Homeमुंबई स्पेशलप्रतिभासंपन्न संगीतकार सतीशचंद्र...

प्रतिभासंपन्न संगीतकार सतीशचंद्र मोरे यांचे निधन!

विद्रोही कवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या कवितांना प्रभावीपणे संगीतबद्ध करण्याची विलक्षण क्षमता असलेले, वैशाली सामंत, अवधूत गुप्ते, साधना सरगम, सुरेश वाडकर, कैलाश खेर, शान, शंकर महादेवन, स्वरूप खान, आनंदी जोशी आणि नेहा कक्कर अशा अनेक दिग्गज गायकांसोबत काम केलेले ज्येष्ठ हरहुन्नरी संगीतकार सतीशचंद्र दत्तात्रय मोरे यांचे प्रदीर्घ आजाराने नुकतेच मुंबईत निधन झाले. वांद्र्याच्या माउंट मेरी चर्चजवळील ‘शांती अवेदना’ येथे निधन झाल्याचे त्यांच्या स्नेही तृप्ती करलकर यांनी कळविले आहे. सतीशचंद्र ५६ वर्षांचे होते. निस्वार्थी, दिलखुलास आणि संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून संगीतक्षेत्रात ते ओळखले जात. त्यांच्या निधनाने संगीतविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सतीशचंद्र मोरे यांनी सुरुवातीला अपना बँक येथे नोकरी केली होती. त्यांना टाटा कंपनीकडूनही नोकरीची संधी मिळाली होती; मात्र संगीताची प्रबळ ओढ असल्याने त्यांनी ती संधी स्वीकारली नाही आणि पूर्णवेळ संगीतक्षेत्रातच कार्य करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या वडिलांना हार्मोनियम आणि मेंडोलिन वादनाची आवड होती. त्याचा प्रभाव म्हणूनच सतीशचंद्र यांनीही संगीताची दिशा निवडत वडाळ्यातील ज्ञानेश्वर विद्यालयात संगीत शिक्षक आणि कार्यक्रम संचालक म्हणून काम केले. त्यांनी अनेक दूरदर्शन मालिकांसाठी शीर्षकगीतं तसेच जाहिरातींची जिंगल्स तयार केली आहेत.

संगीतकार म्हणून आपल्या स्वतंत्र ओळखीचा शोध घेताना त्यांनी मोठा संघर्ष केला. ‘मयूरपंख’ या नावाने स्वतःचा वाद्यवृंद सुरू करून अनेक कार्यक्रम सादर केले. सर्वात प्रथम त्यांनी कलोनियल कझन फेम लेस्ली लुईसचा प्रायव्हेट अल्बम केला होता. त्यानंतर पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या काव्याला चाल देण्याचे जिकिरीचे काम त्यांनी समर्थपणे पार पाडले आणि त्यानंतर संगीतकार म्हणून सुरु झालेला प्रवास त्यांच्या आयुष्याला कलाटणी देऊन गेला. भावगीत, भक्तिगीत, पॉप, जॅझ, हळुवार प्रेमगीते ते आयटम साँगपर्यंत, अशा विविध शैलींमध्ये त्यांनी सहजतेने संगीत दिले. जवळपास २५ वर्षांहून अधिक काळ ते संगीतदिग्दर्शनाच्या क्षेत्रात सक्रिय होते.

‘लाख मोलाची गोष्ट’, ‘आम्ही बोलतो मराठी’, ‘या गोल गोल डब्यातला’, ‘मी नाही हो त्यातला’, ‘सेकंड इनिंग’ अशा अनेक चित्रपटांना तसेच आनंद लोंढे यांच्या जास्विन प्रॉडक्शन्स निर्मित आगामी ‘लव्हेरिया’ चित्रपटाला त्यांनी संगीत दिले आहे. “या गोल गोल डब्यात”मध्ये अशोक सराफ यांच्याकडून शीर्षकगीत गाऊन घेण्याची कला त्यांनी साधली होती. त्यांच्या संगीतबद्ध काव्यसंग्रहांमध्ये नामदेव ढसाळ यांचे ‘तृष्णा’, ‘बहर प्राजक्ताचा’, ‘मित’, तसेच जास्विन म्युझिकसाठी केलेले ‘धीमा धीमा’, शिवजयंती विशेष ‘शिवबाची तलवार’ आणि ‘प्रेम एक तरल भावना’ हे विशेष उल्लेखनीय आहेत. याशिवाय आनंद म्हसवेकर लिखित ‘सुनेच्या राशीला सासू’, ‘मदर्स डे’ व ‘एक्सक्यूज मी प्लीज’ या नाटकांचेही त्यांनी संगीत दिग्दर्शन केले होते. मोरे यांनी ‘लागू बंधू’ या प्रसिद्ध आभूषणांच्या ब्रँडसाठी एक गाणं नुकतंच संगीतबद्ध केलं होतं. सध्या ते अनेक प्रकारच्या प्रोजेक्ट्सवर काम करीत होते. त्यांच्या अचानक जाण्याने हे प्रोजेक्ट्स अर्धवट राहिल्याची खंत त्यांची अखेरपर्यंत सुश्रुषा करणाऱ्या त्यांच्या स्नेही तृप्ती करलकर यांनी सांगितले.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content