Saturday, October 26, 2024
Homeटॉप स्टोरीमुंबईतला किनारी रस्ता...

मुंबईतला किनारी रस्ता सध्या आठवड्यातून ५ दिवसच खुला

मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि मुंबईकरांसह संपूर्ण देशासाठी उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरलेल्या मुंबई किनारी रस्ता (कोस्टल रोड) प्रकल्पाची वरळी ते मरीन ड्राईव्ह अशी दक्षिणवाहिनी मार्गिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज, सोमवारी सकाळी ११ वाजता खुली करण्यात येणार आहे. मात्र, किनारी रस्त्याची ही मार्गिका आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस दररोज सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत वाहतुकीसाठी सुरु असेल. तर शनिवार आणि रविवारी वाहतूक पूर्णपणे बंद असेल. उद्यापासून या मार्गिकेचा प्रत्यक्षात वापर करता येईल.

वरळी सी फेस परिसरातील बिंदू माधव ठाकरे चौक, खान अब्दुल गफार खान मार्ग येथून किनारी रस्त्यावर प्रवेशासाठी मार्गिका आहे. त्या ठिकाणी हा समारंभ होणार आहे. मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, स्थानिक खासदार अरविंद सावंत, स्थानिक आमदार आदित्य ठाकरे, आमदार सुनील शिंदे, आमदार राजहंस सिंह यांच्यासह विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभास अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे आदी मान्यवर यावेळी उपस्थ‍ित असतील.

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) हा मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. दक्षिण-उत्तर पसरलेल्या मुंबईभर रस्त्यांचे विस्तीर्ण जाळे असले तरी वाढती लोकसंख्या आणि त्यातून वाढलेल्या वाहनांमुळे वाहतूककोंडीचा अनुभव येतो. या कोंडीतून सुटका व्हावी तसेच प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत व्हावी म्हणून पालिकेने मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच नरिमन पॉईंटपासून दहिसर-विरारपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी मुंबई किनारी रस्ता प्रकल्प हाती घेतला आहे. त्यातील पहिला टप्पा म्हणजे मुंबईच्या दक्षिणेला प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वरळी-वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंतचा मार्ग अर्थातच मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्ष‍िण) होय. या प्रकल्पाची वरळीकडून मरीन ड्राइव्हच्या दिशेने म्हणजेच दक्षिणेकडे जाणारी मार्गिका आता खुली करण्यात येणार आहे.

खुल्या होणाऱ्या मार्गिकेवरुन प्रवासाची वेळ

किनारी रस्त्याची वरळी ते मरीन ड्राइव्ह ही मार्गिका आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस दररोज सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत वाहतुकीसाठी सुरु असेल. तर शनिवार आणि रविवारी वाहतूक पूर्णपणे बंद असेल.

याचे मुख्य कारण म्हणजे किनारी रस्त्यावरुन उत्तरेकडे जाणाऱ्या बाजुची कामे व इतरही कामे सध्या सुरू आहेत. त्यादृष्टीने प्रकल्पाची कामे सुरू राहावीत, उर्वरित प्रकल्पदेखील वेळेत पूर्ण करता यावा, यासाठी वाहतुकीच्या वेळा ठरवण्यात आल्या आहेत. ऐन वर्दळीच्या वेळेत (पीक अवर्स) वाहतूक सुरु राहील, नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घेतली आहे. ही बाब लक्षात घेता, किनारी रस्त्याची वरळी ते मरीन ड्राइव्ह मार्गिका सोमवार, दिनांक ११ मार्च २०२४ रोजी समारंभपूर्वक खुली करण्यात येईल. त्यानंतर प्रत्यक्षात, उद्या मंगळवारपासून सकाळी ८ वाजेपासून या ठरवलेल्या वेळापत्रकानुसार मुंबईकरांना या मार्गिकेवरुन प्रवास करता येईल.

असा आहे संपूर्ण प्रकल्प

एकूण १०.५८ किलोमीटर लांब असलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पासाठी जवळपास १४ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या प्रकल्पात भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते यांचा समावेश आहे. तसेच अमरसन्स, हाजी अली व वरळी येथे आंतरबदल मार्गिका अर्थात इंटरचेंज आहेत.

