एसटी प्रवास हा माझ्या आवडीचा विषय. विशेषतः लाल परी अधिक चांगली. दाणकन आपटल्याशिवाय दरवाजा लागत नाही. अचानक दरवाजा उघडण्याची भीतीदेखील कमी असते. आता लाल परीच्या जागी आरामदायी बस आल्या आहेत. हा एक बदल आहेच. मला मोटारीने प्रवास करणे आवडत नाही असे नाही, पण बसची मजा वेगळीच.
माझ्या कोकणातील गावात पूर्वी कधीतरी बस येत असे. आम्हाला दोन किलोमीटर अंतरावर जावे लागत असे. आता गावात पूल झाला आणि आमच्या जुन्या घरासमोरील रस्त्यावरुन दिवसभरात बसच्या किमान तीस फे-या होतात. पाली या गावातील बसस्टंँडचे मला पहिल्यापासून आकर्षण आहे. याचे कारण हे गाव मोक्याच्या ठिकाणी आहे. मुंबई येथून येणाऱ्या सगळ्या गाड्या पालीत येतात. कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाड्यादेखील पालीत थांबतात. वेळेवर गाडी मिळाली की पुढचा प्रवास सुखकर होतो हा अनुभव. फक्त एसटीच्या मालकीच्या किंवा ताब्यात असलेल्या जमिनी/जागा यांचा योग्य पद्धतीने उपयोग का करुन घेतला जात नाही हा माझा नेहमीचा प्रश्न. पालीत आलो की माझे विचारचक्र सुरु होते.

आपली सत्तरी उलटली, आपल्याला एसटी प्रवास झेपेल का असा विचार करुन कोकणात गेलो होतो. लांज्यातून जन्मगावी गेलो. अजून मैत्रीचे बांध पक्के आहेत. त्यामुळे हक्काने बालमित्राच्या घरी गेलो. दुपारी स्नेहभोजन झाले. इथे दुपारच्या वेळी आलेला माणूस जेवण केल्याशिवाय परत जाणार नाही याची खबरदारी घेतलेली असते. खेड्यात हे वातावरण आहे. दुसऱ्या दिवशी निघण्याचा पर्याय होता, पण सकाळी जागे होण्याचे गणित चुकले की, मग दिवसभर प्रवासात घालवायचे अवघड होते. म्हणून संध्याकाळी लांज्यात आलो. पाली येथून पुण्याकडे जाणाऱ्या एसटीचे रिझर्वेशन केले होते. ही एक सोय बरी झाली. पण ही एसटी म्हणजे बस राजापूर येथून संध्याकाळी साडेपाच वाजता सुटते आणि समुद्राच्या कडेकडेने शांतपणे प्रवास करीत तीन तासांनी पालीत येते. साधारण सत्तर किलोमीटर प्रवास असावा. कंडक्टर आणि ड्रायव्हर नक्की कंटाळून जात असतील. माझ्या रिझर्वेशन वर आँर्डीनरी बस असा उल्लेख होता. मला वाटले बहुधा लाल डबा असावा. पण आश्चर्य म्हणजे छान सीट असलेली जवळपास नवीनवेली बस होती. कडेच्या सीटचे रिझर्वेशन होते. पण अगोदरच कोणी बसला होता. त्याला न उठवता उपलब्ध जागेवर मी बसलो आणि मग आठ तास प्रवास करुन पुण्याला आलो.
