Homeन्यूज अँड व्ह्यूजठाकरेंना मोकळे रान...

ठाकरेंना मोकळे रान दिल्यानेच पुढचे रामायण…

रविवारी राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आटोपताच सोमवारी राज्यातील महानगरपालिका निवडणुकांची घोषणा झाली. राज्यात 27 महानगरपालिकांची मुदत संपली असून जालना आणि इचलकरंजी या दोन महानगरपालिका नव्याने अस्तित्त्वात आल्या आहेत. त्यांच्याही निवडणुका प्रथमच होणार आहेत. मात्र सर्वाधिक लक्ष मुंबई महानगरपालिकेकडे आहे. ईशान्येतल्या सेव्हन सिस्टर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सात राज्यांपेक्षा मुंबई महानगरपालिकेचे बजेट मोठे आहे. कोणत्याही परिस्थितीत यावेळी ही महानगरपालिका आपल्या ताब्यात आली पाहिजे यासाठी भाजपने चंग बांधला आहे. 2017 साली झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकसंघ शिवसेना आणि भाजपची युती नव्हती. त्यावेळीही या दोघांच्या जवळपास समान जागा निवडून आल्या होत्या. शिवसेनेला 84 आणि भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या. तत्कालीन भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी अपक्ष आणि इतरांचा पाठिंबा घेऊन भाजपचा महापौर बसवण्याची तयारी केली होती. मात्र त्यावेळी राज्यात भाजप आणि एकसंघ शिवसेनेचे सरकार होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोणतीही रिस्क घेण्याची तयारी नव्हती. मुंबईच्या महापौरपदापेक्षा त्यांना स्वतःचे मुख्यमंत्रीपद महत्त्वाचे वाटत होते. एकदा उद्धव ठाकरेंना मुंबई दिली की आपण बिनधास्तपणे राज्य चालवू शकतो या विचाराने त्यांनी आशिष शेलार यांच्या तयारीवर खो घातला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सात नगरसेवक त्यावेळी निवडून आले होते. त्यांची भाजपच्या महापौराला पाठिंबा देण्याची तयारी केली होती. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवानगी न दिल्याने पुढे यातले सहा नगरसेवक एकसंघ शिवसेनेत सामील झाले. त्यावेळी शिवसेनेला आवरले असते तर पुढच्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची भाजपला सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्याची हिंमतही झाली नसती.

ठाकरे

मुंबई महानगरपालिका निवडणुका सुमारे चार वर्षे उशिराने होत आहेत. आता मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे सर्व गणित बदलले आहे. एकसंघ शिवसेनेत फूट पडली आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने मुंबई महानगरपालिकेबाबत भाजपाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. गेल्या निवडणुकीत एकसंघ शिवसेनेची युती नसल्याने आता भाजपने जास्त जागा लढवण्याचा आग्रह धरला आहे. आपली शिवसेना हीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खऱ्या विचाराची शिवसेना असल्याचा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमीच करतात. त्यामुळे 2017च्या निवडणुकीप्रमाणे ते स्वतंत्रपणे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उतरणार का? याची चर्चा सुरू होती. मात्र एकनाथ शिंदे यांनीच महायुती म्हणून आपण निवडणुका लढवणार असल्याची घोषणा केल्यानंतर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दुजोरा दिल्यानंतर दोन्ही पक्षात आता जागावाटपाची चर्चा सुरू आहे.

महानगरपालिका निवडणुकांसाठी महायुतीतील पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेनंतर महायुतीतील पक्ष निवडणुकीला कसे सामोरे जाणार हासुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण भाजपने मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व महानगरपालिकांमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर , पनवेल, मीरा भाईंदर आदी महानगरपालिकांमध्ये भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचीही तयारी सुरू केली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांमध्ये अजित पवार यांचे वर्चस्व आहे. तेथे महायुतीतील पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी घोषणाही केली आहे. या महानगरपालिकांतील मैत्रीपूर्ण लढतीचा फायदा कुणाला होतो ते पाहण्यासाठी आपल्याला 16 जानेवारीपर्यंत थांबणे अपरिहार्य आहे. या दोन्ही महानगरपालिकांमध्ये शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या पक्षांची फारशी ताकद नाही. या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती करून निवडणुकीनंतर एकत्र यायचे असा निर्णय झाल्यामुळे या निवडणुका मैत्रीपूर्ण होतील.

ठाकरे

ठाणे आणि कल्याण डोंबिवली या दोन्ही महानगरपालिका तशा पाहिल्या तर एकनाथ शिंदे या व्यक्तीच्या नावावर आणि ताकदीवर निवडून येतात. 2007च्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे यांनी शिवसेनेस जेरीस आणले होते. एकनाथ शिंदे यांच्या हातून ही निवडणूक काढून घेण्याची मातोश्रीवर तयारी झाली होती. अखेर एका मध्यस्थ्याने मातोश्रीवर सांगितले की ही जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्यावर दिल्यास ते ही महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात ठेवू शकतात. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावर पूर्ण जबाबदारी देण्यात आली आणि ही निवडणूक जिंकून एकनाथ शिंदे यांनी आपल्या मध्यस्थ व्यक्तीचा शब्द खरा ठरवला. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिंदे यांच्या शिवसेनेच्या ताब्यात राहू नयेत असा आग्रह या भागातील भाजप कार्यकर्त्यांचा आहे. यापूर्वी युती असल्यामुळे एकनाथ शिंदे आणि शिवसेनेची एकाधिकारशाही भाजपच्या कार्यकर्त्यांनी खूप सहन केली. याचा सूड या कार्यकर्त्यांना घ्यायचा आहे. परंतु ठाणे, डोंबिवली, उल्हासनगर या भागात शिवसेना आणि भाजपची युती झाली तरी हे पक्ष एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठी कष्ट घेणार आहेत. मतभेद मिटले असले तरी कार्यकर्त्यांचे मनभेद मिटलेले नाहीत हेही लक्षात घेतले पाहिजे.

(लेखरक ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

संपर्कः 9820355612

Continue reading

एकनाथ शिंदेंनी उपसले उपद्रवमूल्याचे अस्त्र!

राजकारणात तुम्हाला वारंवार तुमची उपयुक्तता सिद्ध करावी लागते. ज्यावेळी तुमची उपयुक्तता संपते त्यावेळी तुम्हाला संपवण्यासाठी तुमचे विरोधक आणि मित्र म्हणून वागवणारे तुम्हाला संपवतात. उपयुक्तता संपली की उपद्रवमूल्य, हे हत्यार बाहेर काढावे लागते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गत अशीच झाली...

कोस्टल रोड कोणासाठी, हे ठरवणारे मुंबईतले मतदान सुरू!

मुंबई महानगर क्षेत्रातील मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, नवी मुंबई, पनवेल यासह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे मतदान आज होत आहे. उद्या संध्याकाळपर्यंत या निवडणुकांचा निकाल हाती येईल. मुंबई ताब्यात घेण्यासाठी निकराची लढाई सुरू असून उद्धवसेना विरुद्ध महायुती...

उद्धव ठाकरेंचा सरकारविरोध लुटुपुटीचाच!

राज्य सरकारला सत्तेवर येऊन नुकतेच एक वर्ष झाले. या वर्षपूर्तीनिमित्त सरकारचीच बाजू जनतेसमोर आली. मात्र वर्षपूर्ती होताना सरकारवर तुटून पडणारे विरोधी पक्ष सुस्त दिसले. माध्यमांमध्ये तर सरकार वर्षभरात राज्याचा सर्व स्तरावर कसा विकास करत आहे हे जाहिरात नव्हे तर...
Skip to content