- 30.12.2022- क्रिकेटपटू अपघातग्रस्त झाल्याच्या वेदनादायक प्रतिमा आणि व्हिडिओ ब्लर अर्थात चित्र अस्पष्ट न करता दाखवणे.
- 28.08.2022- एक व्यक्ती एका पीडित मृत व्यक्तीचा मृतदेह ओढत नेत असतानाचे चित्रण आणि रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या मृत व्यक्तीच्या चेहऱ्यावर लक्ष केंद्रित करणे
- 06-07-2022- बिहारमध्ये पाटणा इथे एका शिकवणी वर्गात एक शिक्षक पाच वर्षांच्या मुलाला तो बेशुद्ध होईपर्यंत निर्दयपणे मारत असल्याची वेदनादायक घटना. हे चित्रण आवाज बंद न करता दाखवण्यात आले ज्यामध्ये तो मुलगा आकांत करत असून यातून सुटण्यासाठी विनवणी करत आहे, हा व्हिडीओ 09 मिनिटांपेक्षा अधिक काळ दाखवण्यात आला.
- 04-06-2022- एका पंजाबी गायकाच्या मृत शरीराच्या विदारक रक्तबंबाळ प्रतिमा चित्र ब्लर न करता दाखवणे.
- 25-05-2022- आसाममधील चिरांग जिल्ह्यात एक व्यक्ती दोन अल्पवयीन मुलांना काठीने निर्दयपणे मारत असल्याची वेदनादायक घटना दाखवणे. या व्हिडिओमधील माणूस या मुलांना अतिशय क्रूरपणे काठीने मारत असल्याचे स्पष्ट दिसत होते. हे चित्रण आवाज बंद न करता आणि चित्र अस्पष्ट न करता दाखवण्यात आले ज्यामध्ये वेदनेने रडणाऱ्या मुलांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता.
- 16-05-2022- कर्नाटकमधील बागलकोट जिल्ह्यात एक महिला वकिलाला तिच्या शेजाऱ्याने क्रूरपणे मारहाण केली, ती घटना संपादनाशिवाय सातत्याने दाखवण्यात आली.
- 04-05-2022- तामिळनाडूमध्ये विरुधुनगर जिल्ह्यात राजापलायम येथे एक व्यक्ती स्वत:च्या बहिणीची हत्त्या करताना दाखवत आहे
- 01-05-2022- छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यात एका माणसाला एका झाडाला उलटे टांगून पाच व्यक्ती त्याला निर्दयपणे काठीने मारताना दाखवण्यात आले.
- 12-04-2022- एका अपघातादरम्यान मृत पावलेल्या पाच व्यक्तींच्या मृतदेहाचे विदारक चित्र ब्लर न करता सातत्याने दाखवण्यात आले.
- 11-04-2022- केरळमध्ये कोल्लम इथे एक व्यक्ती आपल्या 84 वर्षांच्या वृद्ध आईला निर्दयपणे मारताना आणि तिला अंगणातून ओढत निर्दयपणे मारहाण करत असताना सुमारे 12 मिनिटे सातत्याने दाखवण्यात आले तेही ब्लर न करता..
- 07-04-2022- बेंगळुरूमध्ये एका वृद्ध व्यक्तीने आपल्या मुलाला जाळून टाकल्याचा अत्यंत विचलित करणारा व्हिडिओ. हा वृद्ध माणूस माचिसची काडी पेटवून आपल्या मुलावर फेकतानाचे आणि मुलगा आगीच्या ज्वाळांनी घेरून गेल्याचे चित्रण, संपादित न करता वारंवार प्रसारित केले गेले.
- 22-03-2022- आसाममधील मोरीगाव जिह्यात एका चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलाला मारहाण करतानाचे दृश्य आवाज बंद न करता आणि चित्र अस्पष्ट न करता दाखवण्यात आले, ज्यामध्ये मुलाचे रडणे आणि गयावया करणे ऐकू येते.
दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून अशा प्रकारच्या नुकत्याच प्रसारित करण्यात आलेल्या बातम्यांचा दाखला देत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अशा बातम्या दाखवल्या जाऊ नयेत, असे आदेश काल जारी केले आहेत.
दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या प्रेक्षकवर्गात वयोवृद्ध, महिला आणि मुले यांचा समावेश असल्याने व्यापक जनहिताच्या दृष्टीने अशा प्रसारणाबद्दल चिंता व्यक्त करत, मंत्रालयाने सर्व खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांना मृत्यू, गुन्हेगारी, अपघात आणि हिंसाचाराच्या घटनांचे वृत्तांकन करण्याच्या पद्धतींना कार्यक्रम संहितेशी अनुरूप करण्याचा सल्ला दिला आहे.
अपघाताच्या घटना, मृत्यू आणि महिला, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्या संदर्भातील हिंसक घटनांसह हिंसेच्या सर्व घटनांचे वार्तांकन करताना “योग्य दर्जा आणि सभ्यता” यांना मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवणाऱ्या पद्धतीने वार्तांकन करण्याविरोधात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने काल सर्व दूरचित्रवाणी वाहिन्यांना सूचनावजा आदेश जारी केला आहे. अशा घटनांच्या संदर्भात विवेक न बाळगता वार्तांकन केल्याच्या अनेक घटना मंत्रालयाच्या निदर्शनास आल्यानंतर या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
अनेक दूरचित्रवाणी वाहिन्या मृतदेहांच्या तसेच रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी व्यक्तींच्या प्रतिमा प्रसारित करत आहेत. तसेच समाजातील महिला, लहान मुले तसेच ज्येष्ठ सदस्य यांच्यासह लोकांना निर्दयपणे मारहाण करतानाची जवळून चित्रित केलेली दृश्ये, शिक्षकांकडून मारण्यात येणाऱ्या मुलांचे सतत रडणे आणि विव्हळणे, अशा दृश्यांचे अनेक मिनिटे सतत प्रसारण करण्यात येते आणि असे करताना मुख्य घटनांवर लक्ष केंद्रित व्हावे म्हणून पडद्यावर दाखवताना त्याला गोल करून दाखविण्यात येते, तसेच हे चित्र ब्लर अर्थात अस्पष्ट करण्याची अथवा लांबून दाखवण्याची खबरदारीदेखील घेतली जात नाही. अशा प्रकारचे वार्तांकन दर्शकांसाठी त्रासदायक आहे यावर मंत्रालयाने भर दिला आहे.
मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात अशा प्रकारच्या वार्तांकनाचे प्रेक्षकांवर होणारे दुष्परिणाम ठळकपणे नोंदवण्यात आले आहेत. अशा प्रकारच्या बातम्यांचा लहान मुलांवर विपरीत मानसिक परिणाम होऊ शकतो असेदेखील मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच अशा प्रकारच्या बातम्यांमुळे पीडितांच्या प्रतिमा मलीन, बदनामी या शक्यतेसह व्यक्तीच्या गोपनीयतेवर अतिक्रमण यासारखा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो ही बाब या आदेशात अधोरेखित केली आहे. दूरचित्रवाणीवरुन प्रसारित होणारे कार्यक्रम विविध सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या घराघरांमध्ये, कुटुंबासह, वृद्ध, मध्यमवयीन, लहान मुले अशा सर्व वयोगटातील सदस्यांनी एकत्र मिळून पाहिले जातात. म्हणून या कार्यक्रमांचे प्रसारण करणाऱ्यांमध्ये एक जबाबदारीची भावना तसेच शिस्त असायला हवी आणि ही बाब कार्यक्रम संहिता आणि जाहिरातविषयक संहिता यामध्ये आवर्जून नमूद करण्यात आली आहे असे मंत्रालयाने म्हटले आहे. मंत्रालयाने वर उल्लेख केलेल्या वार्तांकनातील दृश्ये बहुतेकदा समाज माध्यमांकडून उचलून कोणताही संपादकीय विवेक न बाळगता आणि कार्यक्रम संहितेतील नियमांच्या पालनाची सुनिश्चिती न करता प्रसारित करण्यात आली आहेत याची नोंद मंत्रालयाने घेतली आहे.

