Homeटॉप स्टोरी'शक्ति'चा धोका टळला;...

‘शक्ति’चा धोका टळला; चक्रीवादळ ओमानकडे!

वायव्य आणि लगतच्या पश्चिम-मध्य अरबी समुद्रावर असलेल्या अन् महाराष्ट्राला धोकादायक ठरू पाहणाऱ्या ‘शक्ति’, या तीव्र चक्रीवादळाचा धोका टळला आहे. मान्सूननंतर या हंगामातील हे पहिलेच चक्रीवादळ आता नैऋत्येकडे ओमानच्या दिशेने सरकले आहे. आता ते ओमानमधील मसिरापासून सुमारे 150 किमी पूर्वेला केंद्रस्थानी असल्याचे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. दरम्यान, चक्रीवादळ शक्तिचे आता उष्णकटिबंधीय वादळात (डाऊनग्रेड) रूपांतर झाले आहे. त्यामुळे त्याच्या तीव्रतेची शक्यताही आता कमी झाली आहे.

शक्ति चक्रीवादळ आता आज सोमवार, 6 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत नैऋत्येकडे सरकत राहण्याची आणि हळूहळू चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यानंतर, ते पुन्हा वळेल आणि पश्चिममध्य आणि लगतच्या वायव्य अरबी समुद्रावर जवळजवळ पूर्वेकडे म्हणजे गुजरातकडे सरकेल. या बदलामुळे दीव-वेरावळ, द्वारकासह सौराष्ट्राच्या समुद्रात जोरदार प्रवाह दिसून येत आहेत आणि प्रणाली सतर्कतेवर आहे. तथापि, उद्या मंगळवार, 7 ऑक्टोबरपर्यंत ते कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होऊन आणखी कमकुवत होईल.

राज्यातील “या” जिल्ह्यात आज पावसाचा इशारा

चक्रीवादळ तुलनेने सौम्य झाले असले तरी महाराष्ट्रात सोमवारी काही ठिकाणी मुसळधार पावसाचा पूर्वानुमानित इशारा “आयएमडी”ने दिलेला आहे. वादळाचा परिणाम कोकण किनारपट्टी आणि आसपासच्या जिल्ह्यांवर होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई, ठाणे आणि कोकणात तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. या भागात आता हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली, मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड तसेच धुळे, जालना आणि नंदुरबार जिल्ह्यांत पूर्वानुमानित हलक्या पावसाची शक्यता आहे.

चक्रीवादळाचे गुजरातवरील संभाव्य परिणाम

6 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत, शक्ति चक्रीवादळ अधिक शक्तिशाली होईल. त्यानंतर, ते यू-टर्न घेईल आणि पश्चिम-मध्य आणि वायव्य अरबी समुद्रावरून पूर्वेकडे (गुजरातकडे) सरकेल. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे, येत्या 5 दिवसांत गुजरातच्या किनारी भागात जोरदार वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. जामनगर, देवभूमी द्वारका, पोरबंदर, सूरत, नवसारी आणि वलसाड जिल्ह्यात 8 ऑक्टोबर रोजी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. सध्या गीर सोमनाथ, वेरावळ, देवभूमी द्वारका आणि दीवसह समुद्रात जोरदार वारे आणि लाटा उसळत आहेत. “आयएमडी”ने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. दिलासा देणारी गोष्ट म्हणजे 7 ऑक्टोबरच्या दुपारपर्यंत हे वादळ कमकुवत होऊन कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होण्याची शक्यता आहे.

एकाच वेळी तीन हवामान प्रणाली

सध्या अरबी समुद्रात तीन हवामान प्रणाली कार्यरत आहेत. समुद्रावरील तीव्र चक्रीवादळ शक्ति, जे आता डाऊनग्रेड झाले आहे. त्याच्या जोडीला वायव्य भारतात पश्चिमी विक्षोभ आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये अतिवृष्टी, असा तिहेरी मारा निसर्गाने आपल्यावर लादला आहे.

देशाच्या अनेक भागात मुसळधार पाऊस

“शक्ति”मुळे देशात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि गारपीट सुरू आहे. आसाम, मेघालय, उप-हिमालयी पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होत आहे. अरुणाचल प्रदेश, बिहारमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय, पंजाब, तामिळनाडू पुडुचेरी, कराईकल, तेलंगणा, पश्चिम राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख-गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद आणि पंजाबमध्ये काही ठिकाणी गारपीटीसह वादळ होण्याची शक्यता आहे.

या चक्रीवादळाला “शक्ति” असे नाव का?

चक्रीवादळांना नावे देण्याची प्रक्रिया खूप खास आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या वादळांना नावे देण्याची ही पद्धत 2024मध्ये सुरू झाली होती. भारत, बांगलादेश, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलंडसारखे देश यात समाविष्ट असून क्रमाने एकेक देश वादळाला नाव देतो. सध्याच्या चक्रीवादळाचे नाव श्रीलंकेने ‘शक्ति’ ठेवले आहे. हा एक तमिळ शब्द आहे, ज्याचा अर्थ होतो ताकद! वादळांची नावे देताना, हे सुनिश्चित केले जाते की, ते नाव लहान, सोपे आणि कोणत्याही प्रकारे आक्षेपार्ह नसावे. तसेच, एकदा वापरल्यानंतर ते नाव पुन्हा वापरता येत नाही.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content