पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या विविध भेटवस्तूंचा लिलाव सध्या सुरू आहे. या भेटवस्तूंमध्ये भारतीय ऑलिम्पिकपटू, तलवारबाज (फेन्सर) भवानी देवी हिच्या तलवारीचाही समावेश आहे. याच तलवारीने भवानी देवीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिला सामना जिंकला होता.
भवानी देवीसाठी तो एक महत्त्वाचा दिवस होता जेव्हा ती टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र होणारी पहिली भारतीय महिला फेन्सर बनली. तिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिला सामना जिंकून इतिहास घडवला. ही एक मोठी कामगिरी होती, कारण कोणतीही भारतीय महिला फेन्सर त्या पातळीवर पोहोचली नव्हती. पुढील सामन्यात तिला पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले असले तरी भारताच्या आशा आणि आकांक्षा उंचावण्यासाठी ते पुरेसे आहे.
तामिळनाडू इथे राहणाऱ्या भवानी देवीचे पूर्ण नाव चडलवादा आनंद सुंदररामन भवानी देवी आहे. तिने 2003मध्ये आपली क्रीडा कारकीर्द सुरू केली. तिला तलवारबाजी करण्यात अजिबात रस नव्हता. भवानी देवीने तलवारबाजीची निवड करण्यामागे एक अतिशय रोचक कथा आहे. जेव्हा तिने शालेय खेळांमध्ये भाग घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तिला समजले की प्रत्येक वर्गातून फक्त सहा विद्यार्थ्यांना खेळांसाठी निवडले जाईल. भवानीची पाळी येईपर्यंत मुलांची सर्व खेळांमध्ये निवड झाली होती. नियतीने ठरवले असावे तसे.. कोणत्याही विद्यार्थ्याने तलवारबाजीसाठी प्रवेश घेतला नव्हता. क्षणाचाही विलंब न करता, तिने या बऱ्यापैकी नवीन खेळासाठी आपले नाव नोंदवले आणि प्रशिक्षण सुरू केले. आणि पुढचा इतिहास आपल्यासमोर आहे.

तलवारबाजी प्रकारात ती आठ वेळा राष्ट्रीय विजेता राहिली आहे. ऑलिम्पिकमध्ये आपला पहिला सामना जिंकून इतिहास रचणाऱ्या भवानीचाही अन्य पदकविजेत्यांप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्कार केला होता. यावेळी तिने पहिल्या सामन्यात विजय मिळवलेली तलवार पंतप्रधानांना भेट म्हणून दिली.
ज्या तलवारीने देशाचा गौरव वाढवला ती ऐतिहासिक तलवार आता तुमचीही होऊ शकते. तो क्षण तुम्ही कायम लक्षात ठेवू शकाल. ही तलवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तू आणि स्मृतिचिन्हांच्या ई-लिलावात आहे. तुम्हाला जर ही तलवार हवी असेल तर 17 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या आणि 7 ऑक्टोबर 2021पर्यंत चालणाऱ्या pmmementos.gov.in/ ई-लिलावात सहभागी व्हा.
यापूर्वीही पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव झाला आहे. शेवटचा लिलाव दोन वर्षांपूर्वी, 2019मध्ये झाला होता. मागील लिलावात सरकारने 15 कोटी 13 लाख रुपये कमावले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ती पूर्ण रक्कम गंगा नदी स्वच्छ आणि निर्मळ बनवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘नमामि गंगे कोष’मध्ये जमा करण्यात आली होती. यावेळीही लिलावातून मिळणारी सर्व रक्कम ‘नमामी गंगा कोष’साठीच दिली जाणार आहे.

