पुण्यातल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार राहुल कलाटे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने येथील महाविकास आघाडीच्या उमेदवारासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.
लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. भारतीय जनता पार्टीतर्फे येथून जगताप यांच्या पत्नी अश्विनी निवडणूक लढवीत आहेत. महाविकास आघाडीतर्फे नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राहुल कलाटे यांनी येथून उमेदवारी मागितली होती. परंतु ऐनवेळी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून आपला उमेदवारीअर्ज दाखल केला. त्यानंतर आजपर्यंत कलाटे यांचे मन वळवण्याचा जोरदार प्रयत्न महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आला.
आज अखेरच्या दिवशीही शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपनेते सचिन अहिर यांनी मुंबईहून पुण्यात जाऊन कलाटे यांची भेट घेतली. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा याकरीता त्यांनी फार आग्रह धरला. याच काळात त्यांच्या पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनीही दूरध्वनीवरून कलाटे यांची समजूत काढण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र कलाटे यांच्यावर याचा काडीचाही परिणाम झाला नाही आणि दुपारी तीन वाजता अर्ज मागे घेण्याची वेळ संपेपर्यंत त्यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना काटे यांची डोकेदुखी मात्र वाढली आहे. विधानसभेच्या मागच्या निवडणुकीत कलाटे यांनी तेव्हाही बंडखोरी केली होती. त्यावेळी ते दुसऱ्या क्रमांकावर आले होते. त्यामुळेच त्यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीचा उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता वाढली आहे, असे बोलले जाते.
दरम्यान, कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्यात सरळ लढत होणार आहे. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धाबेकर यांनी काल आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे ही सरळ लढत होत आहे. मात्र ब्राह्मण सभेतर्फे आनंद दवे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने भाजपाची डोकेदुखी काहीशी वाढणार असल्याचे बोलले जाते. भाजपाच्या मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे या जागेवर पोटनिवडणूक होत आहे.
काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर
कसबा पेठ व चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुका होत असून २६ फेब्रुवारीला या दोन मतदारसंघात मतदान होत आहे. या मतदारसंघातील निवडणूक प्रचारासाठी काँग्रेसने आज त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.
या स्टार प्रचारकांमध्ये, पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, चंद्रकांत हंडोरे, आ. प्रणिती शिंदे, डॉ. नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, सतेज पाटील, डॉ. विश्वजित कदम, खासदार कुमार केतकर, इम्रान प्रतापगडी, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांचा समावेश आहे.

