Homeन्यूज अँड व्ह्यूजनगरसेवकांतली फूट टाळण्यासाठी...

नगरसेवकांतली फूट टाळण्यासाठी ठाकरेंचा निवडणुकीतून पळ!

अखेर इतक्या दिवसाच्या प्रतिक्षेनंतर भाजपच्या रितू तावडे ह्यांची मुंबईच्या महापौरपदी  बिनविरोध निवड झाली. भारतातील सर्वात श्रीमंत महापालिका, देशाची आर्थिक राजधानी म्हणून गणल्या जाणार्‍या मुंबई महापालिकेचे बजेट हेच ४८ हजार कोटींचे असते, जे इतर अनेक राज्यांपेक्षा जास्त आहे. ४४ वर्षांनंतर प्रथमच भाजपचा महापौर झाला आहे. गेली २५ वर्षे जरी भाजप आणि शिवसेनेची महापालिकेत युती होती तरीही शिवसेनेने भाजपला महापौरपद कधीही दिलेले नव्हते. उपमहापौरपद मात्र दिले होते. यंदाच्या निवडणुकीत भाजपला भरघोस यश मिळाले. त्यामुळे महापौर भाजपचाच होणार हे नक्की होते. मात्र शिंदेंच्या शिवसेनेने यंदा बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे म्हणून महापौरपद शिवसेनेला द्यावे, अशी मागणी केली होती. मात्र मुंबई महापालिकेत शिवसेनेला केवळ २९ नगरसेवक निवडून आणता आले. त्यामुळे त्यांचा हा दावा फोल ठरला. भाजपा ८९ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला. दुसरीकडे उद्धव ठाकरे ह्यांनी महापौर शिवसेना (उबाठा)चा होईल, हे निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर लगेच जाहीर केले. ‘देवाच्या मनात असेल तर महापौर आमचा होईल’, असे विधान करून उद्धव ठाकरेंनी उगाचच एक आवई उठवून दिली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्यात चर्चेच्या अनेक फेर्‍या झाल्यानंतर, महापौर भाजपचाच होईल हे ठरले आणि उपमहापौरपद मात्र शिवसेनेला देण्यात आले. शिवसेनेचे संजय घाडी आता उपमहापौर झाले.

ह्यावर्षी मुंबईचे महापौरपद खुल्या प्रवर्गातून मात्र महिलांसाठी राखीव होते. निवडणुकीच्या प्रचारात मुंबई भाजपचे अध्यक्ष आमित साटम ह्यांनी मुंबईचा महापौर हिंदू असेल आणि मराठी असेल हे आधीच जाहीर केले होते. त्यानुसार आता रितू तावडे ह्यांची निवड झाली आहे. महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वीही उद्धव ठाकरेंची शिवसेना ही निवडणूक लढवणार असे जाहीर करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात उबाठातर्फे कुणीही अर्ज भरला नाही. कारण संख्याबळ तर नव्हतेच. त्यातून मनसेचे नगरसेवक काय भूमिका घेतील हेही माहित नव्हते. आणि उबाठाचेच नगरसेवकही फुटले तर काय, ही शंका आल्यामुळे उबाठाने निवडणुकीतून पळ काढला आणि आपली झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवली. कारण नुकत्याच झालेल्या कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत मनसेच्या नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला होता. तो स्थानिक नेत्यांचा निर्णय आहे असे सांगून राज ठाकरे ह्यांनी अंग काढून घेतले. तशीच परिस्थिती मुंबईत नको यायला म्हणून उद्धव ठाकरेंनी ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यातही महापालिकेच्या अनेक समित्यांमध्ये स्थान मिळवण्यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये अहमहिका लागली आहे. उबाठा-मनसे ही निवडणुकीत युती होती तर मनसेच्या नगरसेवकांना त्यात स्थान द्यावे लागेल. तसेच स्वीकृत सदस्यांमध्येही मनसेला स्थान मिळावे अशी मागणी राज ठाकरे ह्यांनी केली आहे. तीही तडजोड नको म्हणूनच उबाठाने महापौरपदाची निवडणूकच न लढवण्याचा निर्णय घेतला. पण गिरे तो भी टांग उपर.. ह्या म्हणीप्रमाणे उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर ह्यांनी भाजपने मराठी महापौर दिला म्हणून आम्ही त्यांच्याविरुद्ध उमेदवार उभा केला नाही, मराठी महिलेला अपशकून नको, असे म्हणून सारवासारव केली आहे.

रितू तावडे घाटकोपर येथील वॉर्ड क्रमांक १३२मधून निवडून आल्या आहेत. ह्यापूर्वी त्या दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. मुंबई महानगरपालिकेत शिक्षण समिती, स्थापत्य समिती ह्यांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. संजय घाडी वॉर्ड क्रमांक ५मधून निवडून आले आहेत. मुळात उबाठा सेनेचे नगरसेवक असलेले घाडी ह्यांनी नंतर शिंदे ह्यांच्या सेनेत प्रवेश केला. रितू तावडे ह्यांनी खड्डेमुक्त रस्ते, अनधिकृत बांधकामांवर कारवाई आणि अवैधपणे मुंबईत राहणार्‍या बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांना मुंबईतून हाकलून द्यायची घोषणा केली आहे. पाहुया त्या कायकाय करतात ते.. त्यांच्या कारकिर्दीला शुभेच्छा!

(लेखिका वैजयंती कुलकर्णी आपटे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

Continue reading

आडमार्गाने राज्यसभेवर पोहोचण्याचा शरद पवारांचा डाव?

दोन दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूक जाहीर केली आणि तेव्हापासून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले आहे. राज्यसभेच्या ७ जागांपैकी ६ जागा महायुती सहज जिंकू शकते आणि १ जागा महाविकास आघाडीला मिळू शकते. सगळ्या पक्षांची सदस्यसंख्या लक्षात...

.. तर शरद पवारांनी ताबा घेतला असता ‘राष्ट्रवादी’चा!

अखेर अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर अवघ्या ४ दिवसांत सुनेत्रा अजित पवार ह्यांचा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडला. त्यावरून आता उलटसुलट चर्चा चालू आहेत. म्हणजे राजकीय नेते, कार्यकर्ते, त्यांचे कुटूंबीय ह्यांच्या चर्चां, वहिनींवर टीका हे तर विविध प्रसारमाध्यमातून चालूच आहे. पण, एका...

सुनेत्राताईंच्या रूपाने महिलांचा सन्मान करण्याची संधी घेणार भाजप!

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, एक कर्तबदार व्यक्तिमत्व अजित पवार ह्यांच्या आकस्मिक अपघाती मृत्यूने सगळा महाराष्ट्र हळहळतोय. त्यांचा वक्तशीरपणा, त्यांची करडी शिस्त, त्यांचा कामाचा झपाटा, स्पष्टवक्तेपणा, त्यांची प्रशासनावरील पकड, ह्या सगळ्या गुणांच्या आठवणी कार्यकर्त्यांना, राजकीय नेत्यांना आणि आम जनतेला, विशेषत: बारामतीकरांना येत आहेत. अजितदादांच्या...
Skip to content