महाराष्ट्रात सहा जानेवारीला पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती सहा जानेवारीलाच. तोच दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर (जन्म- ६ जानेवारी, १८१२; पोंभुर्ले) (मृत्यू- १८ मे, १८४६; मुंबई) हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार म्हणून ओळखले जातात. दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले. तसे पाहिले तर ते फक्त मराठीत नव्हते तर मराठी आणि इंग्रजी भाषेत होते.
‘दर्पण’चा पहिला अंक प्रसिद्ध होण्यापूर्वी १२ नोव्हेंबर १८३१ रोजी वर्तमानपत्राचा उद्देश स्पष्ट करणारा ‘प्रस्ताव’ प्रसिद्ध करण्यात आला होता. पहिल्या अंकात तो पुन्हा देण्यात आला होता. प्रस्तावात ‘दर्पण’ काढण्याचे मुख्य उद्दिष्ट, मराठी व इंग्रजी मजकूर देण्याचा हेतू, कोणता मजकूर येईल, इत्यादी सर्व गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या होत्या. नव्या ज्ञानाचा, पाश्चात्य विद्येचा लोकांना परिचय व्हावा त्यांचा अभ्यास व्हावा व त्याद्वारा देशाची समृद्धी व लोकांचे कल्याण अशा हेतूने या वृत्तपत्राचा प्रपंच मांडण्यात आला होता!
ज्ञानाबरोबरच जे शुद्ध मनोरंजन मात्र इच्छितात, त्यांचीही हृदये दर्पणमध्ये लहानलहान चमत्कारिक ज्या गोष्टी असतील त्यापासून संतुष्ट होतील. मनोरंजन करणे, चालत्या काळाची वर्तमाने कळविणे आणि योग्यतेस येण्याचे मार्ग दाखविणे, या गोष्टींची दर्पण छापणाऱ्यास मोठी उत्कंठा आहे. म्हणोन या गोष्टी साध्य होण्याविषयी जितका प्रयत्न करवेल तितका ते करतील. कोणा एकाचा पक्षपात किंवा नीचपणा या दोघांचा मळ दर्पणास लागणार नाही. कारण की दर्पण छापणाराचे लक्ष्य निषकृतिम आहे. म्हणोन हे वर्तमानपत्र ज्या रीतीने भले आणि गुणी पुरुषांस मान्य होईल त्या रीतीने करण्यास ते दृढ निश्चयाने उपयोग करतील.” (मराठी वृत्तपत्रांचा इतिहास – रा. के. लेले)
समाजप्रबोधन, ज्ञान तसेच मनोरंजनावरही पहिल्या वर्तमानपत्राने भर दिलेला होता. हे गांभीर्याचा आव आणणाऱ्या दांभिकांना समजायला हवे. त्याचवेळी वर्तमानपत्राने दोन्ही बाजू देणे गरजेचे असल्याचे विशेष करून नमूद केलेले आहे, हेही या दांभिकांनी लक्षात ठेवलेले बरे..