमीवर या महोत्सवाचे आयोजन केले
जाणार आहे. मागच्याखेपेला झालेल्या महोत्सवात 1,208 प्रदर्शक, 90 देशांतील 715 आंतरराष्ट्रीय खरेदीदार, 24 राज्ये आणि 75,000 अभ्यागतांचा सहभाग होता. या महामहोत्सवात 16,000हून अधिक B2B/B2G बैठका, गोलमेज चर्चासत्र, 47 संकल्पनात्मक सत्रे, सामंजस्य करार, प्रदर्शने, एक स्टार्ट-अप ग्रँड चॅलेंज आणि अन्य काही वैशिष्ट्यपूर्ण होते, जे जागतिक व्यासपीठावर अन्न प्रक्रिया आणि संबंधित क्षेत्रातील भारताचे वर्चस्व दर्शविते.
तिसऱ्या विश्व भारतीय खाद्य महोत्सवाची नांदी म्हणून, मंत्री चिराग पासवान आणि केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंग यांनी विश्व भारतीय खाद्य महोत्सव 2024साठी संकेतस्थळ आणि मोबाईल ॲपचेही अनावरण केले. शेतीचा अपव्यय कमी करण्यासाठी, मूल्यवर्धनाला चालना देण्यासाठी, अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि शेतापासून ग्राहकापर्यंत पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी अन्नप्रक्रिया क्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली.
आपल्या विशेष भाषणात, राज्यमंत्री रवनीत सिंग यांनी भारताच्या अन्नप्रक्रिया क्षेत्राच्या परिवर्तनीय क्षमतेवर भर दिला. अन्न-प्रक्रिया तंत्रज्ञानातील प्रगती कृषी संपत्तीचे रूपांतर मजबूत आर्थिक शक्तीमध्ये करू शकत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.