Homeबॅक पेजजनतेला तुच्छ लेखणाऱ्या...

जनतेला तुच्छ लेखणाऱ्या एका हुकूमशहाचा भयानक अंत!

इतिहासाच्या पानांवर २७ एप्रिल १९४५ हा दिवस एका मोठ्या युगाच्या अंताची नांदी देणारा ठरला. हा तो दिवस होता जेव्हा ‘फॅसिझम’चा जनक आणि इटलीचा सर्वेसर्वा बेनिटो मुसोलिनी याला इटालियन क्रांतिकारकांनी (पार्टिझन्स) स्वित्झर्लंडला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना अटक केली. हा प्रसंग एखाद्या थरारक चित्रपटापेक्षा कमी नव्हता. मुसोलीनीच्या अटकेचा प्रसंग मोठा नाट्यमय होता. एका जर्मन कोटामागील हा हुकूमशहा इटलीच्या क्रांतिकारकांनी हुडकून काढला. १९४५च्या एप्रिलमध्ये दुसऱ्या महायुद्धाचे चित्र स्पष्ट झाले होते. दोस्त राष्ट्रांचे सैन्य इटलीत वेगाने शिरत होते आणि मुसोलिनीची सत्ता वाळूच्या किल्ल्यासारखी ढासळत होती. आपला जीव वाचवण्यासाठी मुसोलिनीने त्याची मैत्रीण क्लारा पेटाची आणि काही निष्ठावान मंत्र्यांसह मिलान सोडून स्वित्झर्लंडच्या दिशेने धाव घेतली.

मुसोलिनी एका जर्मन लष्करी ताफ्यात लपून बसला होता. त्याने स्वतःची ओळख लपवण्यासाठी जर्मन सैनिकाचा ओव्हरकोट आणि डोक्यावर हेल्मेट घातले होते. हा ताफा ‘डोन्गो’ या गावाजवळ आला असताना स्थानिक क्रांतिकारकांनी (पार्टिझन्स) तो रोखला. क्रांतिकारकांनी जर्मन सैनिकांना पुढे जाण्याची परवानगी दिली, मात्र “एकही इटालियन नागरिक या ताफ्यातून पुढे जाणार नाही” अशी अट घातली. तपासणी सुरू झाली आणि एका क्रांतीकारकाची नजर कोपऱ्यात मान खाली घालून बसलेल्या एका ‘सैनिका’वर पडली. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि ती विशिष्ट ठेवण ओळखीची वाटली. तो सैनिक दुसरा कोणी नसून साक्षात ‘इल दुचे’ (दी लीडर) बेनिटो मुसोलिनी होता. २७ एप्रिल १९४५च्या दुपारी जगाला धडकी भरवणारा हा हुकूमशहा एका सामान्य कैद्याप्रमाणे पकडला गेला.

मुसोलिनीची विचारधारा: फॅसिझमचा उगम

मुसोलिनीने पहिल्या महायुद्धानंतर इटलीत ‘फॅसिझम’ या विचारधारेला जन्म दिला. टोकाचा राष्ट्रवाद आणि लोकशाहीला विरोध हे याचे मुख्य सूत्र होते. एकाधिकारशाही असलेली ही व्यवस्था होती. “सर्वकाही राज्यांतर्गत, राज्याबाहेर काहीही नाही आणि राज्याच्या विरोधात कोणीही नाही,” असे त्याचे ब्रीदवाक्य होते. १९२२मध्ये ‘मार्च ऑन रोम’ करून त्याने सत्ता काबीज केली आणि स्वतःला ‘हुकूमशहा’ घोषित केले.

