गोव्यात सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) काल दोन वेगळे पण भावनिकरीत्या परस्परांशी जोडणारे चित्रपट आणि चित्रपटकर्मी एकत्र आले. ‘मदर्स बेबी’ आणि ‘माय फादर्स शॅडो’च्या टीमने कला, स्मृती आणि वास्तव प्रतिबिंबित करणाऱ्या विषयावर मनस्वी संवाद साधला. या सत्रात ‘मदर्स बेबी’चे सिनेमॅटोग्राफर रॉबर्ट ओबेरेनर आणि प्रोडक्शन डिझायनर जोहान्स सॅलट यांच्यासोबत ‘माय फादर्स शॅडो’चे दिग्दर्शक अकिनोला ओगुनमेड डेव्हिस एकत्र आले होते. हे चित्रपट युकेच्या अधिकृत ऑस्कर प्रवेशामुळे आणि कानमध्ये प्रदर्शित होणारा पहिला नायजेरियन चित्रपट म्हणून जगभरात नावलौकिक मिळवत आहेत.
संवाद सुरु करताना, अकिनोलाने ‘माय फादर्स शॅडो’ची सुरुवात त्याच्या भावाने लिहिलेल्या एका लघुकथेपासून केली. 1993च्या नायजेरियन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, हा चित्रपट राजकीय तणावाच्या त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देतो. ही सूक्ष्म कथा वडील आणि त्यांच्या मुलांची आहे तर त्यातील बृहत कथा निवडणुकीची आहे आणि त्यात सर्वकाही एकजीव होते, असे त्यांनी सांगितले. चित्रपट एकाच दिवसात पुढे जातो. त्यातून आम्हाला नैसर्गिकरित्या तणाव निर्माण करता आला आणि सर्वकाही एकाच दिवसात घडत असल्याने, आम्ही एकसंघतेने बांधलेले नव्हतो. आम्ही भावनांवर लक्ष केंद्रित करू शकलो, असे ते म्हणाले.

चित्रपट निर्मात्याने चित्रिकरणातील भावनिक आणि तांत्रिक अडचणींबद्दल, खासकरून समुद्रकिनाऱ्यावरील दृश्यांबद्दल मोकळेपणाने संवाद साधला. तिथे 16 एमएमचा चित्रपट उष्णता आणि आवाजाशी झुंजत होता. एका अंत्यसंस्काराच्या दृश्याने मला भावनिकदृष्ट्या थकवले. मी दोन दिवस अंथरुणावर पडलो आणि रडलो, अशी कबुली त्यांनी दिली. बोलताना अकिनोलांनी प्रेक्षकांना नायजेरियाची एक सुंदर झलक दाखवली. त्याने नायजेरियाचे राजकीय परिदृश्य, भाषिक विविधता आणि शिक्षणातील तफावत आदी मुद्द्यांवरदेखील भाष्य केले.
‘मदर्स बेबी’ बनवणाऱ्या टीमसाठी, चित्रपटाचे सार म्हणजे बाळंतपणानंतरच्या भयावह स्थितीतून मार्ग काढणाऱ्या एका महिलेचा प्रवास होता. सिनेमॅटोग्राफर रॉबर्ट ओबेरेनर यांनी सांगितले की, त्यांचा मुख्य हेतू “प्रसूतीदरम्यान महिलांमध्ये होणारे वास्तविक बदल” चित्रित करणे हा होता. हा चित्रपट जुलिया, या प्रसिद्ध वाद्यवृंद चालिकेच्या आयुष्यावर आहे. ती एका प्रयोगशील कृत्रिम प्रजनन प्रक्रियेद्वारे गर्भावती राहते. मात्र ही पद्धत तिला ज्ञात पद्धतींपैकी असल्याचे वाटत नाही. आपल्याला या चित्रपटाला असा दृश्यात्मक अनुभव द्यायचा होता, की प्रेक्षकांना आपण प्रत्यक्ष ज्युलियासोबतच वावरत आहोत असे वाटेल आणि त्यांना अस्वस्थ करणाऱ्या मानसिक स्थितीचा अनुभव येईल, असे रॉबर्ट यांनी सांगितले.
या चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया सांभाळणारे जोहान्स सालात यांनी कथानाकतली संकल्पना किती महत्त्वाची आहे हे अधोरेखित केले. या चित्रपटात मांडलेला विषय महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे ते म्हणाले. हा चित्रपट म्हणजे प्रत्येक्षात कधीही, कुठेही घडू शकणारी सार्वत्रिक कथा आहे. या चित्रपटाचे भावविश्व निर्माण करणे खूपच आव्हानात्मक आणि तितकेच उस्फूर्त होते. चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी अखेरीस जे ठिकाण निवडले गेले, ते जणू या कथेसाठीच बनलेले होते, असा अनुभव त्यांनी सामायिक केला.

