Homeमुंबई स्पेशलमुंबईतील पाणी टँकरधारकांचा...

मुंबईतील पाणी टँकरधारकांचा संप मागे

मुंबईत गेले काही दिवस वॉटर टँकर असोसिएशनच्या सुरू असलेल्या संपासंदर्भात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या चर्चेनंतर हा संप मागे घेत असल्याचे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी एका पत्रकार परिषदेत जाहीर केले. 

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा याप्रसंगी उपस्थित होते. याप्रसंगी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत, मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचे अध्यक्ष जसबिरसिंह बिरा, उपाध्यक्ष जितू शाह, सचिव राजेश ठाकूर, हरबनसिंह यांच्यासह असोसिएशनचे विविध प्रतिनिधी उपस्थित होते.

असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर आपले विविध प्रश्न मांडले. टँकरधारकांचे प्रश्न नियमानुसार सोडविण्यात येतील. तथापि, लोकांची होणारी गैरसोय पाहता टँकरधारकांनी पाणीपुरवठा त्वरीत सुरू करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. उपमुख्यमंत्र्यांच्या आवाहनास अनुसरुन संप मागे घेत असल्याचे तसेच गोरेगाव येथे आजच सर्व टँकरधारकांची बैठक घेऊन पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल, असे असोसिएशनच्या प्रतिनिधींनी यावेळी सांगितले.

वॉटर टँकर असोसिएशनच्या विविध मागण्या व त्यांना येत असलेल्या अडीअडचणी सोडविण्याबाबत शासन सकारात्मक आहे. केंद्र शासनाशी तसेच केंद्रीय भूजल प्राधिकरणाशी संबंधित मागण्यांबाबत त्यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात येईल. पाण्याचे टँकर अचानक बंद झाल्याने मुंबईत लोकांची मोठी गैरसोय होत आहे. अशा पद्धतीने पाण्यासारख्या मूलभूत गरजेशी संबंधित बाबीवर लोकांची गैरसोय करणे चुकीचे आहे. त्यामुळे असोसिएशनने तातडीने टँकरचा पाणीपुरवठा सुरू करावा, असे लोढा यांनी यावेळी सांगितले. बैठकीनंतर लोढा आणि असोसिएशनच्या प्रतिनिधींसमवेत झालेल्या पत्रकार परिषदेत संप मागे घेत असल्याचे असोसिएशनच्या प्रतिनिधींनी जाहीर केले.

विविध नियमांची अंमलबजावणी सक्तीची झाल्यामुळे आज टँकरचालक-मालकांनी संप पुकारला होता. त्यामुळे टँकरच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेकडो मुंबईकरांचे आतोनात हाल झाले. मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने हा संप पुकारला होता. त्यमुळे मुंबईतल्या अनेक भागांना फटका बसला. संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच पाणीपुरवठा मंत्री यांची भेट मिळावी यासाठी वॉटर टँकर असोसिएशनचे प्रयत्न सुरू होते. उपनगराचे पालकमंत्री लोढा यांना या संपाची दाहकता समजल्यावर त्यांनी आज लगेचच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. त्याचवेळी त्यांनी टँकर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली. त्यानंतर आज त्यांना प्रत्यक्ष चर्चेला बोलाविण्यात आले.

मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या संपामुळे मुंबईतील हॉटेल्स, मॉल्स आणि काही रुग्णालयांना तसेच विकासकामांना फटका बसला. मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने मुंबईत सेंट्रल ग्राउंड वॉटर एथोरिटीच्या गाईडलाइन्स आणि नियमांची अंमलबजावणी मुंबई पोलिसांकडून केली जात असल्याने हा संप पुकारला आहे. मुंबईत सेंट्रल ग्राउंड वॉटर एथोरिटीच्या या नियमांची अंमलबजावणी फक्त मुंबईत केली जात असल्याने याविरोधात आठ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून मुंबई वॉटर टँकर असोसिएशने संप पुकारला होता.

मुंबईमध्ये अडीच हजार टँकर्स आहेत. ते विविध ठिकाणी पाणीपुरवठा करतात आणि मुंबई महापालिकेलादेखील मदत करतात. अनेक ठिकाणी गृहनिर्माण सोसायट्यासुद्धा टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

वॉटर टँकर पुरवणाऱ्या मालकाकडे मुंबईत दोन हजार स्क्वेअर फिटची जागा हवी, या जागेमध्ये टँकर पाण्याने भरले जावे, रस्त्यावर कुठेही टँकर पाण्याने भरू नये, पाच ते पंधरा वॉटर टँकरसाठी रोज प्रशासनाची परवानगी घ्यावी,  लॉक शीट तयार करावे, टेलिस्कोपिक मीटरचा प्रत्येक ठिकाणी वापर करावा, प्रशासनाला वॉटर टँकर सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी अॅडव्हान्स द्यावा, एनओसी काढावी, अशा विविध नियमांची अंमलबजावणी सक्तीची केल्यामुळे टँकरचालक-मालकांनी संपाचे हत्त्यार उपसले होते.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content