मुंबईतल्या ए डब्ल्यू एम एच महाराष्ट्र या संस्थेने आयोजित केलेल्या स्पेशल चाईल्ड स्कूलच्या मुलांच्या क्रिकेटच्या अंतिम सामन्यात वसई येथील सूर्योदय आरबीएल स्कूल मतिमंद मुलांच्या शाळेच्या संघाने विजेतेपद मिळविले.
गोरेगाव येथे झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात सूर्योदय आरबीएल स्कूलने मुंबई उपनगर संघावर सात गडी राखून सहज विजय मिळवला. मुंबई उपनगरकडून जस्टीनने सर्वात अधिक 15 धावा, तर सिध्दांतने 14 धावा केल्या. सूर्योदय आरबीएल स्कूलच्या अनुज त्रिपाठी याने एकाच षटकात दोन गडी बाद केले. 56 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना सूर्योदय आरबीएल स्कूलचा पहिलाच गडी रोहन गुटाल शून्य धावांवर बाद झाला. पण नंतर अनुज त्रिपाठी 15 धावा केल्या. त्याला रोहित पोथेन आणि ओबेद डायस यांनी दहा, दहा धावा करून सुरेख साथ दिली. लवेश डऊलने सहा धावा करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
अनुज त्रिपाठी याला उत्कृष्ट गोलंदाज व सर्वाेत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार ओबेद डायसला देण्यात आला. विजयी संघातील सर्व खेळाडूंचे तसेच अविनाश महाडीक (क्रीडा शिक्षक), शिक्षक शंकर परब, स्टेफी टिचर व महिमा टिचर यांचे प्रिन्सिपॉल अनुसया प्रधान यांनी खास अभिनंदन केले.