जुळे बोगदे ठरणार आकर्षण

दक्षिण-उत्तर मुंबईकडून येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहतुकीसाठी प्रत्येकी २ किलोमीटर लांबीचे दोन स्वतंत्र भूमिगत जुळे बोगदे करण्यात आले आहेत. या बोगद्यात सहा व इतर ठिकाणी ८ मार्गिका आहेत. त्यासाठी, सुमारे चार मजली इमारतीइतकी उंची, १२.१९ मीटर व्यास, ८ मीटर लांबी व तब्बल २८०० टन वजनाच्या ‘मावळा’ या भारतातील सर्वात मोठ्या टीबीएम संयंत्राचा उपयोग करण्यात आला. या बोगद्यांना तब्बल ३७५ मिमी जाडीचे काँक्रिटचे अस्तर आहे. त्यावर अग्नीप्रतिबंधक उपाययोजना म्हणून अत्याधुनिक फायरबोर्ड लावले आहेत. या बोगद्यांमध्ये भारतात प्रथमच वापरात येत असलेली अत्याधुनिक सकार्डो ही वायूविजन प्रणाली आहे. आपत्कालीन उपाययोजना म्हणून दोन्ही बोगद्यांना जोडणारे एकंदर ११ छेद बोगदेदेखील आहेत.

इंधन, वेळेची होणार बचत

किनारी रस्ता हा केवळ भौतिकदृष्ट्या नव्हे तर पर्यावरणदृष्ट्यादेखील अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण वाहतूककोंडी कमी होऊन सुरक्षित प्रवासाचा वेग वाढेल. यातून वेळेची अंदाजे ७० टक्के बचत होईल. इंधनाची ३४ टक्के बचत होईल. पर्यायाने विदेशी चलनाचीही मोठी बचत तर होईलच. त्यासमवेत वायू प्रदूषणात घट होईल.

७० हेक्टर हरितक्षेत्राची निर्मिती

या प्रकल्पातून ७० हेक्टर हरितक्षेत्र निर्मिती केली जात आहे. हरितक्षेत्रात सायकल ट्रॅक (Cycle tracks), सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक (Jogging tracks), खुले प्रेक्षागृह (Open Theatre) साकारेल. या प्रकल्पामुळे समुद्र किनारी अतिरिक्त विहार क्षेत्र उपलब्ध होईल. त्याची कामेदेखील पूर्णत्वाकडे येत आहेत. सागरी तटरक्षक भिंतीमुळे किनाऱ्याची धूप होण्यापासून संरक्षण होईल. तसेच वादळी लाटा व पुरापासूनदेखील संरक्षण होईल.

बाधित मच्छिमारांसाठी घेतली विशेष काळजी

किनारी रस्ता प्रकल्पामुळे बाधित मच्छिमारांचे नुकसान होऊन नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. तज्ज्ञांचे मार्गदर्शन, मच्छिमार पुनर्वसन मूल्यांकन समिती, योग्य नुकसानभरपाई, तसेच त्यांच्या मागणीनुसार समुद्रातील खांबांमधील अंतरात वाढ अशा सर्वंकष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

Continue reading

बेंचप्रेस स्पर्धेत दिनेश पवार यांना सुवर्णपदक

द.आफ्रिका येथे सन सिटी शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत मास्टर १ (४० वर्षांवरील पुरुष) या गटात ७५ किलो वजनी गटात रायगडच्या दिनेश पवार यांनी  सुवर्णपदक मिळविले. दिनेश पवार हे महड येथील रहिवासी असून खालापूर येथील स्पार्टन जिममध्ये सराव...

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी समर्थांची ‘महामृत्युंजय’ लीला!

संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेली कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका रंजक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या अद्वितीय आणि गूढ लीला या मालिकेत पाहायला मिळत आहेत. 'जय जय स्वामी...

वरूण सरदेसाईंची संभाव्य उमेदवारी ठाकरे सेनेला पडणार भारी?

फक्त आदित्य ठाकरे यांचा मावसभाऊ, या एकमेव लेबलवर उमेदवारी मिळवणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पूर्वमधली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले सैनिक कमालीचे संतप्त झाले असून वरूणची उमेदवारी लादली गेलीच तर मातोश्रीला चांगलाच धडा शिकवायचा अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली...
Skip to content