हिटलरचा ‘गुरू’ ते ‘कठपुतली’

अनेकांना माहीत नाही, पण ॲडॉल्फ हिटलर सुरुवातीला मुसोलिनीचा मोठा चाहता होता. ती त्याची मुख्य प्रेरणा होती. हिटलरने नाझी पक्षाची उभारणी करताना मुसोलिनीच्या ‘ब्लॅकशर्ट्स’च्या धर्तीवर स्वतःची ‘ब्राऊनशर्ट्स’ ही संघटना उभी केली. १९२० आणि ३०च्या दशकाच्या सुरुवातीला मुसोलिनी हा ‘सीनिअर’ हुकूमशहा होता, ज्याचा सल्ला हिटलर शिरसावंद्य मानत असे. मात्र, दुसऱ्या महायुद्धाच्या मध्यात जर्मनीची ताकद वाढली आणि इटली कमकुवत झाली, समीकरण बदलले. एकेकाळचा मार्गदर्शक असलेला मुसोलिनी अखेरच्या काळात हिटलरच्या हातातील केवळ एक ‘कठपुतली’ बनून राहिला होता.

करुण आणि भयावह अंत

२७ एप्रिलला अटक झाल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी म्हणजेच २८ एप्रिल १९४५ रोजी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबवता क्रांतिकारकांनी मुसोलिनी आणि क्लारा पेटाची यांना गोळ्या घालून ठार केले. त्यांचा अंत इतका भीषण होता की, त्यांचे मृतदेह मिलानमधील ‘पिआझाले लोरेटो’ या चौकात आणले गेले. तिथे संतप्त जमावाने मृतदेहांची विटंबना केली, त्यांच्या पार्थिवावर मूत्र विसर्जन केले आणि अखेर ते मृतदेह एका पेट्रोल पंपाच्या छताला पाय वर करून लटकवण्यात आले. ज्या जनतेने एकेकाळी मुसोलिनीचा जयजयकार केला होता, तीच जनता आता त्याच्या पतनाचे प्रदर्शन पाहत होती.

इतिहासाचा धडा

मुसोलिनीची अटक ही केवळ एका व्यक्तीची अटक नव्हती, तर ‘अजेय’ वाटणाऱ्या हुकूमशाहीच्या अंताची ती सुरुवात होती. सत्तेच्या शिखरावर असताना जनतेला तुच्छ लेखणाऱ्या सत्तेचा अंत किती भयानक असू शकतो, याचे हे जिवंत उदाहरण आहे.

(लेखक विक्रांत पाटील ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Continue reading

मोदी सरकारला बसला ‘जेन-झी’ वादळाचा तडाखा!

भारताच्या राजकीय पटलावर गेल्या काही दिवसांत जे घडले, ते केवळ अनपेक्षितच नव्हे तर अभूतपूर्व आहे. सलग १२ वर्षे देशावर एकछत्री आणि भक्कमपणे सत्ता गाजवणाऱ्या, 'अजेय' आणि 'बलाढ्य' मानल्या जाणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारला एका मुद्यावर सपशेल माघार घ्यावी लागली. आणि...

यंदाच्या अधिवेशनात हौशे-नवशे-गवशांना बसणार चाप!

येत्या २२ जूनपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानभवन परिसरातील अनावश्यक गर्दीला आळा घालण्यासाठी यंदा प्रथमच 'डिजिटल प्रवेशपास' व्यवस्था लागू करण्यात येणार आहे. अधिवेशन सुरळीत, सुरक्षित आणि नियोजनबद्धरित्या पार पडावे यासाठी शिस्त व सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले...

हर्षद महेता, केतन परिखनंतर आता पुन्हा नवा महेता! एलआयसीचीही साथ!!

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया' (सेबी)ने गुजरातमधील सुवर्ण निर्यातदार कंपनी 'राजेश एक्सपोर्ट्स' आणि तिचे अध्यक्ष राजेश महेता यांच्यावर केलेल्या मोठ्या कारवाईनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. शेअर बाजारात गाजलेल्या हर्षद महेता आणि केतन परिख घोटाळ्यापेक्षाही हा अतिप्रचंड...
Skip to content