एका जमान्यात आंतरराष्ट्रीय फुटबॉल जगतावर एखाद्या सम्राटाप्रमाणे राज्य करणाऱ्या बलाढ्य ब्राझील फुटबॉल संघाची सध्या मात्र काहीशी बिकट वाटचाल सुरू आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाप्रमाणेच ब्राझील फुटबॉल संघाचीदेखील परिस्थिती गेल्या काही वर्षांत अत्यंत खराब झाली आहे. विक्रमी ५ वेळा मानाची विश्वचषक फुटबॉल स्पर्धा जिंकणाऱ्या ब्राझीलसमोर आता २०२६मध्ये होणाऱ्या जागतिक फुटबॉल स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश मिळणार की नाही अशी टांगती तलवार निर्माण झाली आहे. ब्राझील संघ मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरला नाही तर त्यांच्यावर मोठी नामुष्कीची पाळी ओढवू शकेल. कारण, आतापर्यंत झालेल्या सर्व विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरलेला ब्राझील हा एकमेव देश आहे.
गेल्या काही वर्षांत ब्राझील फुटबॉल संघाचा खेळ उतरणीला लागला आहे, असे खेदाने म्हणावे लागेल. २००२ साली ब्राझीलने शेवटची जागतिक फुटबॉल स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर गेली २२ वर्षे जागतिक विजेतेपद ब्राझीलला हुलकावणी देत आहे. गेल्या २०२२च्या विश्वचषक स्पर्धेत त्यांना उपउपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियाकडून हार खावी लागली होती. २०१८च्या या स्पर्धेत त्यांना उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमकडून पराभव पत्करावा लागला होता. २०१४ साली ब्राझीलने या स्पर्धेचे यजमानपद भूषविले होते. त्यावेळी कोट्यवधी ब्राझीलीयन फुटबॉलप्रेमी संघाकडून जेतेपदाच्या अपेक्षा बाळगून होते. परंतु त्यांच्या अपेक्षांना संघाने मोठाच सुरुंग लावला. उपांत्य फेरीत माजी विजेत्या जर्मनीकडून त्यांना ७-१ गोलांनी हार खावी लागली. त्यामुळे सारा ब्राझील शोकसागरात बुडून गेला होता. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासात ब्राझीलचा हा सर्वात मोठा पराभव होता. २०१९ साली ब्राझीलने कोपा अमेरिका चषक फुटबॉल स्पर्धा पेरुचा ३-१ गोलांनी पराभव करुन जिंकली होती. तेच त्यांचे गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठे विजेतेपद.

गेल्या ५ वर्षांत ब्राझील संघाच्या खेळात सातत्यपूर्ण कामगिरीचा अभाव दिसत आहे. त्यांच्या खेळातील पहिली जादू, आक्रमकता, पासिंग, ड्रिबलिंग हे सारे लोप पावत चालले आहे. त्यामुळेच दुबळ्या संघांकडूनदेखील पराभवाची नामुष्की ब्राझीलवर येऊ लागली. आगामी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या सध्या सुरू असलेल्या दक्षिण अमेरिका विभाग पात्रता फेरीच्या सामन्यात ब्राझील संघ १० संघात ५व्या क्रमांकावर आहे. मुख्य स्पर्धेसाठी अव्वल ६ संघ पात्र ठरतील. याच पात्रता फेरीच्या सामन्यात गतविजेत्या अर्जेंटिनाने त्यांचा स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार लियोनल मेस्सी नसतानादेखील ब्राझीलवर ४-१ गोलांनी सहज विजय मिळविला. या विजयाबरोबरच अर्जेटिनाने २०२६च्या जागतिक फुटबॉल स्पर्धेचे तिकिट पक्के केले. ४ सामने बाकी असतानाच अर्जेटिनाने या गटात १० संघात ३१ गुण मिळवून सध्या अव्वल क्रमांक मिळवला आहे. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या लढतीत ब्राझीलला प्रथमच एवढ्या मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळेच ब्राझील संघ २०२६च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे तिकिट पक्के करणार की नाही, याबाबत मोठेच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एका जमान्यात फुटबॉलविश्वात ब्राझील संघ म्हणजे शान असायची. त्यांचा शैलीदार, आक्रमक, आकर्षक खेळ पाहण्यासाठी सारे फुटबॉलविश्व उत्सुक असायचे. परंतु आता त्याला काहीसा छेद गेला आहे. गेल्या ४ वर्षांत ब्राझीलने संघाचे ४ मुख्य प्रशिक्षक बदलले. त्याचा मोठा फटका ब्राझील संघाला बसत आहे. संघाच्या खराब कामगिरीला प्रत्येकवेळी मुख्य प्रशिक्षक जबाबदार असतो, अशीच काहीशी धारणा ब्राझील फुटबॉल महासंघाची झालेली दिसते. अर्जेंटिना संघाकडून पराभव झाल्यानंतर लगेचच मुख्य प्रशिक्षक डोरीवल, ज्युनियर यांची हकालपट्टी करण्यात आली. जेमतेम दिड वर्षे ते ब्राझील संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहत होते. त्यांच्याअगोदर असलेल्या फर्नांडो, रॅमोन यांनादेखील फार काळ मुख्य प्रशिक्षकपदावर ठेवण्यात आले नव्हते. त्यातल्यात्यात २०१६नंतर टिटे यांच्याकडे सप्टेंबर २०१६ ते डिसेंबर २०२२ अशी ६ वर्षे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली होती. जागतिक फुटबॉल स्पर्धेला आता अवघे दीड वर्ष राहिले असून ब्राझील संघ त्या स्पर्धेत खेळला तरी नव्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एवढ्या छोट्या कालावधीत तो कसा परिपूर्ण होणार हा मोठा प्रश्नच आहे.

ब्राझीलचे अनेक फुटबॉलपटू अनेक मोठ्या क्लबतर्फे खेळताना आपल्या खेळाची सुंदर झलक पेश करतात. परंतु ब्राझीलतर्फे खेळताना मात्र त्यांच्या खेळात ती जादू दिसत नाही. कारण, शेवटी क्लबतर्फे खेळणे आणि देशातर्फे खेळणे यात बराच फरक पडतो. क्लबतर्फे खेळताना तुम्ही सातत्याने आपल्या सहकाऱ्यांसोबत नियमित सराव करत असता. प्रशिक्षकांचे लक्ष असतेच. परंतु देशातर्फे खेळताना मात्र काही दिवसच तुम्ही सहकाऱ्यांबरोबर सराव करता आणि मोठ्या सामन्यांसाठी सज्ज होता. थोड्या दिवसांच्या कालावधीत खेळाडूंमध्ये समन्वय साधणे काहीसे कठीण होते. त्यातच देशवासीय फुटबॉलप्रेमींची आपल्या स्टार खेळाडूंकडून मोठी अपेक्षा असते. त्याचे दडपण खेळाडू मैदानात उतरला की येतेच. ब्राझील फूटबॉलपटूंचे तसेच काहीसे सध्या झाले आहे. तसेच खेळाडूंचे क्लबशी मोठ्या रकमेचे करार होत असतात. खेळाडूंना बडे क्लब राजेशाही थाटात ठेवतात. त्यामुळे मग तरुण, युवा खेळाडू देशापेक्षा क्लबलाच जास्त प्राधान्य देतो. क्लबसाठी तो आपले सर्वस्व देतो.
आज ब्राझीलचे युवा फुटबॉलपटू युरोपची वाट धरतात. त्यामुळे तेथील फुटबॉलची गुणवत्ता घसरत चालली आहे. एका जमान्यात फुटबॉलविश्वातील “पॉवर हाऊस” म्हणून हा संघ ओळखला जायचा. काही वर्षांपूर्वी या खेळात ब्राझील आणि विजेतेपद हे समीकरण होऊन बसले होते. परंतु आता ते इतिहासजमा झाले आहे. महान फुटबॉलपटू पेलेच्या या ब्राझील संघाची वहिवाट सध्या बिकटच दिसते. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या राहिलेल्या पात्रता फेरीच्या सामन्यांत ब्राझीलला आपला खेळ उंचवावा लागेल. राहिलेले सामने जिंकून आपले २०२६च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे तिकिट निश्चित करावे लागेल. हे तिकिट ब्राझील संघ पक्के करतो की नाही याचा फैसला येत्या काही महिन्यांतच होणार आहे. ब्राझील फुटबॉलप्रेमी आपला संघ विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरावा अशी अपेक्षा बाळगून असतील. त्याची पूर्तता हा संघ करतो का ते आता बघायचे.
