पुण्यातील कुख्यात गुंड गजानन ऊर्फ गजा मारणे तळोजा तुरुंगातून सुटला म्हणून एखाद्या राजकीय नेत्याप्रमाणे त्याच्या समर्थकांनी त्याची आलिशान शोभायात्रा काढली आणि महाराष्ट्र पोलिसांनी ती शांतपणे पाहिली, असेच आता म्हणावे लागेल. पुणे शहराच्या गजबजलेल्या रस्त्यावर भरदिवसा प्रतिस्पर्धी गुंड टोळीतील गुंडांचा गोळ्या घालून मुडदा पाडल्याच्या आरोपावरून गजा मारणे 2014पासून सरकारी पाहुणा होता. संघटित गुन्हेगारीविषयक कायद्यामुळे जामीन मिळणेही मुश्किल असते. येथे तर जामीन सोडाच कुख्यात गुंडाला निर्दोष म्हणून सोडण्यात आले आहे. मग गुंड टोळीच्या दृष्टीने ही आनंदाचीच गोष्ट समजा ना! खरेतर गजा मारणेच्या संपूर्ण खटल्याची कागदपत्रं मागवून त्याचा कोणी तरी अभ्यास केला पाहिजे. उगाच नाही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणाले की, न्यायालयात न्याय मिळतच नाही! संतापाची बाब म्हणजे या शोभायात्रेत शंभरच्या आसपास आलिशान गाड्याही होत्या. कुठल्याही राजकीय पक्षाचे राज्य असते तरी अशी शोभायात्रा निघालीच असती, कारण गुंड आवडे सर्वांना.. या न्यायाने निवडणुकीत एकगठ्ठा मते फिरवण्यासाठी सर्वांनाच ‘भाई’ हवा असतो. खरेतर हत्त्येचा कट रचणे व शस्त्र पुरविणे, शिवाय संघटित गुन्हेगारी करणे या आरोपाखाली गजाला किमान 20/25 वर्षे तरी खडी फोडायला पाठवायला हवे होते. परंतु हाती आलेल्या विश्वसनीय माहितीनुसार हा निर्णय म्हणजे मोठी ‘मांडवली’ असल्याचा दाट संशय आहे. खटला चालवणाऱ्या सरकारी वकिलांनी याला परवानगी दिली होती काय, याची गृह खात्याने कसून चौकशी करण्याची गरज आहे.
या शोभयात्रेचे गांभीर्य आणखी वाढण्याचे कारण म्हणजे राज्य पोलीस महासंचालक हेमंत नागराळे त्यादिवशी पुणे येथे सरकारी कामानिमित्त वस्तीला होते. पोलिसांचा धाक सोडा, त्यांच्या नजरेचा वचकही गुंड टोळ्यांवर नसल्याचे हे द्योतक आहे. मी वरच म्हटले आहे की, कुणाचेही सरकार असो ही शोभायात्रा निघालीच असती. आपली सरकारी यंत्रणा किती सडली आहे हे यावरून दिसते. यात कुणा एकाचा दोष नाही. समाजाचाही तितकाच दोष आहे. नवी मुंबई वा पुणे येथेच असे घडते असे नाही. सुमारे पाच महिन्यांपूर्वी ठाण्याच्या वर्तक नगर परिसरातही अशाच एका ‘मारणे’ची शोभायात्रा निघाली होती. या भागातील कुख्यात गुंड सिद्धू अभंगे याचेही नाशिक कारागृहाबाहेर फटाके फोडून स्वागत करण्यात आले. पण या फटाक्यांचा आवाज ठाणे मुक्कामी कोणी ऐकला नसेल म्हणून वर्तक नगर परिसरातही मोठा जल्लोष केला गेला. संध्याकाळनंतर रात्रीपर्यंत हा जल्लोष सुरू होता. काही अतिउत्साही सिद्धूप्रेमींनी शोभायात्रा येऊरला नेण्याचा घाट घातला होता. परंतु असे काही झाले नाही. माझ्या लिखाणात अतिशयोक्ती आहे असे वाटत असेल तर यु ट्यूबवर या सिद्धू भाईचे समाजकार्यातील कारनामे दिसून येतील. आणखी बरेचही काही दिसेल. अधिक माहिती मिळवण्यासाठी वर्तकनगर पोलीसठाणे मदतीला आहेच.
पुणे मुक्कामी एका जमिनीच्या व्यवहार प्रकरणीही बराच वाद आणि उलटसुलट चर्चा सुरू आहे. परंतु याप्रकरणी 40 लाख रुपये इतकी मोठी रक्कम गणक यांत्रिकीकरणाच्या साहाय्याने आरोपीच्या खात्यात जमा झालेली आहे. हा भक्कम पुरावा आहे. गजा काय किंवा सिद्धू काय, हे बोलूनचालून गुंडच आहेत. परंतु जमिनीच्या व्यवहारात गुंतलेली ही सर्व मंडळी व्हाइट कॉलर गुंडच आहेत. त्यांच्यावरही कडक कारवाईची अपेक्षा आहे. जाता जाता एक आठवले म्हणून 89/90 दशकातही नामचीन गुंडांना अटक झाली की त्यांच्या सुनावणीच्या वेळी शेकडो युवक न्यायालयात गर्दी करायचे तेव्हा तत्कालीन अधिकारी राजेंद्र जोशी, विजयसिंह गायकवाड, भानुप्रताप बर्गे आदी अधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावून अनेक युवकांना पोलीस आयुक्तालयात आणले होते. त्यांना काही गोष्टी समाजवल्या होत्या. यानंतर मात्र न्यायालयात कधीच गर्दी दिसली नाही. अगदी त्याचप्रमाणे या शोभायात्रेतील गाड्यांचा मागोवा पोलिसांनी घेतलाच पाहिजे. शिवाय सीसीटीव्हीची क्लीपिंग पाहून सर्व अतिउत्साही कार्यकर्त्यांना खडसावले पाहिजे. पाहुया काय होते ते..