सूरज चव्हाण यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर आदित्य ठाकरे स्वतः सूरज चव्हाणना भेटायला गेले. दिशा सालियनच्या हत्त्येनंतर काही लोक सुशांत सिंगला भेटायला गेले होते. भेट झाल्यानंतर काही दिवसांतच सुशांत सिंगची हत्त्या झाली. असेच काही सूरज चव्हाणबाबत तर घडणार नाही ना? सूरज चव्हाण यांचा मनसुख हिरेन किंवा सुशांत सिंग तर होणार नाही ना, याची काळजी मुंबई पोलिसांनी आणि संबंधित विभागाने घेतली पाहिजे, असे मत भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी आज माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
आदित्य ठाकरे सूरजजवळ नेमके काय बोलायला गेले? याबद्दल पोलिसांनी चौकशी करायला हवी. कारण, उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांचा इतिहास आहे… जे जे त्यांना आडवे आले, त्यांना त्यांनी संपवले आहे, असेही ते म्हणाले.
संजय राऊत यांनी पाटण्यात झालेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीला वॅग्नोर ग्रुप म्हटले आहे. संजय राऊतना वॅग्नोर ग्रुपचा इतिहास तरी माहीत आहे काय? थोडी माहिती घेतली असती तर विरोधकांच्या पाटणा बैठकीला वॅग्नोर ग्रुप म्हणायची हिंमत झाली नसती. पाटण्याला जमलेला वॅग्नोर ग्रुप हिटलरच्या विचारांचा आहे, असे त्यांना म्हणायचे आहे का? संजय राऊत घरफोड्या आहे. वॅग्नोर ग्रुपचा लीडर नाझी विचारसरणीचा होता. संजय राऊतना पाटण्यात भेटलेलेपण नाझी विचारसरणीचे आहेत असे म्हणायचे आहे का?, असे सवाल राणे यांनी केले.
उद्धव ठाकरेंना पूर्वी किती मानसन्मान मिळायचा आणि पाटण्यात किती मिळाला, हे सर्वांनी पाहिले असेल. बैठकीत त्यांना एका कोपऱ्यात खुर्ची दिली. मेहबूबा मुफ्तीच्या बाजूला उद्धव ठाकरेंना टाकण्यात आले, असेही त्यांनी सांगितले. मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर असलेली शाखा तोडली जाते. त्यांना आपली शाखाही वाचवता येत नाही आणि अनिल परब पोरांसारखे मोर्चा काढत आहेत, असेही नितेश राणे म्हणाले.
तेलंगणाचे मुख्यमंत्री विठ्ठलाच्या दर्शनाला येत आहेत असे ऐकले आहे. दर्शनासाठी येत असतील तर चांगली गोष्ट आहे. आम्ही तिरूपतीला जातो. आणखी कुठे जातो, तसे ते आले तर त्यांचे स्वागतच आहे, असे उत्तरही त्यांनी एका प्रश्नाला दिले. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली मुंबई महापालिकेवर काढण्यात येणारा मोर्चा एक नौटंकी आहे. त्यांना हिम्मत नाही म्हणून शनिवारी, सुट्टीच्या दिवशी ते मोर्चा काढत आहेत. सोमवारी का नाही काढत, असा सवालही त्यांनी केला.
कर्नाटकचे मुख्यमंत्री पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. ते निवडून आल्यानंतर पाकिस्तानमध्ये जल्लोष करण्यात आला. कर्नाटकात पाकिस्तानचे झेंडे फडकवण्यात आले. त्यांचा हिरवा अजेंडा राबवण्यासाठी ते सांगलीत आले होते का? तसे असेल तर हा महाराष्ट्र असल्या विचारांना थारा देणार नाही, असेही नितेश राणे म्हणाले.