पालीच्या स्टँडवर आलो होतो तेव्हा फारशी गर्दी नव्हती. म्हणजे शिमगा वगैरे दूर असल्यामुळे गर्दी असण्याचा विषय नव्हता. नेहमीप्रमाणे गर्रकन वळून येणाऱ्या बस आल्या की धावत जाऊन पाटी बघणे हा आवडता छंद कायम आहे. बालपण लक्षात ठेवण्यासाठी एक निमित्त. बस थांबली की चिळ्ळ असा आवाज येणे हेही ओळखीचे. बहुधा साठलेली हवा बाहेर पडत असावी. वर्षानुवर्षे कळकट बस कोणतीही तक्रार न करता पळवणारे ड्रायव्हर आणि कंडक्टर हे मला स्नेही वाटतात. ते प्रवाशांचे रक्षणकर्ते असतात हा माझा निष्कर्ष. पालीच्या त्या स्टँडवर मला जे बघायला मिळाले ते सरकार दरबारी पोहोचावे एवढी माझी धडपड असते. या स्टँडची जागा बरीच मोठी आहे. काही एकर असावी. अलिकडेच बहुधा इमारत बांधली गेलेली असावी. ताजेपणा जाणवत होता, पण रंग उखडला जात आहे हेही लक्षात आले. पिण्यासाठी पाण्याची सोय एसटीने केलेली दिसली नाही. स्वच्छतागृह असे लिहिलेले होते. तिकडे गेलो तर एकच उघडे होते. तीनचार कुलूप लावून किंवा अन्य पद्धतीने बंद केलेली दिसली. त्या स्टँडवर कोणताही स्टॉल उघडा नव्हता. परिणामी पिण्यासाठी पाण्याची बाटली विकत घ्यावी तरी अवघड होते. रात्री आठची वेळ होती. प्रवाशांना भूक लागू शकते. पण हा विचार महामंडळाने केलेला नसावा. बहुधा इथल्या दुकानांचे टेंडर वगैरे निघत असावे. एसटीच्या बहुतेक स्टँडची जागा बरीच मोठी म्हणजे एकरात मोजता येईल एवढी असते. पालीची जागा अशीच मोठी आहे. जवळपास एकदोन निवासी हॉटेल वगैरे आहेत. राज्याचे मंत्री उदय सामंत यांचा बंगलादेखील जवळपास कुठेतरी आहे. तर पालीत पाणी वगैरे काही मिळाले नाही. मी प्रवासात भलता त्रास नको म्हणून खाणे अगोदरच नियंत्रित ठेवले असल्यामुळे आणि माझ्यापुरती पाण्याची बाटली बरोबर असल्यामुळे फारसा प्रश्न आला नाही. थोड्या वेळाने रस्त्याच्या बाजूला असलेले तंदुरी हॉटेल बघून एसटी थांबली. हा थांबा कायदेशीर नसतो. पण कंडक्टर आणि ड्रायव्हर यांचा इलाज नसावा. चमचमीत पदार्थ म्हणजे आम्लेट, भुर्जी, चिकन वगैरे सगळे उपलब्ध होते. चहा मागितला तर थर्मास भरुन आला आणि दहा रुपयांना भरभरुन साखर घातलेला आणि कडक उकळलेला चहा कसाबसा मिळाला. इथे विकतचे पाणी होते.

एसटी ही खरोखरच जनवाहिनी आहे. अजूनही खेड्यापाड्यात दुसरे चांगले साधन उपलब्ध नाही. हमखास प्रवासी असलेला हा व्यवसाय आहे, पण शहरी भागात वाहतूकव्यवस्थेत राजकीय लोकांनी शिरकाव केल्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती एसटीच्या संदर्भातदेखील आहे एवढे मान्य करायला हवे. पुण्यातील वाहतूकव्यवस्था म्हणजे पीएमटी, जी पुढे वेगळ्या नावाने सुरु आहे ती कधीकधी फायद्यात चालत असे. ज्यांनी ती फायद्यात आणली त्या अधिकाऱ्याची नंतर बदली करण्यात आली. एसटीच्या सेवेलादेखील खासगी क्षेत्राचे ग्रहण आहे. राज्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही विधाने यासंदर्भात केली होती. आता नव्या गाड्या येत आहेत, स्मार्ट गाड्या वापरण्यात येत आहेत हे मान्य करायला हवे. फक्त एसटीकडे उपलब्ध असलेल्या जमिनी योग्य पद्धतीने वापरात आणता आल्या तर एसटीच्या नफ्यात वाढ होईल, शिवाय प्रवाशांना हक्काचे साधन उपलब्ध होईल. बहुमजली इमारती एसटीच्या जागांवर बांधून स्टँडसाठी वापरात आणलेली जागा वगळून उंच इमारतींचा वापर करता येईल. सध्या एसटी स्टँड म्हणजे कोणीही यावे आणि आराम करावा अशा पद्धतीचे आहेत, पण भविष्यात जर प्रवासी किंवा इतरांना एसटी स्टँडवर चांगल्याप्रकारे निवासाची व्यवस्था करुन देता आली तर राज्याच्या हितासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल. एसटीचे खासगीकरण करुन सगळा व्यवसाय खासगी क्षेत्रात देण्यापेक्षा एसटीने व्यापक विचार केला तर बरे!
(लेखक मनोहर सप्रे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

