आजच्या ग्लोबल युगातील स्पर्धेच्या वेगात साऊथच्या (दाक्षिणात्य) चित्रपटांनी आपली धाव कायम राहील याची सकारात्मक व्यावसायिक रणनीती आखल्याचे दिसतेय. येथे धाव याचा अर्थ आपला चित्रपट प्रदर्शित करण्याचे गणित. तुम्हालाही माहित्येय ९ जानेवारी रोजी प्रभासची अष्टपैलू अदाकारी असलेला मारुती दिग्दर्शित “राजासाब” प्रदर्शित झाला. मूळ तेलगू भाषेतील हा धमाकेदार मसालेदार मनोरंजक चित्रपट दक्षिणेकडील अन्य प्रादेशिक भाषासह हिंदीतही डब करून पडद्यावर आला आहे. आज प्रभास केवळ दक्षिणेकडील चित्रपट रसिकांच्या मनावर राज्य करतोय असं नव्हे, हिंदी आणि इतकेच नव्हे तर मराठी चित्रपटरसिकांच्या मनावरही तो छान राज्य करतोय. दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपट फोफावताना त्यात अन्य भाषिक चाहतेही वाढत वाढत गेले आणि सोशल मीडियाने तर तिकडचे सेलिब्रिटीज आणि जगभरातील फॅन्स यांच्यातील जवळीक वाढवली. रक्ष्मिका मन्दाना आज साऊथपुरती न राहता संपूर्ण देशभरातातील भन्नाट क्रेझ झाली ती याच वाढलेल्या संपर्क क्रांतीमुळे!

साऊथच्या धमाकेदार मसालेदार मनोरंजक चित्रपटांचे आकर्षण किती कोटींचा व्यवसाय केला यांच्या आकडेवारीपुरता नाही, त्यात बरीच रंगतसंगत आहे. चित्रपट माध्यम आणि व्यवसाय यात आजूबाजूला बरेच बेरजेचे घटक आहेत. चित्रपटसंस्कृती अशी व्यापक आहे. “राजासाब”ने त्याची सुरुवात झाली. याच पिक्चरमध्ये बी. सुभाष निर्मित आणि दिग्दर्शित “डिस्को डान्सर”मधील कोई यहा नाचे नाचे.. या डिस्को नंबरचा कलरफुल रिमिक्स फंडा आहे. प्रभासच्या फॅन्सना विलक्षण सुखावणारी अशी मोहकता आणि नृत्याची रंगसंगती जमलीय. प्रभाससोबत मालविका मोहनन, रिद्धी कुमार आणि निधी अग्रवाल यांच्यासह अनेक डान्सर आहेत. चित्रपटात संजय दत्त, कियारा अडवाणी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरही आहे. साऊथच्या चित्रपटात हिंदीतील दोनचार कलाकार असले, पेरले, जोडल्याने तो चित्रपट हिंदी चित्रपटाच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास सपोर्ट सिस्टीम मिळते. एकदा का पब्लिकला मल्टीप्लेक्समध्ये खेचून आणायचे तर अनेक गणिते जोडावी लागतात. आता जुन्या हिंदी चित्रपटातील विविध मूडसची गाणी दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटाच्या हिंदी डब आवृत्तीत अधिक प्रमाणात दिसतील.

आदित्य धरने आपल्या दिग्दर्शनातील “धुरंधर”मध्ये जे जुन्या चित्रपटातील गाण्यांचे मुखडे तुकडे ज्या कल्पकतेने पेरले ते आता साऊथच्या चित्रपटात जास्त रंगेल. हिंदीत हा प्रकार दहा-बारा वर्षांपूर्वीच पेरला गेला. पण रंगत आली ती “धुरंधर”ने. जुन्या गाण्यांचा कसा वापर करायचा यातही सुज्ञता आहे. “राजासाब”पाठोपाठ एकेक करत करत दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपट अन्य प्रादेशिक भाषा आणि हिंदीत डब होऊन दणक्यात येताहेत.जना नयागन (तमिळ), जेलर २ (तमिळ), दृश्यम ३ (मल्याळम), टाॅक्सिस (कन्नड), फौजी (तेलगू), पेड्डी (तेलगू), सूर्या ४६ (तमिळ), गोदाचरी २ (तमिळ)… वगैरे वगैरे अनेक. एव्हाना अंदाज आला असेलच पडद्याभर रंगणारे मनोरंजन आहे. या पिक्चर्सची हिंदीसह मराठी चित्रपटांनाही स्पर्धा परीक्षा आहेच. या वातावरणात मराठी मातीतील उत्तम आशय हाच मराठीला आधारकार्ड आहे, हे म्हणणे नक्कीच पटेल. हेच साऊथचे चित्रपट मराठीतही डब होऊन प्रदर्शित होऊ लागले तर त्या स्पर्धेत टिकण्यासाठी आपलं असं काही हवे… ते चांगल्या आशयात आहे.



