भारतीय संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणारा ‘सजना’ चित्रपटाचे टायटल साँग (शिर्षकगीत) प्रदर्शित करण्यात आले आहे. प्रेमातील हळव्या भावनांना स्पर्श करत, या गीतामध्ये प्रेमातील गोडवा, आठवणी, आणि नात्यांमधील निखळपणा अगदी हृदयस्पर्शी पद्धतीने मांडण्यात आला आहे. गाण्याचं चित्रिकरणदेखील अत्यंत नयनरम्य आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम आणि राजेश्वरी पवार यांच्या भावस्पर्शी आवाजात सजलेले हे गाणं प्रेमाची नाजूक आणि गहिरं भावना व्यक्त करते.
या गाण्याला संगीत दिलं आहे ओंकारस्वरूप यांनी, तर गाण्याचे बोल लिहिले आहेत सुहास मुंडे यांनी. हे गाणं केवळ एक संगीतकृती नसून, प्रेमाच्या भावना, आठवणी आणि नात्यांची गुंफण उलगडणारं एक सुंदर चित्रण आहे. गाण्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. ‘सजना’ ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर आधारित एक प्रेमकथा आहे. या चित्रपटाची निर्मिती सुप्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रे ह्यांनी केली आहे तर कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनसुद्धा शशिकांत धोत्रे ह्यांनी केलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीत प्रेम, भावना आणि संगीत यांचं अनोखं मिश्रण घेऊन येणारा हा चित्रपट २३ मे २०२५ला आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.